-अशोक वाजपेयी
एका लोकशाही गणराज्यास कठोर नि असहिष्णू बनवले जात आहे. सत्तेला थोडाही विरोध नाकाला मिरच्या झोंबणारा ठरतो आहे. सत्ता नेहमीच मदमत्त होत असते. ती हे विसरते की मतभेदाच्या स्वातंत्र्य शक्यतेमुळेच ती निवडून आलेली असते. मतभेद वा असहमतीवर गहजब अनाकलनीय अशासाठी असतो की नजिकच्या काळातच तिला जनतेस तोंड द्यायचे असते. लोकशाहीत नियत काळानंतर निवडणूक अटळ असते. वास्तव हे आहे की, बहुतांश मीडिया गोदी मीडिया बनवल्यावरही सत्तेस असहमतीचे मंच नि संधी ना नष्ट करता आल्या, ना निष्क्रिय.
साहि्त्य आणि कला ही जीवनाची अशी क्षेत्रे आहेत, की जिथे आजही असहमती, मतविरोध वा विचार/अभिव्यक्ती स्वातंत्र्य नवनवी रूपे धारण करत आपली सृजनात्मकता टिकवून आहे. आज समाजात लोकशाही हरतऱ्हेने येणकेण प्रकारे बाधित आणि नियंत्रित केली जात असताना ती केवळ जिवंतच नाही तर सशक्त आहे. हा वादाच नाही, तर दावा म्हणूनही सांगता येईल की, वर्तमान काळात साहित्य आणि कलाच लोकशाहीचे रक्षण करीत आहेत. उलटपक्षी राजकारण, धर्म, माध्यमे मात्र कर्तव्यच्यूत होत आत्ममग्न!
जगातली सर्वात मोठी लोकशाही भयभीत आहे, हे न उमगणारं विलक्षण असं दृश्य आहे. याचं कारण असं दिसतं की सत्ता, व्यापार, धर्म, तंत्रज्ञान, माध्यमे आदी सर्वांची परस्पूरक अशी जी युती झाली आहे तिलाही लोकशाही पचनी पडेनाशी झाली आहे.. सत्तेला केवळ वर्चस्व नको तर एकाधिकार हवा आहे. लोकशाहीत एकाधिकाराची कल्पना विसंगत नि अशक्य असते खरी! त्यामुळे लोकशाहीस ठाकून ठोकून हीन पातळीवर आणण्याची जणू स्पर्धाच लागली आहे, कट-कारस्थान रचले जात आहे.
हे असे भारतातच नाही तर जगभर होते आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ही निकराची वेळ आहे. उतावीळ होऊन हिंसकपणे याचा प्रतिकार वा प्रतिवाद नाही करता येणार. याची मुळे खोलवर आहेत. जागेपणी नि विवेकानेच याचा बीमोड करायला हवा. प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. मदभेदयुक्त, असहमतीच्या सक्रीय अशा भावकी, बिरादरीची आज गरज आहे, जी अराजकीय राहून समर्थ, पर्यायी समाजनीती विकसित करेल. हे कार्य संयम नि साहसाने केले पाहिजे. आपल्यापैकी कितीजण यासाठी प्रतिबद्ध आहेत माहीत नाही.