जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार भागात गुरुवारी (१४ ऑगस्ट) मोठी ढगफुटी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील माचैल माता यात्रेदरम्यान झालेल्या या ढगफुटीत किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे, असे वृत्तसंस्था पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. (Cloud burst)
ढगफुटीनंतर, माचैल माता मंदिराची वार्षिक यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कारण मोठ्या प्रमाणात बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी सर्व संसाधने एकत्रित करण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे. बाधित भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी बचाव आणि वैद्यकीय व्यवस्थापनासाठी तत्काळ पाचारण करण्यात आले आहे.(Cloud burst)
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तसेच मदत आणि बचावासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यांनी शोकग्रस्त कुटुंबांचेही सांत्वन केले.
‘‘किश्तवाडमधील दुर्दैवी ढगफुटीबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे आणि शोकग्रस्त कुटुंबांचे सांत्वन केले आहे. मुख्यमंत्री कार्यालय जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. मदत आणि बचावासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत,’’ असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.(Cloud burst)
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. सिंग यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘‘जम्मू-काश्मीरचे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांच्याकडून तातडीचा संदेश मिळाल्यानंतर किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याशी नुकतेच बोललो. चोसीटी परिसरात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्याने मोठी जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने तत्काळ कारवाई सुरू केली आहे आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. नुकसानीचे मूल्यांकन आणि आवश्यक बचाव आणि वैद्यकीय व्यवस्थापन व्यवस्था केली जात आहे.’’