नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या लंडनमधील टॅव्हिस्टॉक स्क्वेअर येथील पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. भारताने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. गांधी जयंती दोन दिवसावर आली असताना ही घटना घडल्याने भारतीय उच्चायोगाने चौकशीची मागणी केली आहे. दोन ऑक्टोबर हा गांधींजीचा जन्मदिवस असून याच दिवशी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. (Desecration of Mahatma Gandhi statue)
भारतीय उच्चायोगाने हा अहिंसेच्या विचारांवरील हिंसक हल्ला असल्याचे म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. टेव्हिस्टॉक स्क्वेअर येथील ध्यानस्थ अवस्थेतील पुतळ्याच्या बाजूला काही आक्षेपार्ह पोस्टर्स लावण्यात आली. या प्रकाराने या परिसरात राहणाऱ्या भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे. (Desecration of Mahatma Gandhi statue)
लंडनमधील भारतीयांनी भारतीय उच्चायोगाला या घटनेची माहिती दिल्यानंतर भारतीय उच्चायोगाने या घटनेचा निषेध नोंदवला. स्थानिक अधिकाऱ्यांनी पुतळ्याची तोडफोड झाल्याचे सांगितले. तसेच नवा पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. भारतीय उच्चायोगाने यासंबंधी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आही की “लंडनमधील टॅव्हिस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याची तोडफोड पाहून भारतीय उच्चायोग खूप दु:खी झाला असून आम्ही या घटनेचा निषेध करतो”
“ही केवळ तोडफोड नाही. अहिंसेच्या विचारांवर, महात्मा गांधी यांच्या आदर्शावर हिंसक हल्ला आहे. या प्रकरणी ताबडतोब कारवाई व्हावी. यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच त्याचे गांभीर्य समजावून सांगितले आहे. आमचे एक पथक आधीच घटनास्थळी दाखल झाले आहे. स्मारकारची साफसफाई करण्यात आली असून तिथे गांधीजींची नवी मूर्ती बसवण्यासाठी पावले उचलली जात आहेत”.