दुसऱ्या देशांच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही, आपल्या भारतीय उपखंडात असलेल्या रामायण, महाभारत आणि वेदांचं नीट अध्ययन केलं तर यज्ञात गायींचे बळी देणे, गोमांस खाणे हे अतिशय सामान्य होतं.
-आनंद शितोळे
मानवप्राण्याचा इतिहास सहा लाख वर्षापासून सापडतो, पैकी आजच्या मानवाची उत्क्रांती मागच्या दीड लाख वर्षातली. धान्य पेरून धान्य उगवणे आणि ते एकाच ठिकाणी उगवणे या शेतीच्या प्राथमिक अवस्थेला सुरुवात झाली साधारण अकरा हजार वर्षापूर्वी.
त्यापूर्वी माणूस मांस आणि फळ, कंदमुळं खाऊन जगायचा. त्यासाठी त्याच्या जबड्याची आणि आतड्यांची रचना अनुकूल आहे. माणूस एकटाच मिश्र आहार करणारा प्राणी नाही. उंदीर, कुत्रा, अस्वल ही ठळक उदाहरणं.
आगीत मांस भाजल्यावर, धान्य भाजल्यावर, गरम पाण्यात शिजल्यावर पचायला हलकं होत, चव चांगली लागते हा शोध शेतीपूर्वी लागलेला. शेतीच्या शोधानंतर कुटुंबव्यवस्था, संस्कृती, धर्म या सगळ्या गोष्टी आल्या. शेतीच्या शोधाबरोबर नैसर्गिक साधनांच्या मालकीचा प्रश्न उभा राहिला. या मनुष्यप्राण्याच्या दीड लाख वर्षाच्या इतिहासात उणीपुरी दोन अडीच हजार वर्षे फक्त शाकाहार मांसाहार ही विभागणी असण्याची आहेत ( हा दोन अडीच हजार वर्षाचा आकडाही भीत भीत लिहिलाय ) उरलेल्या काळात माणूस मिश्रआहार करणारा प्राणी होता आणि तुमचे आमचे पूर्वज त्यातच आले.
माणसाला अन्न पचवायला तोंडातली लाळ उपयोगी पडते तसेच आतड्यात वस्तीला असलेले कोट्यावधी बॅक्टेरिया उपयोगी पडतात. हे जीवाणू आतड्यात असतात मग तुमचा सगळा आहार मांसाहारी म्हणायचा का ?
दही, डोसे, इडली किंवा कुठल्याही आंबवलेल्या पिठाचे पदार्थ बनवताना ते पीठ आंबवण्याची प्रक्रिया फक्त आणि फक्त जीवाणूच करतात, त्याद्वारे आंबवलेल्या पिठातून पोटात गेलेल्या जीवाणूच्या बद्दल शाकाहारी नाझींचं मत नेमकं काय आहे ?
धार्मिक बाजू
दुसऱ्या देशांच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही, आपल्या भारतीय उपखंडात असलेल्या रामायण, महाभारत आणि वेदांचं नीट अध्ययन केलं तर यज्ञात गायींचे बळी देणे, गोमांस खाणे हे अतिशय सामान्य होतं. मधुपर्क नावाच्या पदार्थाची रेसिपी शोधलीत तर ऋषी मुनी राजे रजवाडे काय खायचे हेही कळेल. महाभारत आणि रामायणाचे नायक सुद्धा सामिष आहार करायचे याचे लिखित स्वरूपातले पुरावे ढिगाने आहेत. बहुतांशी देवपद प्राप्त झालेले राजे किंवा इतिहासपुरुष मिश्रआहार करायचे याचे दाखले सर्वत्र आहेत.
मग ही शाकाहारी धर्मनाझीची उरफोड नेमकी कशासाठी आहे ? काय सिद्ध करायला आहे ?
आर्थिक बाजू
अतिशय निर्बुद्ध कायदा कसा असावा आणि आधी निर्णय मग विचार किंवा आधी कळस मग पाया याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा.
भाकड गायी बैल, नवे जन्माला आले गोऱ्हे निरुपयोगी असतात, त्यांना पोसण्याचा भार शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून ही जनावर विकून नवी दुभती जनावरं खरेदी केली जातात आणि निसर्गचक्र कायम चालू राहतं. हे गायगुंड लोकांकडून भावनिक आवाहन करून देणग्या उकळून गोशाला चालवतात. त्यामध्ये ही भाकड जनावरं ठेवतात आणि त्यांच्यासाठी हिरवा चारा विकत घेतात. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मर्यादित आहे. शेतकऱ्याला देणगीच्या भावाने घेतलेल्या चाऱ्याचा भाव परवडत नाही आणि मग भाकड जनावर तुपाशी आणि दुभती जनावरं उपाशी हे त्रांगडं होऊन बसतं. या बिनडोक कायद्याने शेतीला पूरक असलेला दुधाचा धंदा बाराच्या भावात निघेलच परंतु कालांतराने संपूर्ण गोवंश नामशेष होईल हेही यांना कळत नाही. हा शेतकरी उध्वस्त करण्याचा कट असलेला कायदा महाराष्ट्र सरकार अजूनही रद्द करत नाही.
राजकीय बाजू
शाकाहारी धर्मनाझींची फडफड आणि गायगुंडांची मळमळ फक्त राजकीय आहे. मांस प्रथिनांचा उत्कृष्ट सोर्स आहे. गोवंश मांस तुलनेने अतिशय स्वस्त आहे. या मांस खाणाऱ्या लोकांमध्ये ९० टक्के मुस्लिम आणि दलित समुदाय येतो. इतर समुदायाचे लोकही बीफ खातात पण त्याचं प्रमाण नगण्य आहे. या लोकांच्या पोटावर मारण्याचा, यांच्या ताटात माती कालवण्याचं काम ही राजकीय मंडळी करताहेत, त्यांना या मुद्द्यावर समाजात फूट पाडून लोकांना विरोधासाठी उचकून देऊन दडपशाही करून लोकांना धमकावून टाचेखाली दाबून ठेवायचं आहे.
सगळा आटापिटा राजकीय कारणासाठी आहे, धर्म नावाच्या बागुलबुवाच्या भीतीने घरात मांसाहार करणारे लोकही याविरुद्ध बोलायला घाबरतात हे दुर्दैवी आहे.
कायदेशीर बाजू
भारताची राज्यघटना प्रत्येक नागरिकाला आहार, विहार, आचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करते. त्यामध्ये माणसाला काय खावं प्यावं या हक्कांचा समावेश आहे. असं बंदी घालून, कायदे करून अमुक खाऊ नका, तमुक खाऊ नका हा लोकांच्या स्वयंपाकघरात घुसून चोंबडेपणा करण्याचा सरकारला कुठलाही अधिकार नाही.