कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅसची गळती होऊन झालेल्या स्फोटातील जखमी असलेल्या वृध्दाचे उपचार सुरू असताना सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अनंत देवाजी भोजणे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. यापूर्वी त्यांच्या स्नुषा शीतल भोजणे यांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेतील बळींची संख्या दोन इतकी झाली आहे. करवीर पोलिस या गुन्हयाचा तपास करत आहेत. (Gas leak accident in Kolhapur)
कळंबा येथील मनोरमा कॉलनीत झालेल्या गॅस स्फोटात गंभीर जखमी झालेले अनंत भोजणे यांचा उपचारादरम्यान आज शनिवारी सकाळी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. सोमवारी (दि. २५) रात्री पावणेअकराच्या सुमारास झालेल्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. ७० टक्क्यांहून जास्त भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. शुक्रवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली.या घटनेत जखमी झालेला प्रज्वल अमर भोजणे (वय साडेपाच वर्षे) याची प्रकृती गंभीर आहे. शीतल भोजणे यांच्यानंतर त्यांचे सासरे अनंत भोजणे यांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे.
घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅसची गळती होऊन झालेल्या स्फोटात शीतल भोजणे, त्यांचे सासरे अनंत भोजणे, मुलगा प्रज्वल आणि साडेतीन वर्षांची मुलगी इशिका हे गंभीर जखमी झाले होते. (Gas leak accident in Kolhapur)