लंडन : भारताचा शैलीदार फलंदाज ऋतुराज गायकवाड याला इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर संघाने करारबद्ध केले आहे. सध्या ऋतुराज भारत अ संघातर्फे इंग्लंड दौऱ्यावर आहे. (Ruturaj Gaikwad)
काउंटी स्पर्धेमध्ये यॉर्कशायरचा पुढील सामना २९ जूनपासून एसेक्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्याकरिता ऋतुराज संघामध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर, यॉर्कशायरचा संघ २२ जुलैपासून सरेविरुद्ध, २९ जुलैपासून ससेक्सविरुद्ध खेळणार आहे. काउंटीमधील त्यांचे उर्वरित दोन सामने सप्टेंबरमध्ये ससेक्स आणि डरहॅम संघांविरुद्ध होणार आहेत. ऋतुराज कारकिर्दीत प्रथमच काउंटी क्रिकेट खेळणार आहे. २८ वर्षीय ऋतुराजने आतापर्यंत ६ वन-डे आणि २३ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ३८ सामन्यांत ४१.७७ च्या सरासरीने ७ शतकांसह २,६३२ धावा जमवल्या आहेत. मागील वर्षीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऋतुराजने १२ डावांत ५७१ धावा केल्या होत्या. (Ruturaj Gaikwad)
काउंटी स्पर्धा खेळण्याबरोबरच ऑगस्टमध्ये होणाऱ्या वन-डे कप या इंग्लंडमधील वन-डे क्रिकेट स्पर्धेतही ऋतुराज खेळण्याची शक्यता आहे. यॉर्कशायर संघाकडून खेळण्यास मी उत्सुक आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा फायदा मला भविष्यातील कारकिर्दीमध्ये होईल, अशी प्रतिक्रिया ऋतुराजने या निवडीनंतर दिली. नुकत्याच झालेल्या आयपीएल मोसमामध्ये ऋतुराजने सुरुवातीच्या सामन्यांत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे कर्णधारपद भूषवले होते. मात्र, त्यानंतर, कोपऱ्याच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर जावे लागले. (Ruturaj Gaikwad)
हेही वाचा :
निकोलास पूरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
ख्रिस्तियानो रोनाल्डोला अश्रू अनावर….