ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ६९ किलो गटात हरजिंदर कौरने रौप्यपदक पटकावले. ॲथलेटिक्समध्येही झकास कामगिरी करताना पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत गुलवीर सिंगने रौप्यपदकावर नाव कोरले. (Silver to Harjinder Kaur, Gulveer Singh)
बॉक्सिंगमध्ये तीन पदके निश्चित
मंगळवारी ग्लासगोतील क्रीडा नगरीत हरजिंदर कौर आणि गुलवीर सिंग यांनी पदके मिळवत भारताचा तिरंगा फडकत ठेवला. बॉक्सिंगमध्ये जादुमणी सिंगने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत म्वेंगो म्वाले (झांबिया) याचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याचे पदक निश्चित झाले आहे. महिलांच्या ५४ किलो वजनी गटात प्रीती पवारने उपांत्यपूर्व फेरीत निकोल क्लाइड (उत्तर आयर्लंड) हिचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिचेही पदक निश्चित झाले आहे. प्रिया घंघासने महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत नियाम मिचेल (स्कॉटलंड) हिचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॉक्सिंगमध्ये भारताची तीन पदके निश्चित झाली. (Silver to Harjinder Kaur, Gulveer Singh)
श्रीहरी नटराजन १०० मी.बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीसाठी पात्र
जलतरणमध्ये भारतीय खेळाडूंना समिश्र यश मिळाले. साजन प्रकाश पुरुषांच्या ५० मीटर बटरफ्लाय हीटमध्ये एकूण २८ व्या स्थानावर राहिल्याने उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला नाही. श्रीहरी नटराज पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक हीटच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला . श्रीहरी नटराज पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही
४०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत विशाल टी.के.ची धडक
ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या ४०० मीटर उपांत्य फेरीसाठी विशाल टी.के. पात्र ठरला मात्र राजेश रमेश पात्र ठरला नाही. महिलांच्या उंच उडीत पूजा सिंग पदकांपासून वंचित राहिली. पॅरा जलतरणमध्ये कार्तिक बुडिगिना आणि अली इमाम पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल एस१३ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.वेटलिफ्टिंगमध्ये निरुपमा देवी सेराम महिलांच्या ६३ किलो वजनी गटात स्पर्धेतून बाहेर पडली. क्लीन अँड जर्कमध्ये लिफ्ट नोंदवण्यात ती अयशस्वी ठरली.
महिला बॉक्सर पराभूत
बॉक्सिंगमध्ये महिलांच्या ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत परवीन हुडा पराभूत झाला. तिला साशा हिकीने (इंग्लंड) पराभूत केले. पुरुषांच्या ९० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत कपिल पोखरिया रॉबर्ट मॅकनल्टी (स्कॉटलंड) कडून पराभूत झाला. बाऊल्स मध्ये भारताने (दिनेश कुमार, नवनीत सिंग) पुरुषांच्या दुहेरी विभागीय स्पर्धेत कुक आयलंडला हरवले. (Silver to Harjinder Kaur, Gulveer Singh)