कृष्णात चौगुले; कोल्हापूर : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे उमेदवारांच्या प्रचाराला तंत्रज्ञानाची मोठी मदत मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रचाराला हायटेक स्वरूप दिले जात आहे. व्हॉटसअॅप ग्रुप व सोशल मिडियासह चारचाकी वाहनांवर एलईडी स्क्रीनवर उमेदवारांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या चित्रफिती दाखवण्यात येत आहेत. राजकीय पक्षांकडूनही टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्रे, मोबाइल अशा सर्व माध्यमांचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे.
पूर्वी सायकल, बैलगाडी तून प्रचार केला जात होता. भिंती रंगवल्या जायच्या. त्यानंतरच्या काळात वाहनांतून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करणे आणि दारोदारी जाणे असे प्रचार सुरू झाले. या अगोदर व अजूनही पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी रात्रंदिवस नेटाने झटत असतात. अगदी रात्री-अपरात्री विविध प्रकारच्या घोषवाक्यांनी भिंती रंगवणे, जागोजागी पोस्टर चिकटवणे, उमेदवाराच्या रॅलीत हिरीरीने सहभागी होणारे कार्यकर्ते पाहायला मिळत होते. आताही काहीअंशी तसे चित्र दिसते.
प्रचाराचे तंत्र
घरोघरी पत्रके, मागच्या पाच वर्षांचा कार्यअहवाल, पुढच्या पाच वर्षांचा संकल्पनामा, वचननामा किंवा जाहीरनामा पोचवणे तसेच सर्व मतदारांपर्यंत ‘वोटर स्लिप’ पोचवणे अशी कामे आतापासूनच सुरू झाली आहेत. जेवढ्या जास्त मतदारांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचू, तेवढीच जास्त विजयाची शक्यता असल्याची जाणीव प्रत्येकाला आहे. त्यामुळे पदयात्रा किंवा मिरवणुका काढून प्रत्येक विभागात पोचणे, त्यात काही सेलिब्रेटीजना सहभागी करून घेणे, मतदारसंघातील विविध संस्थांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, लहान-मोठ्या सभांचे आयोजन याबरोबरच आपल्या पक्षाच्या बड्या नेत्यांना आणून मोठी सभा घेण्यासाठीही उमेदवार प्रयत्नशील आहेत. ‘सोशल’चा वाढला वापर व्हॉट्स अप आणि फेसबुकचा बहुतेक उमेदवारांकडून वापर होत आहे. उमेदवाराचे फेसबुक आणि ट्विटर पेज तयार करून ते सतत अपडेट ठेवणे, त्यावर सातत्याने उमेदवारांचे संदेश टाकणे, सभांचे फोटो आणि व्हीडिओ अपलोड करणे, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या विषयीचा विरोधातला मजकूर फिरवणे असे हरतञ्जेचे प्रकार केले जातात. त्याशिवाय उमेदवारांचे बॅनर आणि पोस्टर अधिकाधिक आकर्षक करण्यासह त्यावरील मजकूर ठरवण्यासारखी कामेही त्यांच्यामार्फत होत आहेत.
अनेक उमेदवार आपल्या प्रचारासाठी विविध हिंदी, मराठी गीतांवर आधारित प्रचार गीते तयार करीत आहेत. राज्यात डिजिटल तंत्राचा फायदा घेत राजकारण्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा माहोलच बदलून टाकला आहे. व्हॉटस्अॅप, फेसबुक, द्विटर, यूट्यूबचा वापर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या टिकेला उत्तर देण्यासाठी केला जात आहे. विरोधी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे मोठे काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात असल्याचे दिसते.