मुंबई; प्रतिनिधी : वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
टिळक भवन येथे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना चेन्नीथला म्हणाले, की काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे दौऱ्यावर असून १३, १४, १६, १७ व १८ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा होतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १२, १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा घेणार आहेत.
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी या १३, १६ व १७ नोव्हेंबरला प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. तेलंगणा व कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत, त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली
असून त्यांना सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसुत्री जाहीर केलेली आहे, त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. १० नोव्हेंबर रोजी खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रैंड हयात मध्ये महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले, की महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या आश्वासक योजना सरकार येताच लागू केल्या जातील. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या या योजनाविरोधात चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्तमानपत्रात ही जाहिरात कोणी दिली त्याचे नाव नाही. याविरोधात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.