गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र पांडुरंग आपटे यांचे ७ नोव्हेंबर रोजी वयाच्या ७१ वर्षी निधन झाले. शेतीपूरक दुग्धव्यवसायातील जाणकार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. गोकुळ दूध संघाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचे मोलाचे योगदान आहेच, त्याचबरोबर शेती आणि दुग्ध व्यवसायातील रवींद्र आपटे यांची भूमिका नेहमी नावीण्यपूर्ण आणि विकासपूरक राहिली आहे. तत्त्व व विचारांशी त्यांनी आयुष्यभर तडजोड केली नाही. परिणामी ते नेहमी त्यांच्या कामाने चर्चेत राहिले.
रवींद्र आपटे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी असलेल्या आपटे यांनी १९८७ साली कृषी विषयाची पदवी घेतली. कृषी विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेत सुवर्णपदकावरही मोहर उमटवली. शेती आणि दुग्धपूरक व्यवसायाबद्दल आवड आणि जिज्ञासा असलेल्या आपटे यांनी देशात-परदेशातील नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी होती; पण ही संधी धुडकावत त्यांनी आपल्या मातीशी नाळ कायम जपण्याचा ठाम निर्णय घेतला. उत्तूर (ता. आजरा) येथे त्यांनी गाईंचा गोठा सुरू केला. गोठ्यातील गाईंच्या दुधाची सोय कुठे करावी म्हणून जनता डेअरीची स्थापना केली. यावरच ते थांबले नाहीत, तर आपल्या शेतीमध्ये बारकाईने लक्ष घातले.
उत्तूर आणि आजरा येथील शेतीत नावीण्यपूर्ण प्रयोग करत गेले. याचदरम्यान त्यांनी दुग्ध व्यवसायात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. उत्तूर येथे ८० च्या दशकात पहिल्यांदा संकरित गाई आणल्या. हे त्यांचे पाऊल शेतकरीवर्गाला मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी ठरले. या गाईंचे संगोपन कसे केले जाते, दूधवाढ, शेतीतील प्रयोग अशा विविध बाबींच्या मार्गदर्शनासाठी शेतकरीवर्गाची त्यांच्याकडे रीघ लागू लागली. आपटे यांचे शेती आणि दुग्ध व्यवसायातील नावीण्यपूर्ण प्रयोग गोकुळचे तत्कालीन अध्यक्ष आनंदराव पाटील- व्यक्तिवेध च्येकर यांनी हेरले. त्यांनी रवींद्र आपटे यांना गोकुळ संघामध्ये आणले. १९८६ पासून ते तब्बल ३५ वर्षे गोकुळ संघाच्या संचालकपदी राहिले. याचबरोबर तीन वेळा अध्यक्षपदाची धुराही सांभाळली. गोकुळ संघासोबत प्रवास करताना त्यांनी संघहिताच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. दूध उत्पादकांच्या समस्या सातत्याने मांडत राहिले. त्यांच्या अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीमुळे गोकुळ संघाची प्रगती चढतीच राहिली. दरम्यान, त्यांनी महानंदा डेअरीचे उपाध्यक्षपद, आजरा तालुक्यातील जनता दूध संस्था आणि कोल्हापूर येथील ट्रान्स्पोर्ट या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही तितक्याच क्षमतेने पार पाडली.
रवींद्र आपटे यांनी शेती आणि दुग्ध व्यवसायात पाऊल टाकले तेव्हा आजरा तालुक्यात साधारपणे २० च्या आसपास दूध संस्था होत्या. त्यांनी हा आकडा ३०० हून अधिक केला. दूध संस्था बऱ्याच गावांत उभा राहिल्या, परिणामी, शेतकरीवर्ग दुग्ध व्यवसायाकडे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पाहू लागले. हा विकासपूरक बदल आपटे यांच्या दूरदृष्टी आणि शेतीसह दुग्ध व्यवसायाकडे पाहण्याच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे घडला. गेली चार वर्षे रवींद्र आपटे कर्करोगाशी झगडत होते. ७ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेती, दुग्धपूरक व्यवसाय, सहकार अशा अनेक बाबींशी नाळ जोडलेल्या रवींद्र आपटे यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली. पण त्यांनी केलेल्या कामामुळे ते शेतकरी आणि दुग्ध उत्पादक, व्यावसायिक आणि गोकुळच्या संबंधित लोकांच्या स्मरणात कायम राहतील, यात शंका नाही.