कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापुरात ७५ वर्षाच्या वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटल प्रशासनाने कोरानाने मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. (Kolhapur Corona update)
देशात कोरोनाने डोके वर काढले असून सर्वाधीक रुग्ण केरळमध्ये तर त्या खालोखाल महाराष्ट्रात आहेत. आरोग्य प्रशासनाकडून कोरोनाने धोकादायक नसल्याचे सांगतिले असले तरी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सकाळी कोरोनाने ७५ वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू झाला. गेले चार दिवस त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटमध्ये उपचार सुरू होते. मृत वृद्धेचे वजन जास्त असल्याने आणि त्यांना मधुमेह असल्याने त्यांचे कोरोनाने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Kolhapur Corona update)
दरम्यान त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याची माहिती पुढे आली आहे. पण ही चुकीची माहिती असल्याचे आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालून दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार केले. यापूर्वी कोरोनाच्या दोन वेळा लाटा आल्या होत्या. त्या गंभीर परिस्थितीतही स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी धाडसाने कर्तव्य बजावले होते. त्यामुळे पीपीई कीट नसल्याने स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा नकार हे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे सांगितले. (Kolhapur Corona update)
दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून आरोग्य विभागाच्या वेबसाइटनुसार सक्रिय रुग्णांची संख्या ३७८३ इतकी आहे. केरळमध्ये सर्वाधीक १४०० रुग्ण असून त्या खालोखाल महाराष्ट्रात ४८५ रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये ४३६ रुग्ण आहेत. जानेवारीपासून कोरोनामुळे २९ मृत्यू झाले आहेत. (Kolhapur Corona update)