कोल्हापूर; प्रतिनिधी : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँड आणि क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला. संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांचे सहआयोजन, आरोग्यसेवा, शाश्वत उर्जा, नॅनो टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील संशोधनाला यामुळे गती मिळणार आहे.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डीसीप्लिनरी रिसर्चच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. आर्पिता पांड्ये-तिवारी यांनी नुकतीच ऑस्ट्रेलिया येथे भेट दिली. यावेळी ब्रिस्बेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँडच्या सेंटर फॉर फ्यूचर मटेरियल यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँड ही पदार्थ विज्ञानातील जागतिक दर्जाच्या संशोधनासाठी ओळखली जाणारी आणि जगभरातील अव्वल २ टक्के विद्यापीठांमध्ये समावेश असलेली संस्था आहे.
या करारावर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी.डी. लोखंडे यांनी तर युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँडच्या प्रा. अशोक कुमार नंजुंदन यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
त्याचबरोबर विद्यापीठाने क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या सस्टेनेबल एनर्जी मटेरियल लॅब सोबत संयुक्त संशोधनासाठी सामंजस्य करार केला. या करारावर विद्यापीठाच्या वतीने रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी.डी. लोखंडे यांनी तर क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने प्रा. दीपक दुबल यांनी स्वाक्षरी केली. क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या जागतिक स्तरावर संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी ओळखले जाते. जैवतंत्रज्ञान, नॅनोसायन्स आणि शाश्वत उर्जेमधील आंतरविद्याशाखीय संशोधनाला या करारामुळे गती मिळणार आहे.
या सामंजस्य करारासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन तर प्रभारी कुलगुरु डॉ. राकेश कुमार शर्मा, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी.डी. लोखंडे, डॉ. मेघनाद जोशी यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा :