सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने सोमवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टी-२० क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार असून पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठीही आपण उपलब्ध असू, असे ३६ वर्षीय मॅक्सवेलने जाहीर केले आहे. (Glenn Maxwell)
मागील दशकभरातील ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅक्सवेलने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय वन-डे पदार्पण केले होते. जवळपास १३ वर्षांच्या कारकिर्दीत मॅक्सवेलने १४९ सामन्यांत ३३.८१ च्या सरासरीने ३,९९० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर वन-डेमध्ये ४ शतके आणि २३ अर्धशतके जमा आहेत. २०२३ वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानवरुद्ध फटकावलेल्या नाबाद २०१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. ऑस्ट्रेलियातर्फे वन-डेत द्विशतक झळकावणारा तो पहिला आणि आजवरचा एकमेव फलंदाज आहे. याबरोबरच, त्याने वन-डेमध्ये ७७ विकेटही घेतल्या आहेत. वर्ल्ड कपमधील सर्वांत वेगवान शतकाचा विक्रमही मॅक्सवेलच्या नावे असून २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने नेदरलँड्सविरुद्ध ४० चेंडूंत शतक झळकावले होते. २०१५ आणि २०२३ चा वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा मॅक्सवेल सदस्य होता. या वर्षी मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताविरुद्धचा उपांत्य सामना हा त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना ठरला. (Glenn Maxwell)
“आता या वयात माझ्या शारीरिक स्थितीमुळे मी संघाच्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण करू शकत नाही, असे मला वाटते. मी याविषयी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निवड समितीप्रमुख जॉर्ज बेली यांच्याशीही चर्चा केली आहे. आता २०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाची संघबांधणी सुरू असून तोपर्यंत मी क्रिकेट खेळू शकेन असे मला वाटत नाही. त्यामुळे, संघात माझ्या स्थानावर अन्य खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे मॅक्सवेलने निवृत्तीची घोषणा करताना सांगितले. मागील काही महिन्यांमध्ये वन-डेतून निवृत्ती जाहीर करणारा मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा क्रिकेटपटू आहे. याअगोदर, अष्टपैलू मार्नस स्टॉइनिसने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, तर फलंदाज स्टीव्ह स्मिथने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आंतरराष्ट्रीय वन-डेतून निवृत्ती जाहीर केली होती. (Glenn Maxwell)
हेही वाचा :
भूस्खलनात तीन जवानांचा मृत्यू
भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनीला दीक्षान्त समारंभात बंदी