कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे मंगळवारी (१६ सप्टेंबर) त्यांच्या येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. (Dr. Shivram Bhoje Passes away)
संशोधक, शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. सेवानिवृत्तीनंतर ते कोल्हापुरात स्थायिक झाले. राजाराम रायफल्स परिसरातील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.(Dr. Shivram Bhoje Passes away)
डॉ. भोजे यांचा जन्म ९ एप्रिल १९४२ रोजी झाला होता. ते मूळचे कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील. गेली अनेक वर्षे ते कोल्हापुरात स्थायिक होते. गेले काही दिवस त्यांना थकवा जाणवत असल्यामुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार घेऊन ते घरी परतले होते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण कसबा सांगाव येथे झाले. काही काळ ते कागलमध्ये शिकायला होते. राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले. पुढे अणुशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले.
त्यांच्या संशोधन आणि विकासातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ने सन्मान केला आहे.(Dr. Shivram Bhoje Passes away)
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव झाला होता.(Dr. Shivram Bhoje Passes away)
सेवानिवृत्तीनंतर त्यांचा विविध शैक्षणिक संस्थांशी संबंध होता. शिवाजी विद्यापीठाचे ते शैक्षणिक सल्लागार होते. डॉ. भोजे यांचे विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे, चाळीस वर्षे वेगवान ब्रीडर अणुभट्टी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सक्रिय होते. डिझाइन, बांधकाम, ऑपरेशन, संशोधन आणि विकास क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे. भाभा अणुसंशोध्न केद्र प्रशिक्षण शाळेत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले होते. ट्रॉम्बे येथील बीएआरसी येथे वैज्ञानिक अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. एक मेगावॅटच्या वेगवान ब्रीडर टेस्ट अणुभट्टीच्या डिझाइन टीमचे सदस्य होते.
या टीमचे सदस्य म्हणून फ्रान्स येथे एका वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर ते होते. इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्चचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
वैज्ञानिक क्षेत्रात पोकळी : कुलगुरू डॉ. शिर्के
ज्येष्ठ भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी शैक्षणिक सल्लागार पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे यांच्या निधनामुळे शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शोकभावना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी म्हटले आहे की, “डॉ. भोजे यांनी भारताच्या अणुशक्ती क्षेत्राच्या विकासासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी व संशोधक प्रेरित झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, संशोधन आणि समाजासाठी व्यापक योगदान देणारा एक दीप मालवला आहे.
- डॉ. शिवराम भोजे अल्पपरिचय
- जन्म ९ एप्रिल १९४२ रोजी, प्राथमिक शिक्षण कसबा सांगाव येथे
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्री शाहू हायस्कूल, कागल
- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून अभियांत्रिकीची पदवी
- इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र, कल्पकम येथे संचालक म्हणून कार्यरत
- याचदरम्यान डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्याशी संपर्क
- अणुसंशोधनातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ने गौरव