कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली. दसरा चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने प्रतिकात्मक आंदोलन करुन निषेध करण्यात आला. (Padalkar’s protest)
आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर माफी मागण्यासही नकार दिल्यामुळे संतापाचा सर्वत्र उद्रेक वाढलेला आहे. कोल्हापुरातही शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पडळकरांविरोधात दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. आमदार पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान हे भाजपचे षडयंत्र असून भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसची संस्कृती यामधून दिसून येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली आहे. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मकरंद कुलकर्णी, जिल्हा युवक कार्याध्यक्ष संतोष मेंगाणे, चंद्रकांत वाकळे, विनय कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (Padalkar’s protest)