महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्यात अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १४ वर आणण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. तथापि, हा विषय केंद्र सरकारच्या अख्यत्यारित आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत याबाबत चर्चा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
खरे तर आता अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे. कारण या वयोगटातील मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत. अल्पवयीन विद्यार्थ्यांचा गुन्हेगारीसाठी वापर केला जात असल्याचे राज्यात घडलेल्या विविध घटनांवरून दिसून आले आहे. या परिस्थितीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराचे वय १४ वर्षाच्या आत असावे. त्या वरील प्रत्येक युवक अथवा व्यक्ती ही सराईत अथवा थेट गुन्हेगारीमध्ये गणली गेली पाहिजे. अशी भूमिका सगळीकडे व्यक्त केली जात आहे. त्यासंबंधी राज्य सरकार विचार करत असल्याचे पवार म्हणाले.