ही एका देवळातल्या जत्रेची गोष्ट. एका छोट्या गावातलं हे देऊळ. दरवर्षी इथं जत्रा भरते. लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी जादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली आहे. त्यात आजकाल अनेक वीवीआयपी भाविक असतात. त्या देवळाची तुलना तर आता थेट पंढरपूरशी केली जाते. तर या जत्रेमागची ची ही सत्यकथा.
सुमारे १८५० नंतरचा काळ. (नक्की साल माहित नाही). ब्रिटिश राजवटीत अनेक छोटेमोठे संस्थानिक होते. त्यातील एका छोट्याश्या संस्थानिकाच्या पदरी एक सरदार होता. आजूबाजूच्या गावातील सारा वसुलीचं काम त्याच्याकडं होतं. सरदाराची एक बायको होती पण त्याकाळच्या प्रथेप्रमाणं त्याचे नायकिणी, दासी यांच्याशी सुद्धा संबंध होते. सरदाराला जरी औरस संतान नसले तरी वेगवेगळ्या दासींपासून झालेले दोन दासीपुत्र होते. सारावसुली म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय होतच असणार. त्यावरूनच पुढे सरदाराचा खून झाला. तो कुणी केला याचा काही शोध लागला नाही. सर्वांना वाटलं की विधवा राणी काही आता वसुली वगैरे भानगडीत पडणार नाही. पण राणी होती खमकी. तिनं नोकराला बरोबर घेऊन वसुलीचं काम सुरूच ठेवलं. बरं, राणी हयात असेपर्यंत सरदाराच्या संपत्तीवर कुणाला हक्कही सांगता येईना. बहुतेक त्यामुळं राणीलाही मारायचा डाव आखला गेला. एक दिवस ती वसुलीला त्या गावात आली. रात्री मुक्कामाला राहिली. दुसऱ्या दिवशी तिचं प्रेत सापडलं. कुणीतरी रात्रीच्या वेळी तिच्या डोक्यात मोठ्ठा दगड घालून ठेचून ठार केलं होतं. मारेकऱ्यांना कुणी बघितलं नव्हतं. म्हणून याहीवेळी कोणी सापडलं नाही. संबंधित लोकांना वाटलं आता सर्व सुरळीत होईल.
पण छे! काही वर्षं गेली आणि एका दासीपुत्राच्या कुटुंबातील कुणी कर्ता माणूस अचानक मरण पावला. काही महिन्यात अजून कोणी मृत्यू पावले. अशा दुर्घटना त्या दोन्ही कुटुंबात वारंवार होऊ लागल्या. हे कदाचित आजारपणामुळं होत असेल पण ते पडले कोकणातले लोक. “बादणे (भोवणे)” या प्रकारावर तिथं खूप श्रद्धा. सगळे घाबरले. राणीचा शाप भोवतोय असं त्यांना वाटू लागलं. गावात तेव्हा एक भगत असे. तो अशा गोष्टींमध्ये सल्ला देई. भगताकडं गेल्यावर त्यानं सांगितलं, “राणीला मूलबाळ नसल्यानं राणीचे दिवस (मरणोत्तर क्रियाकर्म) केले गेले नाहीत म्हणून हा त्रास होतोय. तर तिचं यथोचित श्राद्ध करा आणि जिथं तिला ठार मारलं तिथं प्रसाद नेउन ठेवा. पण घरातील पुरुषांनी मात्र तिथं त्या दिवशी जाऊ नका.”
त्याप्रमाणं त्या घरातील पुरुषांनी केस कापले, श्राद्ध केलं, ज्या दगडानं तिला मारलं होतं (जिथं तिचं प्रेत सापडलं होतं ) त्या दगडापाशी वडे आणि वाटाण्याची आमटी हा श्राद्धाच्या वेळचा प्रसाद ठेवला. घरातील सर्व पुरुष त्यावेळी गावाबाहेर थांबले. त्यानंतर दर वर्षी, राणीला मारले साधारण त्या तिथीच्या आसपास त्या कुटुंबातील लोक ही प्रथा पाळू लागले. बाजूच्या जंगलात त्या सुमारास डुक्कर किंवा सश्याची शिकार करत आणि ती मिळाल्यानंतर काही दिवस सोडून श्राद्धाचा मुहूर्त पकडला जाई. बरीच वर्षं गेली. हळूहळू त्या दगडाच्या भोवती शेड बांधली. लोक जातायेता त्याला नमस्कार करू लागले. घुमटीचं छोटं देऊळ झालं. लोक तिथं नवस बोलू लागले. देवळात प्रसाद तसेच थोडीफार दक्षिणा जमा होऊ लागली.
आता प्रश्न आला या दक्षिणेवर, उत्पन्नावर हक्क कोणाचा? इतक्या वर्षांत ते दोन्ही दासीपुत्र मरण पावले होते. पण त्यांची मुलं, नातवंडं होती. दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. केस कोर्टात गेली. सर्व जुन्या लोकांच्या साक्षी झाल्या आणि वर संगितलेली माहिती बाहेर आली. अनौरस असले तरी सरदाराचे आणि पर्यायानं राणीचे वंशज या न्यायानं त्या दोन्ही कुटुंबाना खरेतर त्या घुमटीचे उत्पन्न समप्रमाणात मिळायला पाहिजे. पण मधल्या काळात एका कुटुंबाला स्वत:ला दासीपुत्र म्हणून घेणे लाजिरवाणे वाटत असे म्हणून त्यांनी सरकारदरबारी आपली जात उच्चकुलीन करून घेतली होती. आणि त्यामुळं ते सरदाराचे वारस ठरत नव्हते. विरुद्ध बाजूच्या वकिलांनी हाच मुद्दा कोर्टासमोर मांडला आणि त्या आधारे त्यांचा उत्पन्नावरील हक्क उडवून लावला. आणि केस जिंकली.
दरवर्षीच्या श्राद्धाची प्रथा चालूच राहिली. देऊळ मोठं झालं तसं प्रथेचं मूळ स्वरूप बदलून त्याला जत्रेचं रूप प्राप्त झालं. हळूहळू त्या दगडाच्या बाजूला एक देवीची मूर्ती आली. मध्यंतरी देवळांना चांगले दिवस आले. काही वर्षांपूर्वी ऐकण्यात आलं की तिथं देवीची मोठी मूर्ती बसवण्यात आली आणि मूळ दगड काढून टाकण्यात आला.
जत्रा दिवसेंदिवस मोठ्ठी मोठी होतेय . भाविकांची गर्दी वाढतच आहे. पण अजूनही जत्रेच्या वेळी वडे आणि काळ्या वाटण्याची आमटी हाच नैवेद्य दाखवला जातो. १९७५ सालापर्यंत तरी त्या विशिष्ठ आडनावाचे लोक जत्रेच्या वेळी क्षौर ( केस कापणे) करत असत. त्या जागी जत्रेच्या पहिल्या दिवशी फिरकत नसत. सध्या काय होते माहित नाही. हे सर्व सांगायचं कारण की इथं मोठी जत्रा होते. विकीपीडियावर या जत्रेची आणि देवस्थानाची माहिती वाचली. त्यात या देवीचा उगम ४०० वर्षं सांगितला आहे, चिमाजी अप्पांचा वगैरे रेफरन्स दिलाय. एवढंच नाही तर एक गाय इथल्या दगडावर आपणहून दूध देई असं कुणा गावकऱ्यानं पाहिलं किंवा त्याच्या स्वप्नात आलं असंही सांगितलं आहे. तर जत्रेची अशीही कथा आहे.