नागपूर : या दाम्पत्याने आपल्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला. सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही बोलावले. मध्यरात्रीपर्यंत जोरदार पार्टी केली. सर्वांसोबत मस्त दंगामस्ती केली. मध्यरात्रीचे १२ वाजले. त्यांनी केक कापला. तेव्हा त्यांच्या मनात नेमके काय सुरू होते, याची पुसटशी कल्पनाही कुणाला आली नाही. (Couple Suicide)
सर्व काही शांत झाल्यानंतर त्यांनी आपल्या लग्नाचा पोशाख परिधान केला आणि शांतपणे दोघेही मृत्यूला सामोरे गेले. घटना उघड झाली त्यावेळी नागपूर हादरून गेले. जेरील डॅमसन ऑस्कर मोनक्रिफ आणि ॲन अशी या दाम्पत्याची नावे आहेत. जेरीलचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्याची पत्नी ॲन ड्रॉईंग रूममधील बेडवर निश्चल पडली होती. २६ वर्षांपूर्वी परिधान केलेल्या नववधूच्या पोशाखात ती पडली होती. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या कापडात तिचा मृतदेह झाकला होता. त्यावर फुले वाहिली होती.(Couple Suicide)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेरीलने कदाचित आपल्या पत्नीला पहिल्यांदा आत्महत्या करण्याची परवानगी दिली असावी. त्यानंतर तिचा गळफास काढून मृतदेह कापडाने झाकला असावा. त्यानंतर तो कापडाने झाकून त्यावर फुले वाहिली असावी.
या आत्महत्येमुळे ते राहत असलेल्या मार्टिन नगरात दु:खाची छाया पसरली. या दाम्पत्याला अपत्य नव्हते. मृत्यूपूर्वी या दोघांनी सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केले. अनौपचारिक मृत्यूपत्रासह दोन सुसाईड नोटही अपलोड केल्या. मात्र त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामागील कारण स्पष्ट केले नाही.(Couple Suicide)
मृत्यूआधी केला व्हिडीओ
ॲनने व्हिडिओमध्ये, नातेवाईकांनी स्वत:ची आणि मुलांची काळजी घ्यावी, आमच्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये, आमच्या मालमत्तेचे वाटप वडीलांनी योग्य पद्धतीने करावे, असे म्हटले आहे.
आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, मंगळवारी संध्याकाळी जरीपटका कॅथोलिक स्मशानभूमीत एकाच शवपेटीत दोघांचे दफन करण्यात आले.
जेरील शेफ होता. त्याने अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये काम केले होते. कोरोना काळानंतर मात्र त्याने काम बंद केले होते. हे दाम्पत्य अत्यंत कनवाळू होते. त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींशी खूपच जिव्हाळ्याचे नाते होते, असे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले.
या परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांनी ॲनच्या मोबाइलवरील स्टेट्स पाहिला आणि त्यांना धक्काच बसला. त्यांनी याची माहिती सर्व नातेवाईकांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही माहिती दिली. मात्र दोघेही मृतावस्थेत आढळले.