कोल्हापुरातील ख्यातनाम चित्रकार सूर्यकांत निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. एस. निंबाळकर या नावाने ते प्रसिध्द होते. मिरज येथे जन्मलेले निंबाळकर यांनी कोल्हापूरातील कलानिकेतनमधून जीडी आर्टची पदविका संपादन केली होती. चित्रकलेत त्यांनी स्वत:ची शैली निर्माण केली आहे.
निंबाळकर यांचा जलरंगातील निसर्ग चित्र प्रकारात विशेष हातखंडा होता. त्यांनी काढलेली निसर्ग चित्रे, देवदेवतांची चित्रे तसेच भेटकार्डे जगभर प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठ शिल्पकार आणि चित्रकार रवींद्र मेस्त्री आणि चंद्रकांत मांडरे यांना ते आपले गुरु मानत. बाबुराव पेंटर, रवींद्र मेस्त्री, जी. कांबळे, चंद्रकांत मांडरे, अशा अनेकांच्या आठवणी त्यांच्या बरोबर होत्या. सुधीर फडके सुद्धा त्यांना भेटून गेलेले होते. सातत्याने काम करणे हाच त्यांचा ध्यास होता. इतरांनाही अनेक कामे देऊन कामाला लावणे हेही त्यांचे ब्रीद होते. रंग, आकार, मांडणीतील साधेपणा यामुळे तसेच आकारमूल्यांचे सहज सुलभीकरण यामुळे त्यांची चित्रे रसिकप्रिय ठरली. चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूरु यासह अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली. त्यांच्या कलाकृती लंडन, स्पेन, न्यूयॉर्क या देशासह देशविदेशातील कलारसिक आणि संग्रहालयात संग्रही आहेत. कॅम्लिन, ओक, बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटीकडून त्यांना पारितोषिके मिळालेली आहेत.
काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर चित्रकला अनेक संक्रमणातून जात आली आहे, मोजकेच जाणते कलारसिक आवर्जून हस्तनिर्मित कलाकृतीचा संग्रह करण्याचे सामर्थ्य धारण करत असतात. डिजिटल प्रिंटिंग आल्यानंतर हाताने केलेल्या चित्रांऐवजी मशीन प्रिंटचा हलका पर्याय उपलब्ध झाला, त्यामध्ये चित्रकार आणि पेंटर समाज भरडला गेला. या सर्व पार्श्वभूमीवर कलाशिक्षक बनण्याचा चालून आलेला चांगला, स्थिर पर्याय नाकारून, चित्रकलेने झपाटलेल्या एस. निंबाळकर सरांनी पूर्णवेळ चित्रकार म्हणून जगण्याचा धाडसी निर्णय घेतला. लँडस्केप खेरीज कॅलेंडर आणि शुभेच्छा पत्र (ग्रीटिंग्स) छापण्यासाठी भारतातील मोठमोठ्या छपाई उद्योगांना लागणाऱ्या चित्रांची निर्मिती ते करत असत. कला चळवळीच्या अंतरंगातील खूप मौलिक आठवणीचा खजिना त्यांच्याकडे होता. संपूर्ण आयुष्य चित्रकारी पेशा मधील चढ-उतार अनुभवून देखील, कोणतीही आठवण सांगताना त्याची भाषा कठोर बनत असली तरी कधीच अभिरुचीहीन नव्हती. लहान, मोठे, नवे, जुने असा कोणताही भेदभाव न करता सर्व चित्रकारांबरोबर त्याचा उमदा स्नेह होता. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कलानिकेतन महाविद्यालय या दोन्ही कला संस्थांचे माजी विद्यार्थी असणाऱ्या एस. निंबाळकर यांचा कोल्हापुरातील रंगबहार, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन, कोल्हापूर आर्टिस्ट सर्कल, कलासाधना, गुरु शिष्य या सर्वच कला उपक्रमांमध्ये उत्साही सहभाग असे. त्यांच्या निधनामुळे एक उमदा आणि सतत कलेसाठी झटणारा माणूस कलाक्षेत्रातून निघून गेला आहे.