नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीतील प्रदूषणाने गुरुवारी अत्यंत धोकादायक पातळी गाठली. येथील ३९ प्रदूषण निरीक्षण केंद्रांपैकी ३२ ने वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) गंभीर असल्याचे घोषित केले आहे. या हवेत श्वास घेणेही कठीण झाले आहे. येथे सर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुले ऑनलाइन वर्गात शिकतील. (Delhi Pollution)
‘एअर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट’ (सीएक्यूएम) ने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून येणाऱ्या बसवर दिल्लीत येण्यास बंदी घातली आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांसह बीएस-४ डिझेल बसना यातून सूट देण्यात आली आहे. दिल्लीच्या एम्स परिसरात दाट धुके दिसले. दिल्लीत धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून ट्रॅफिक सिग्नल दिसण्यात अडचण येत आहे. दिल्लीत धुक्यामुळे वाहने संथ गतीने चालत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दिल्लीच्या ड्युटी मार्गावरील इमारती धुक्याने वेढलेल्या दिसत आहेत. येथील रस्त्यावरील दृश्यमानताही कमी आहे. दिल्लीतील धुके कमी करण्यासाठी पाणी शिंपडले जात आहे.
दरम्यान, अमेरिकन शास्त्रज्ञ हिरेन जेठवा यांनी १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीची सॅटेलाइट इमेज शेअर केली आहेत. यामध्ये दिल्लीत दाट धुके दिसून येत आहे. हिरेन हे अमेरिकेतील मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एरोसोल रिमोट सेन्सिंग शास्त्रज्ञ आहे. नासाने हिरेन यांचे फोटोही शेअर केले आहेत. (Delhi Pollution)