नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संपूर्ण आशियातील सर्वांत खराब रहदारी आणि सर्वाधिक वाहनांची गर्दी असलेल्या शहरांमध्ये देशातील दोन शहरे आघाडीवर आहेत. यामध्ये बंगळुरू पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स’च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
बंगळुरूमध्ये चारचाकी वाहनात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी २८.१० सेकंद लागतात. पुण्यात हेच अंतर कापण्यासाठी २७ मिनिटे ५० सेकंद लागतात. याशिवाय नवी दिल्ली १२व्या तर मुंबई १४व्या स्थानावर आहे. नवी दिल्लीत १० किलोमीटर अंतरासाठी २१.२० मिनिटे आणि मुंबईत हेच अंतर कापण्यासाठी सरासरी २१.४० मिनिटे लागतात. जागतिक स्तरावर, ब्रिटनची राजधानी लंडन आणि आयर्लंडची राजधानी डब्लिन ही सर्वात वाईट रहदारी आणि सर्वाधिक वाहनांची गर्दी असलेली शहरे आहेत. १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी वेळ लंडनमध्ये ३७.२० मिनिटे आणि डब्लिनमध्ये २९.३० मिनिटे लागला.
अहवालात ५५ देशांमधील ३८७ शहरांच्या ट्रॅफिक ट्रेंड डेटाची माहिती देण्यात आली आहे. त्याच वेळी, आशियाई विकास बँकेच्या मते, शहरांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरी वाहनांची संख्या दर ६ वर्षांनी दुप्पट होत आहे. दरवर्षी ४.४ कोटी लोक शहरी लोकसंख्येमध्ये सामील होत आहेत. आशियाई विकास बँकेच्या मते, विकास कायम ठेवण्यासाठी आशियाला २०३० पर्यंत वार्षिक अंदाजे १४२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यातील ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करणे आवश्यक आहे. आशियामध्ये दरवर्षी ४४ दशलक्ष लोक शहरी लोकसंख्येमध्ये सामील होतात.