ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियमवर रंगणार आहे. भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असणाऱ्या या पाच कसोटींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटी जिंकून मालिकेत पुन्हा आघाडी घेण्याचे भारताचे लक्ष्य आहे. (India Test)
भारताने २०२१ साली गॅबा स्टेडियमवरच ऑस्ट्रेलियाला धूळ चारून बॉर्डर-गावसकर मालिकाविजय साकारला होता. त्यावेळी, ऑस्ट्रेलियाला तब्बल ३२ वर्षांनंतर या स्टेडिवर कसोटी पराभव पत्करावा लागला होता. त्या भारतीय संघामधील रोहित शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत, महंमद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू याहीवेळी भारतीय संघामध्ये आहेत. मात्र, आताची परिस्थिती मागच्या वेळेपेक्षा बरीच वेगळी आहे. २०२०-२१ च्या मालिकेत भारताचे बलस्थान असणारी फलंदाजी यावेळी कमकुवत वाटते आहे. विशेषत: पहिल्या डावामध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात भारताला मागील ७ कसोटींमध्ये अपयश आले आहे. त्यातच या मालिकेतील पर्थ येथील पहिली कसोटी जिंकून घेतलेली आघाडी भारताला अडलेड येथील दुसरी कसोटी हरल्यामुळे गमवावी लागली. सहाजिकच, ब्रिस्बेन कसोटी खेळताना ऑस्ट्रेलिया संघाचे मनोबल उंचावलेले असून दडपण भारतीय संघावर आहे. (India Test)
रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय संघातील दोन सर्वांत अनुभवी फलंदाजांना ब्रिस्बेनमध्ये कामगिरीत सुधारणा करावी लागेल. अडलेड कसोटीत मधल्या फळीमध्ये खेळून अपयशी ठरलेला रोहित ब्रिस्बेन कसोटीत पुन्हा सलामीला खेळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लोकेश राहुल मधल्या फळीत फलंदाजीस येईल. (India Test)
फलंदाजीबरोबरच गोलंदाजीसुद्धा भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. एका बाजूने जसप्रीत बुमराह हा भेदक मारा करत असला, तरी त्याला दुसऱ्या बाजूने तोलामोलाची साथ लाभत नाही. परिणामी, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावा जमवणे सोपे जाते. ब्रिस्बेन कसोटीत भारताला याचे उत्तर शोधावे लागणार आहे. ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवरील गवत हे वेगवान गोलंदाजीस पूरक ठरू शकते. भारतीय संघामध्ये वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी आकाशदीप आणि रविचंद्रन अश्विनऐवजी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला जाऊ शकतो. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी अंतिम अकरा जणांचा संघ जाहीर केला असून त्यामध्ये स्कॉट बोलंडच्या जागी जोश हेझलवूडला स्थान देण्यात आले आहे. (India Test)
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी आता भारत व ऑस्ट्रेलियामध्ये तीव्र चुरस आहे. त्यादृष्टीने ही कसोटी जिंकणे दोन्ही संघांसाठी तितकेच महत्त्वाचे असल्याने पाच दिवस रंगतदार खेळ पाहायला मिळण्याची अपेक्षा क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. (India Test)
संघ : भारत
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाशदीप, महंमद सिराज, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स केरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.
विराटला संधी
भारताचा फलंदाज विराट कोहली हा ब्रिस्बेन कसोटीत आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत १,५०० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी विराटला केवळ २५ धावांची आवश्यकता आहे. हा टप्पा गाठल्यास अशी कामगिरी करणारा विराट हा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरेल. सचिन हा या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज असून त्याने १८०९ धावा केल्या आहेत.