-मुकेश माचकर
पृथ्वीवरचा सर्वशक्तिमान माणूस असा लौकिक असलेले नेते तात्या तीरमारे मरण पावले. जगाच्या कानाकोपऱ्यात एकही भाग असा नव्हता, जिथल्या वर्तमानपत्रात, टीव्हीवर ही बातमी नव्हती. जगभरातली सगळी कामं बंद पडली होती. जागतिक दुखवटा पाळला जात होता.
मरण पावलेले तात्या स्वर्गाच्या वाटेवर निघाले. त्यांनी त्यांच्याकडच्या धर्मग्रंथांमध्ये स्वर्गनरकाची वर्णनं वाचली होती. दाराशी एक निरुपद्रवी चेहऱ्याचा म्हातारा जीर्णशीर्ण वह्या आणि कागदाची भेंडोळी घेऊन बसलेला असतो. त्याच्याकडे नाव सांगितलं की तो पापपुण्याचा हिशोब काढतो आणि त्यानुसार स्वर्ग किंवा नरकात रवानगी होते, ही त्याची समजूत होती. आपलं नाव तर भूतलावर परमेश्वराच्या खालोखाल परिचयाचं असल्यामुळे स्वर्गाच्या दाराशी आपल्या स्वागतासाठी सुवासिनी उपस्थित असतील, देव पुष्पमाला घेऊन उभे असतील, हत्तीघोड्यांची पथकं असतील, ढोलताशे वाजत असतील, पुष्पवृष्टी होईल, अशीही त्याची समजूत होती.
बराच काळ उंच चढणीचा रस्ता चालल्यानंतर तात्या एका महाकाय दाराशी आले. त्यांनी आयुष्यात असं काही भव्य पाहिलं नव्हतं. पृथ्वीवरच्या एखाद्या भव्य पर्वतशिखराएवढ्या उंचीच्या त्या दारासमोर तात्या शनिवारवाड्याच्या दारातल्या एखाद्या मुंगीएवढा दिसत होता. मुंगीने शनिवारवाड्याचा दरवाजा तरीही ठोठावलाच आणि आवाजही दिला, कोणी आहे का?
आश्चर्य म्हणजे आतून प्रचंड भूकंपासारखा आवाज झाला आणि ते दार भयावह करकरत किलकिलं झालं. आतून हजारो सूर्यांचा प्रकाश उसळला. आले आले, साक्षात परमेश्वर माझ्या स्वागताला आले, तात्या मनोमन खूष झाले.
ते म्हणाले, भगवन्, मी आलो आहे. तात्या तीरमारे. पृथ्वीवरचा सर्वशक्तिमान नेता.
आतून गुंफेतून घुमत आल्यासारखा आवाज आला, मी भगवान नाही. चतुर्थ श्रेणी द्वारपाल आहे. तुम्ही कोणत्या पृथ्वीवरून आले आहात?
तात्या म्हणाले, कोणती पृथ्वी म्हणजे? जिथे जीवन आहे, माणूस राहतो ती पृथ्वी.
द्वारपालाचा आवाज आला, अब्जावधी ग्रहांवर जीवन आहे, त्यातला कोणता ग्रह?
तात्या म्हणाले, अहो, असं काय करता? सूर्य आहे ती पृथ्वी?
द्वारपाल म्हणाला, इथे परार्धांनी सूर्य चमचमतायत. शाळेत काही शिकला नाहीत का विश्वाच्या आकाराविषयी? नेमका कोणता सूर्य?
तात्यांचा धीर खचायला लागला, ते म्हणाले, अहो, आमच्या सूर्याला आम्ही नुसता सूर्यच म्हणतो. शिवाय माझा जो पेशा आहे, त्याचा शिक्षण वगैरे भानगडींशी काही संबंध नाही. माझ्याकडे पाहा ना, माझा चेहरा जगप्रसिद्ध आहे. तुम्ही लगेच ओळखू शकाल?
द्वारपाल म्हणाला, तुम्ही अख्खेच्या अख्खे मला या खालच्या धुळीत दिसतही नाही आहात, चेहरा कुठून पाहू आणि ओळखू. तुमच्या पृथ्वीचा आणि सूर्यमालेचा इंडेक्स नंबर माहिती असल्याशिवाय आम्ही काहीच करू शकणार नाही. मी शोध घेतो. माहिती काढतो. तुम्हाला सहा महिने इथेच या दारात थांबायला लागेल.
दरवाजा करकरत बंद होत असताना हातपाय गळालेल्या स्थितीतल्या तात्याच्या डोक्यात एकदम विचार आला, यांचा दरवाजाच पर्वताएवढा, द्वारपालाचे डोळे सूर्यासारखे प्रखर, त्याच्यासमोर आपण धुळीचे कणही नाही, इथलं काळाचं मापनही याच प्रमाणात असलं तर?…मरून काही तासांनंतर तात्या पुन्हा एकदा थंड पडू लागले…