कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरवर वकिलानेच हल्ला केला. ‘ये पश्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोस काय?,’ असा संताप व्यक्त करत ॲड. अमितकुमार भाेसले (रा. रुकडी, ता. हातकणंगले) यांनी धावून जात हल्ला केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत भोसले यांच्यावर झडप घातली. कोरटकरची सुटका केली. भर कोर्टाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.(Attack on Koratkar)
सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. कोरटकरविरोधात कोल्हापुरात संतापाची लाट कायम आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीही त्याला कोल्हापुरी चप्पलने मारण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. संतापाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी लवकर कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. (Attack on Koratkar)
कोरटकरची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याला कोर्टात हजर करायचे होते. त्यामुळे सकाळी आठलाच पोलिस त्याला घेऊन आले होते. कोर्टात त्याला उभे केल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ करण्यात आली. त्यानंतर पोलिस त्याला परत पोलिस ठाण्याकडे घेऊन जात होते. कँटीनच्या पॅसेजमधून घेऊन जात असताना ॲड. भोसले यांनी कोरटकरला उद्देशून ‘तू शिवरायांचा अपमान करतोस काय,’ असे म्हणत त्याच्या अंगावर धावून गेले. त्याच्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी भोसले यांच्यावर झडप घातली आणि त्यांना बाजूला नेले. त्यांना ताब्यात घेतले.(Attack on Koratkar)
पोलिसांची दक्षता
तीन दिवसांपूर्वी कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळीही कोर्टाच्या आवारात त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्याचा प्रयत्न आजही होईल, म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती. पोलिसांनी कोरटकरला कोर्टाच्या आवारात आणण्याआधीच जयदीप शेळके यांना ताब्यात घेतले. शेळके यांनी परवा कोरटकरला पायताणाने मारण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा :
न्यायालयाकडून इम्रान प्रतापगढी विरोधातील एफआयआर रद्द
म्यानमार, थायलंडला शक्तीशाली भूकंपाचे धक्के
Chhatrapati Shivaji Maharaj
Raigad Waghya Dog: औरंगजेबाच्या कबरीनंतर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. औरंगजेबाच्या कबरीनंतर महाराष्ट्रात नवा ऐतिहासिक वाद सुरू होण्याची चिन्हे त्यामुळे दिसू लागली आहेत. (Raigad Waghya Dog)
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक फेसबुक पोस्ट करून वाघ्या कुत्र्याची रायगडावरील समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की :
संभाजीराजे छत्रपती यांची पोस्ट
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे. (Raigad Waghya Dog)
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली… (Raigad Waghya Dog)
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.
संभाजी ब्रिगेडची कारवाई
वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने गेल्या काही वर्षापासून लावून धरली होती. वारंवार मागणी करुनही शासनाकडून या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न होत नव्हता. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी ही समाधी हटवली. काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक मानले. संभाजी ब्रिगेडच्या विरोधात भूमिका घेतली. त्या सामाजिक दबावाला बळी पडूत शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्स्थापित केले. (Raigad Waghya Dog)
मुळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्रात असण्याचा. समकालीन संदर्भ साधनात कसलाही त्याचा कसलाही उल्लेख नाही. हे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे. शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडचा अभ्यास केला त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा उल्लेख मिळत नाही. उदाहरणादाखल : १८६९ साली “महात्मा जोतिराव फ़ुले” स्वत: रायगडावर गेले, शिवरायांची दुर्लक्षीत झालेली समाधी शोधून काढली आणि शिवरायांवर प्रदीर्घ पोवाडा लिहिला. पण यात कुठेच वाघ्याचा उल्लेख नाही. १८८१-८२ मध्ये “जेम्स डग्लज ” हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला. या अधिका-यानेही त्याच्या “बुक ऑफ़ बॉम्बे” या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे नकाशासहीत तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही.
दंतकथेतील या कुत्र्याचा सर्वप्रथम संदर्भ आला तो १९०५ साली “चिं. ग.गोगटे” यांच्या “महाराष्ट्र देशातील किल्ले” या पुस्तकात. या कुत्र्याचे ’वाघ्या’ असे नामकरण केले नाटककार ’राम गणेश गडकरी’ यांनी. त्यांच्या “राजसंन्यास” या नाटकाच्या माध्यमातून. गडकरींनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे. वाघ्याच्या चबुत-यावर “राजसंन्यास” या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत. विशेष म्हणजे गडकरींचे हे नाटक शिवराय आणि शंभूराजे यांच्या बदनामीने ओतप्रत भरलेले आहे. गडकरींच्या राजसंन्यास नाटकाचे लेखन २३ जून १९१६ ते ७ जानेवारी १९१७ या काळात घडले आहे. (Raigad Waghya Dog)
वाघ्या कुत्रा ऐतिहासिक असल्याचा दावा
प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांच्या मते वाघ्या कुत्रा हे ऐतिहासिक वास्तव आहे. त्यासाठी ते एक पुरावा देतात. ज्यावेळी संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा हटवला होता, तेव्हा त्याच्या पुनर्स्थापनेसाठी सोनवणी यांनी उपोषण केले होते. सोनवणी यांचे म्हणणे आहे की वाघ्याचा पुरावा जर्मनांनी जपलेला आहे. त्यासाठी ते एका सूचीचा संदर्भ देतात. त्या पुस्तकाचे नांव…”Negotiations: authors and subjects of books I-X (1834-1852) ” प्रकाशित झाल्याचे वर्ष…१९३०. हे पुस्तक म्हणजे १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची १२६ पानी सूची असुन त्यात लेखक व पुस्तकांच्या विषयांबाबत माहिती आहे. याच पुस्तकात जे लिहिले आहे की-
“शिवाजी नैसर्गिक मृत्युने रायगड येथे १६८० साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्याबाजुलाच एक पाषाणस्तंभ असुन त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा (शिवस्मारकाकडे) पहात आहे. हाच वाघ्या…शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी घेतली होती…”
या ग्रंथात फक्त १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक पुस्तकांची नोंद आहे, म्हणजेच वाघ्याबाबतचा मजकुर याच काळात लिहिल्या गेलेल्या कोणत्यातरी पुस्तकातुन या सूचीत घेण्यात आला आहे हे उघड आहे. या सूचीचे पुनर्मुद्रण १९३० सालचे आहे. तेही जर्मनीत झालेले. वाघ्याचा नवा पुतळा पुन्हा बसवण्यात आला तो १९३६ साली.
शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी हा पुतळा ब्राह्मणांनी १९३६ साली बसवला असा आरोप आहे. पण मग १८३४ ते १८५२ साली अधेमधे प्रसिद्ध झालेल्या, त्याही जर्मन ग्रंथात, वाघ्या कसा आला? असा संजय सोनवणी यांचा प्रश्न आहे
याचा अर्थ एवढाच आहे कि संभाजीराजांनी शिवस्मारक बांधल्यानंतर लगेच वाघ्याचेही स्मारक बनवले होते. येथे वाघ्याच्या दगडी ताशीव पुतळ्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ असा कि मुळ पुतळा दगडीच होता. कालौघात तो नष्ट झाला…वा केला गेला. आताचा पुतळा तर पंचधातुचा आहे. १९३० साली मुळात तो अस्तित्वातच नव्हता. म्हणजेच ज्या लेखकाने वाघ्याच्या स्मारकाची माहिती दिली आहे ती मूळच्या पुतळ्याची व स्मारकाची आहे. म्हणजेच वाघ्याचे स्मारक शिवस्मारक जेंव्हा मुळात बनवले गेले तेंव्हापासूनचेच आहे. कोणा महाराणीच्या जागेवर आताचे स्मारक नाही. वाघ्या ही दंतकथा नाही. कुत्र्याचे नांव “वाघ्या” आहे असे जर्मनांनीही नोंदवलेले आहे. तसा भारताशी जर्मनांचा कसलाही राजकीय किंवा सांस्कृतिक हितसंबंध नव्हता. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांमध्ये वाघ्याचा उल्लेख मिळत नाही म्हणून वाघ्या अस्तित्वातच नव्हता असे म्हणणे अज्ञानमूलक आहे, असे सोनवणी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. (Raigad Waghya Dog)
वादग्रस्त विषय
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे वास्तव हा एक वादग्रस्त आणि चर्चेचा विषय आहे. वाघ्या हा कथितरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा होता, ज्याने महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) त्यांच्या चितेत उडी मारून स्वतःचे जीवन संपवले, अशी दंतकथा प्रचलित आहे. या कथेनुसार, वाघ्याची समाधी रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी बांधण्यात आली. परंतु, या कथेच्या सत्यतेबाबत इतिहासकारांमध्ये आणि संशोधकांमध्ये मतभेद आहेत.
ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव
शिवकालीन समकालीन कागदपत्रांमध्ये किंवा विश्वसनीय ऐतिहासिक स्रोतांमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा किंवा त्याच्या चितेत उडी मारण्याच्या घटनेचा कोणताही उल्लेख सापडत नाही. रायगडावरील वाघ्याचा पुतळा आणि समाधी १९३६ मध्ये शिवाजी स्मारक समितीने उभारली, जी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल २५६ वर्षांनी घडली. ही समाधी ऐतिहासिक घटनेवर आधारित नसून, लोककथा आणि नाटकातून प्रेरित असल्याचे मानले जाते. या समितीमध्ये कोण पदाधिकारी होते, याचेही संदर्भ सापडत नाहीत.
वाद आणि आधुनिक दृष्टिकोन
समर्थन: काही लोकांचे मत आहे की वाघ्या ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणीप्रेमाचे आणि स्वामिनिष्ठेचे प्रतीक आहे. धनगर समाजात कुत्र्याला विशेष स्थान असल्याने ही कथा त्यांच्याशी जोडली जाते. (Raigad Waghya Dog)
विरोध: इतिहास संशोधक आणि शिवप्रेमी, उदाहरणार्थ संभाजी ब्रिगेड आणि संभाजीराजे छत्रपती , यांचा असा युक्तिवाद आहे की वाघ्याची समाधी अनैतिहासिक असून ती शिवचरित्राला कलंकित करते. २०१२ मध्ये संभाजी ब्रिगेडने हा पुतळा हटवला होता, परंतु प्रशासनाने तो पुन्हा स्थापित केला. २०२५ मध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी ३१ मे २०२५ पर्यंत हटवण्याची मागणी केली आहे, कारण तिला ऐतिहासिक आधार नाही.
निष्कर्ष
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे वास्तव हे ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून, लोककथा, साहित्य आणि २०व्या शतकातील निर्मितीवर अवलंबून आहे. ती एक भावनिक आणि सांस्कृतिक प्रतीक म्हणून काहींसाठी महत्त्वाची असली, तरी तिचा शिवचरित्राशी थेट संबंध असल्याचा पुरावा नाही. सध्या या समाधीच्या सत्यतेवरून वाद सुरू असून, ती हटवावी की ठेवावी हे शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीनंतर हा विषय कसे वळण घेतो, हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा :
कोरटकरच्या मुसक्या आवळल्या
बुलडोझर कारवाईवर यूपी सरकारला कोर्टाने फटकारले
कोल्हापूर : प्रतिनिधी : ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू’, अशी दर्पोक्ती करत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.(Indrajeet Sawant)
सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकरनी दिलेले जिवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा सावंत यांना धमकी देण्यात आली आहे. यू ट्यूबवर केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यावर, अशा धमक्यांना घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.
‘छावा’ चित्रपटावर इतिहास संशोधकांनी छत्रपती संभाजीराजे यांना मुघलांना पकडून देण्यात ब्राह्मण कारभाऱ्यांनी पकडून दिल्याचा दावा केला होता. त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. नागपुरातील प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले. कोरटकरविरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सावंत यांनी ज्या मोबाईलवर धमकी आली तो मोबाईलही पोलिसांना तपासासाठी दिला आहे. कोल्हापूर पोलीस कोरटकर यांचा नागपूरमध्ये शोध घेत आहेत. (Indrajeet Sawant)
एकीकडे कोरटकर यांचा पोलीस शोध घेत असताना सावंत यांना यू ट्यूबवर केशव वैद्यने धमकी दिली आहे. वैद्य यांनी सावंत यांना धमकीचा मेसेच करताना ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू’, अशी नव्याने धमकी दिली आहे. एकीकडे इतिहास संशोधक सावंत यांना धमक्या मिळत असताना नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांनी घराबाहेर पोलिस बंदोबस्त असतानाही नागपूरमधून पलायन केले आहे. कोरटकर मध्यप्रदेशमध्ये पळून गेले आहेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Indrajeet Sawant)
इतिहास संशोधक सावंत यांना धमकी देणाऱ्या कोरटकर यांना अटक करा अशी मागणी राज्यभरातून होत आहे. गुरुवारी (२७ फेब्रुवारी) कोल्हापुरातही शिवाजी चौकात शिवप्रेमींनी निदर्शने केली. कोरटकर यांना अटक न झाल्यास कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडवून जाब विचारु, असा इशाराही शिवप्रेमींनी दिला आहे.
हेही वाचा :
Agitation against Koratkar: कोरटकरांना अटक करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना रोखणार
कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरना अटक करा, अशी जोरदार मागणी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) करण्यात आली. या मागणीसाठी कोल्हापुरातील शिवप्रेमींनी शिवाजी चौकात निदर्शने केली. खासदार शाहू छत्रपती यांची आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती. कोरटकरना पाच मार्चपर्यंत अटक करा अन्यथा सहा मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडवून जाब विचारु, असा इशाराही शिवप्रेमींनी यावेळी दिला.(Agitation against Koratkar)
इतिहास संशोधक सावंत यांनी त्यांना ज्या मोबाईलवर धमकी आली होती तो पोलीस ठाण्यात जमा केला आहे. कोरटकरना अटक करण्यासाठी कोल्हापूरचे पथक नागपूरमध्ये त्याचा शोध घेत आहे. कोरटकरवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून होत आहे. (Agitation against Koratkar)
कोरटकरने सावंत यांना धमकी दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. कोरटकरनी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवप्रेमींत संतापाची लाट उसळली. गुरुवारी शिवाजी चौकात खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू छत्रपती यांनी या कृत्याचा निषेध केला. प्रशांत कोरटकरना अटक करुन त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
कोरटकरना पोलीस संरक्षण असताना ते नागपूरमधून कसे गायब होतात, असा प्रश्न शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात अडवून जाब विचारला जाईल, असा इशाराही दिला आहे. निदर्शनात विजय देवणे, व्ही. बी. पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, विक्रम जरग, दत्ता टिपुगडे, तौफिक मुल्लाणी, सतीश कांबळे, दुर्वास कदम, रियाज जमादार, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Agitation against Koratkar)
इंद्रजीत सावंत यांनी पोलिस ठाण्यात जमा केला मोबाईल
इंद्रजीत सावंत यांनी त्यांना ज्या मोबाईलवर धमकी आली होती तो मोबाईल जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जमा केला. कोरटकरनी सावंत यांना ज्या भाषेत धमकी दिली त्याबाबतचा जबाबही पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घेतला. सावंत यांच्यासह विजय देवणे, हर्षल सुर्वे यांनी तपासाची माहिती घेतली. कोरटकरना अटक करा अन्यथा तो पुरावे नष्ट करण्याचा आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी मागणी हर्षल सुर्वे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. (Agitation against Koratkar)
कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपुरात
पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक नागपूर येथे पोचले आहे. त्यांनी प्रशांत कोरटकरांचा शोध घेतला. त्यांचे शेवटचे लोकेशन दीक्षाभूमीजवळ मिळाले होते, पण त्यानंतर मोबाईल स्वीच ऑफ झाला आहे. कोरटकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरांचे नातेवाईक आणि मित्रांकडे त्यांची माहिती घेतली. कोरटकर मध्यप्रदेशात पळून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
औरंगजेबाला सात वर्षे झुंजवून महाराष्ट्राच्या मातीत गाडणारी महाराणी
-
डॅा. मंजुश्री पवार
भारतीय स्त्री इतिहासात गुणात्मक भर टाकणारा कालखंड म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील मराठा राज्यकर्त्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा कालखंड. आणि त्यातील कर्तेपणाचा एक धगधगता निखारा म्हणजे महाराणी ताराबाईंचा इतिहास. महाराणी ताराबाई या शिवछत्रपतींच्या स्नुषा आणि शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी. त्यांची एवढीच ओळख नाही. मराठ्यांचं राज्य धुळीला मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या औरंगजेबाला आव्हान देणारी आणि त्याला महाराष्ट्रात स्वत:ला गाडून घ्यायला लावणारी मराठ्यांची २४ वर्षाची तडफदार राणी म्हणजे महाराणी ताराबाई. भारतीय इतिहासातील स्त्री शक्तीचा एक युयुत्सु अविष्कार म्हणजे महाराणी ताराबाई. जिने शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य सलग सात वर्षे संघर्ष करून औरंगजेबाच्या तावडीतून वाचवलं आणि पुढे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. (Maharani Tararani)
ताराबाईंनी केवळ पती निधनानंतर राज्यकारभार सांभाळला नाही तर शिवछत्रपतींनी स्थापन केलेले ऐत्तद्देशीयांचं एकमेव सार्वभौम असं मराठ्यांचे राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असताना हातात तलवार व राज्यसूत्रे घेऊन या उद्ध्वस्त झालेल्या मराठ्यांच्या राज्याचे मराठ्यांच्या साम्राज्यात रूपांतर केले. आणि बलाढ्य अशा अशियाई सत्ताधीश औरंगजेबाशी सलग सात वर्षे युध्द करून या सार्वभौम सत्तेचे रक्षण केले. आणि पुढे स्वत:च्या अस्तित्वसिध्दतेची कसोटी लागल्यावर नवीन करवीर राज्याची स्थापना केली. (Maharani Tarabai)
तळबीडच्या मोहिते घराण्यात जन्म
ताराबाईंचा जन्म १६७५ साली तळबीडच्या मोहित्यांच्या घराण्यात झाला. शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या त्या कन्या. शिवदिग्विजय बखरकार म्हणतो की, हंबीरराव मोहित्यांची ही कन्या ‘सुलक्षणी’ आणि ‘सौंदर्याकरून नक्षत्र तारातव्दत होती. ’ तिचे माहेरचे नाव सीताबाई होते. संभाजी महाराजांनी आपले बंधू राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह घडवून आणला. सासरी तिचे नाव ‘ताराबाई’ असे ठेवण्यात आले. विवाहाच्या वेळी ताराबाई आठ वर्षाच्या तर राजाराम महाराज तेरा वर्षांचे होते.
स्वराज्याच्या सरसेनापतीची कन्या असल्यामुळे राजकारण व युद्धकौशल्य ताराबाईंच्या रक्तातच होते. पण भोसल्यांच्या घराण्यात सून म्हणून आल्यावर त्यांचे सगळे आयुष्य हे लढाया, वेढे, पाठलाग, सुटका, या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर धावपळ यामुळे पूर्ण बदलूनच गेले. त्या जात्याच बुद्धिमान व तडफदार असल्यामुळे स्वराज्यातील परिस्थितीचा अंदाज यायला त्यांना वेळ लागला नाही. राजकारणातील शत्रू-मित्रांची जाणीव, डावपेच, दगाफटका, दरबाऱ्यांचे राजकारण यातून त्या घडत गेल्या.
संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji) मृत्युनंतरच्या १९ वर्षाच्या कालखंडात तर मराठ्यांनी ‘न भूतो न भविष्यती’ असा लढा दिला. स्वराज्याची राजधानी रायगड, महाराणी येसूबाई व राजपुत्र शाहूराजे आणि जवळजवळ सर्व गडकोट औरंगजेबाच्या ताब्यात गेले. राजा नाही, राज्य नाही, खजिना नाही अशा बिकट परिस्थितीत मराठयांनी स्वराज्यरक्षणाचे कर्तव्य बजावत राजाराम महाराजांना छत्रपती बनविले. पण औरंगजेबाच्या वादळी आक्रमणामुळे त्यांनाही आपला जीव वाचवण्यासाठी कर्नाटकातील जिंजीस पलायन करावे लागले. कारण तो काळच असा आणीबाणीचा होता की, स्वराज्याच्या छत्रपतींचे प्राण वाचवणे ही त्या काळाची गरज होती.
कर्नाटकात जाण्यापूर्वी राजाराम महाराजांनी महाराष्ट्राचा कारभार पाहाण्यासाठी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली पन्हाळगडावर एका राजमंडळाची स्थापना केली. त्या राजमंडळात रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव असे अनेक प्रमुख प्रधान व सरदार होते. ही ताराबाईंसाठी एक अपूर्व संधी होती. अनेक मातब्बर मुत्सद्द्यांच्या व सेनानींच्या सहवासात त्यांना जणू राज्यकाराभाराचे व रणनीतीचे प्रशिक्षणच मिळत होते.
वैधव्याची कुऱ्हाड
राजाराम महाराजांनी आपल्या राजनैतिक चातुर्याने जिंजीला ७/८ वर्षे वेढा घालून बसलेल्या जुल्फिकारखानाशी अंतस्थ सूत जमवले होते. आणि ज्यावेळी जिंजी सोडण्याचा प्रसंग आला त्यावेळी मराठ्यांचा राजा व त्याचा कबिला किल्ल्यातून निसटून सुखरूपपणे महाराष्ट्रात दाखल झाला. जिंजीच्या भक्कम वेढयातून आपला शत्रू बायकामुलांसह निसटल्यामुळे औरंगजेब बादशहा चरफडू लागला.
जिंजीहून परतल्यानंतर राजाराम महाराज व ताराबाई यांची पन्हाळ-विशाळगड- वसंतगड-सज्जनगड-सातारा अशा अनेक किल्ल्यांच्या आसमंतात सतत घौडदौड सुरू होती. राजाराम महाराज स्वराज्यात आल्यामुळे पुन्हा मराठ्यांवर जोरदार हल्ला करण्याच्या तयारीत औरंगजेब बादशहा होता आणि गेली ७/८ वर्षे राजाराम महाराज महाराष्ट्रात नसल्यामुळे त्यांना गडकोटांची व्यवस्था प्रत्यक्ष पाहणे गरजेचे होते. म्हणूनच आपल्या महत्त्वाच्या गडकोटांची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि औरंगजेबाशी प्रतिकाराची योजना आखण्यासाठी त्यांची ही घोडदौड चालू होती. इकडे स्वराज्याची पूर्वीची राजधानी रायगड अगोदरच मोगलांच्या ताब्यात गेली होती. आता कर्नाटकातील दुसरी राजधानीही जुल्फिकार खानाने घेतली. त्यामुळे राजाराम महाराजांनी साताऱ्याच्या किल्ल्यावर आपली नवी राजधानी स्थापन केली. या नव्या राजधानीतच ताराबाई व राज परिवार यांचे वास्तव्य होऊ लागले.
राजाराम महाराज मोगली फौजांच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्रात निसटल्यामुळे औरंगजेबाची ७/८ वर्षाची मेहनत धुळीला मिळाली होती. म्हणून त्याने इरेला पेटून मराठ्यांचे किल्ले घेण्याची एक प्रचंड मोहीमच उघडली आणि प्रचंड सैन्यानिशी तो स्वत: स्वराज्यावर चालून आला. औरंगजेबाने पहिल्या धडाक्यातच वसंतगड घेतला. मग मराठ्यांची नवी राजधानी सातारा किल्ल्याला वेढा दिला. तत्पूर्वीच ताराबाई आपल्या पुत्रासह विशाळगडाकडे रवाना झाल्या होत्या. इकडे मराठे सातारा मोठ्या जिद्दीने लढवत होते. त्याचवेळी राजाराम महाराज मोगली मुलुखांवर सातत्याने मोहिमा काढत होते. या मोहिमांतील दगदगींमुळे सिंहगडावर त्यांचा (२ मार्च १७००) मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय ३० होते आणि वैधव्याची कु-हाड कोसळलेल्या ताराबाईंचे वय होते अवघे २५ वर्षे.
मराठ्यांना ताराबाईंचे नेतृत्व
मराठ्यांच्या दृष्टीने संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठी राज्याला बसलेला हा दुसरा प्रलयकारी धक्का होता. कारण आता मराठ्यांचा राजा जिवंत नव्हता आणि मागे राहिलेल्या त्याच्या विधवा राण्या आणि त्यांची दोन लहान मुले आपल्याशी काय लढणार; असे औरंगजेब बादशहालाच नव्हे तर मोगली गोटातील सामान्य शिपायालाही वाटत होते. मराठ्यांशी चालू असलेले युद्ध आता संपलेच, आता लवकरच मराठी राज्य धुळीला मिळवून आपण उत्तरेकडे परतू असे वाटून बादशाही छावणीत सर्वत्र आनंद पसरला. बादशहाला वाटले की, त्याने ज्याप्रमाणे एकेका वर्षात आदिलशाही व कुतुबशाही या शाह्या घेतल्या तशी चुटकीसरशी आपण आता मराठेशाहीही घेऊ.
पण मराठ्यांच्या अवघ्या २५ वर्षाच्या विधवा राणीने आशिया खंडातील सर्वात बलाढ्य अशा ८२ वर्षाच्या औरंगजेब बादशहाशी सतत सात वर्षे संघर्ष करून आपल्या राज्याचे रक्षण केले. राज्य गिळकृंत करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळवले. वैधव्याचे दु:ख बाजूला ठेवून ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजीराजे याला मराठ्यांच्या गादीवर बसवले आणि राज्यकारभारापासून ते लष्करी मोहिमांपर्यंतची कारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.
ताराबाईंची रणनीती
औरंगजेब बादशहाशी ७/८ वर्षाचा लष्करी संघर्ष ताराबाईंनी खुद्द आपल्या नेतृत्वाखाली केला. मराठयांच्या स्वराज्याविषयी व त्यावर कोसळलेल्या संकटांविषयी जेव्हा विचार मनात येतो तेव्हा पं. नेहंरूनी १९३८ साली लखनौत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात काढलेल्या एका उद्गाराची आठवण होते- “Freedom is in Peril, defend it with all your might”
ताराबाईंच्या नेतृत्वाच्या काळात असेच स्वातंत्र्य धोक्यात आले होते. म्हणून सर्वशक्तीनिशी त्याचे संरक्षण करायला त्या उभ्या ठाकल्या. त्यासाठी त्यांनी शिवछत्रपतींची रणनीती अवलंबली.
शिवाजी महाराज एकदा आपल्या गडकोटांबद्दल अभिमानाने म्हणाले होते, “दिल्लीसारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने मिळून ३६० किल्ले हजरीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष जरी लढला तरी औरंगजेबाला स्वराज्य घ्यायला ३६० वर्षे लागतील!” ताराबाईंनी शिवछत्रपतींचं हे वाक्य तंतोतंत खरे करून दाखवले. काय होती त्यांची रणनीती? औरंगजेबाने वेढा घातलेला किल्ला शक्य तितका लढवायचा. बादशहास जास्तीत जास्त काळ एकाच किल्ल्याच्या वेढ्यात गुंतवून ठेवायचे. किल्ल्यावरील रसद संपत आली आणि पावसाळा तोंडावर आला की मग वाटाघाटी करून बादशहाकडून भरपूर द्रव्य घेऊन तो त्याला विकत द्यायचा. औरंगजेबाचे सरदारही मराठ्यांना भरपूर पैसा द्यायला तयार व्हायचे कारण तो किल्ला घेणे. दुसरे असे की औरंगजेबही सरदारांना मोबदला देत असे. हा बादशहाच्या इज्जतीचा प्रश्न असायचा.
अशा प्रकारे मराठे किल्ल्यातून सुखरूप बाहेर पडले की मोकळा किल्ला बादशहाच्या हातात पडायचा. हाती आलेल्या किल्ल्याची व्यवस्था लावून तो ऐन पावसाळ्यात त्या किल्ल्यापासून परतीच्या प्रवासाला लागायचा. परतताना सह्याद्रीच्या मुसळधार पावसाने त्याच्या सैन्याची दैना उडायची. पाऊस, दलदल, वाहून गेलेले रस्ते, सोसाट्याचा वारा यात त्याच्या सैन्याची हैराणगत होत असतानाच ताराबाईंच्या फौजा त्याची लांडगेतोड करायच्या आणि इकडे बादशहाची पाठ वळताच ताराबाई आपला किल्ला पुन्हा काबीज करायच्या. त्यामुळे औरंगजेबाची जवळजवळ वर्षभराची मेहनत वाया जायची. ही झाली ताराबाईंच्या लष्करी धोरणाची एक बाजू.
दुसऱ्या बाजूवर, जेव्हा औरंगजेब इकडे सह्याद्रीच्या बेलाग दुर्गांवर धडका मारत होता तेव्हा त्याचे नीतिधैर्य खचवण्यासाठी ताराबाई मोगली सुभ्यात आपल्या सरदारांच्या नेतृत्वाखाली फौजा घुसवत होत्या. मराठी फौजा वऱ्हाड, खानदेश, गुजरात, माळवा, तेलगंण व कर्नाटक या मोगली मुलखात घुसून धामधूम माजवीत होत्या. त्यांनी मोगलांची बडोदे, सुरत, सिरोज, अहमदाबाद, गोवळकोंडा अशी अनेक शहरे लुटली. त्या आता माळव्यातून दिल्लीकडे तर ओरिसातून डाक्याकडे चाल करू लागल्या. अशाप्रकारे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेबर धुमाकूळ घालणाऱ्या ताराबाईंच्या फौजांनी औरंगजेबाची दमछाक केली होती. ताराबाईंनी मोगलांशी लढताना एकाचवेळी सरंक्षणात्मक व आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या युद्धनीतीने मराठ्यांची अस्मिता पुनरूज्जीवित झाली.
ताराबाईंचा औरंगजेबाशी लढा
२५ वर्षाच्या ताराबाईंसमोर उभा ठाकलेला औरंगजेब बादशहा हा काही सामान्य शत्रू नव्हता. काबूलपासून बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून कावेरीपर्यंत त्यांचे २२ सुभ्यांचे व ३५ करोड उत्पन्नाचे महाकाय साम्राज्य पसरले होते. त्याच्या पाठीशी साम्राज्याची प्रचंड लष्करी व आर्थिक शक्ती उभी होती. अशा सामर्थ्याशाली बादशहाचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राची तरूण विधवा राणी धैर्याने उभी राहिली होती.
मोगली लष्करात खुद्द बादशहा व त्याचे अनेक मातब्बर सरदार होते. प्रचंड सैन्य व दारूगोळा होता. एकदा त्याच्या तोफखान्याचा प्रमुख तरबियत खान याने किल्ल्यावर तोफा डागण्यासाठी प्रचंड उंच लाकडी मनोरा तयार केला. किल्ल्यावर तोफांचा भडिमार सुरू झाला. तरीही किल्ल्यावरील शिरबंदीला काही फरक पडेना. मग औरंगजेबाच्या सैन्याने किल्ल्याच्या तटांना दोन मोठे सुरूंग लावले. त्याच्या पहिल्या स्फोटात किल्ल्याची तटबंदी आतील मराठयांवर कोसळली तर दुसऱ्या स्फोटाने तटाची दुसरी बाजू हजारो मोगल सैनिकांवर कोसळली. तो प्रचंड लाकडी मनोराही कोसळला. सर्वत्र हाहाकार माजला. हजारो मोगल सैनिक दगडमातीच्या ढिगा-याखाली गाडले गेले. तटाला भगदाड पडले तरी त्यातून चाल करून जाण्याची हिंमत मोगल सैन्यात उरली नव्हती. शेवटी खचलेल्या मनस्थितीत बादशहाला मराठ्यांशी वाटाघाटी कराव्या लागल्या. मराठ्यांनीही अभय घेऊन किल्ला सोडून दिला. (थोडया दिवसांनी परत घेण्यासाठी)
साताऱ्याप्रमाणे परळीच्या वेढ्यातही औरंगजेबाला नामुष्कीजनक वाटाघाटी कराव्या लागल्या. तरीही नाउमेद न होता त्याने पन्हाळ्याकडे आपला मोहरा वळवला. आपला नातू बेदारबख्त व जुल्फिकारखान यांना घेऊन तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचला. या लढ्यात ताराबाई स्वत: लक्ष घालत होत्या. ज्या किल्ल्याला औरंगजेब वेढा देऊन बसे त्या किल्ल्याच्या किल्लेदाराची उमेद त्या कशी वाढवत, हे त्यांच्या पावनगडच्या किल्लेदाराला लिहिलेल्या एका पत्रावरून लक्षात येते.
हे संपूर्ण पत्रच जोशपूर्ण आहे. पण त्यातील “…. औरंगजेबास तरी ठेंचगा द्यावा अशी उमेद धरा ….याउपरी औरंगजेब आला आहे, तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे….” हे त्यांचे उद्गार त्यांच्यातील लढाऊ बाणा दाखवून देतात.
आता, हल्ला करून पन्हाळा जिंकणे मोगल सेनेस अशक्य होते. त्यामुळे पुन्हा बादशहाने मराठ्यांशी वाटाघाटी चालू केल्या आणि पन्हाळा व पावनगड या जोड किल्ल्यासाठी त्याने मराठ्यांना ५५ हजार रूपये खंडणी दिली. बादशहाने पन्हाळा काबीज केला तरी, आशिया खंडातील एका महाबलाढ्य सम्राटाला लढून नव्हे तर वाटाघाटीने ताराबाईंचा एक किल्ला घ्यायला एक वर्ष खर्ची घालावे लागले. यात त्याचे नव्हे तर ताराबाईंचे यश होते, त्याला एकाच किल्ल्याच्या पायथ्याशी वर्षभऱ जखडून ठेवण्यात त्या यशस्वी होत होत्या आणि याचवेळी ताराबाईंच्या आदेशानुसार त्यांचे सेनापती धनाजी जाधव, राणोजी घोरपडे, निबांळकर इत्यादी सेनानी मोगली मुलखात व बादशहा छावण्यांवर हल्ले करून धामधूम माजवत होते. हीच ताराबाईंची युद्धनीती होती.
विशाळगडचा वेढा
ताराबाईंच्या आक्रमक रणनीतीचे व औरंगजेबाच्या चिवट जिद्दीचे उत्तम उदाहरण म्हणजे विशाळगडाचा वेढा. पन्हाळा घेतल्यावर पुढच्या वर्षी (इ.स.१७०२) बादशहा विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचला. वेढ्याची प्रमुख कामगिरी त्याने फत्तेउल्ला खान या अत्यंत मुरब्बी अशा सरदारावर सोपवली होती. तो जेवढ्या शौर्याने किल्ल्यावर हल्ला चढवत होता, तेवढ्याच त्वेषाने मराठे त्याचे हल्ले परतवून लावत होते.
पावसाळ्यापूर्वी विशाळगडावर हल्ला करून तो हाती लागणार नाही, हे बादशहाच्या लक्षात आल्यावर त्याने पुन्हा वाटाघाटीची नेहमीची भाषा सुरू केली. पावसाळा तोंडावर आलाच होता. त्यामुळे दोन लाख रूपये खंडणी घेऊन मराठ्यांनी किल्ला ताब्यात दिला. बादशहाला किल्ला मिळाला. पण परतीच्या प्रवासात त्याच्या सैन्याच्या हैराणगतीस सुरूवात झाली. मुसळधार पाऊस, अंगाला झोंबणारा वारा, नदी नाल्यांना आलेले अक्राळविक्राळ पूर, अन्नधान्याची अभूतपूर्व टंचाई, प्राय:ही लोकांचे बळी घेणारी रोगराई यातच मोगली लष्कारातील हजारो सैनिक मृत्यूमुखी पडले. औरंगजेबाला विशाळगड ते पन्हाळा हे ३० मैलांचे अंतर कापण्यास ३८ दिवस लागले. याचदरम्यान मराठ्यांचे हल्ले सुरूच होते. ताराबाईंच्या सरदारांनी मोगली फौजातील पाच अधिकारी पकडले. ते इतक्या महत्त्वाच्या हुददयावर होते की, औरंगजेबाला त्यांच्या सुटकेसाठी ताराबाईंना प्रत्येकी एक लाख रूपये दंड द्यावा लागला.
असे करत कसाबसा बादशहा जेव्हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचला तेव्हा त्याचे सैन्य अर्धमेले झाले होते. मराठ्यांच्या किल्ल्याभोवतीचा एकएक वेढा हा औरंगजेबाला अंतिम पराभवाकडे व नैराश्याकडे नेत होता. कारण त्याने नंतर सिंहगड, राजगड, तोरणा या किल्ल्यांनाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, मराठ्यांची बाजू वरचढ असतानाही चिकाटीने वेढे घातले व ते जिंकण्याचा प्रयत्न केला. पण वेढा घातलेला प्रत्येक किल्ला ताराबाईंनी शौर्याने लढवला. त्यामुळे त्याला यश येत नव्हते. औरंगजेबाला चार-पाच वर्षात असे १० लहानमोठे किल्ले पैसे मोजून वाटाघाटीने घ्यावे लागले. जे त्याची पाठ वळताच वर्षभरात ताराबाईंनी पुन्हा काबीज केले. हे ताराबाईंच्या आक्रमक व मुत्सद्दी धोरणाचे यश होते.
ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची भरारी
औरंगजेब बादशहाने दक्षिणेतील जो प्रदेश जिंकलेला होता, तो ताब्यात ठेवण्यासाठी त्याला दक्षिणेत राहणे गरजेचे बनले होते. आणि ताराबाईंना हे चांगले माहीत होते की, बादशहा मराठ्यांचे किल्ले काही डोक्यावर उचलून दिल्लीला घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे बादशहाचा मराठ्यांच्या एकेका किल्ल्यास वेढा घालण्याचा उद्योग चालू असताना ताराबाईंनी आपल्या मराठी फौजा बादशहाच्या मुलखात चौफेर पाठवून त्याला जेरीस आणण्याची योजना आखली. ताराबाईंनी महाराष्ट्रात विखुरलेल्या सरदारांना एकत्र आणून त्यांना स्वराज्याच्या रक्षणाच्या कार्यात आणले. त्यांच्याच प्रोत्साहनाने मराठा सरदारांनी तेलंगण, ओरिसा, बंगाल, गुजरात, माळवा अशा हिंदुस्थानातील अनेक प्रदेशात धामधूम माजवली. मराठ्यांनी मोगली मुलुखांवर चालवलेल्या हल्ल्यांच्या बातम्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या किल्ल्याच्या पायथ्याशी वेढा घालून बसलेल्या औरंगजेबापर्यंत येऊन थडकत होत्या. या मराठा सरदारांचे हल्ले मोडून काढण्यासाठी तो आपल्या दूरदूरच्या सरदारांना हुकुम सोडत असे. त्याच्या हुकुमाप्रमाणे त्याचे सरदार मराठ्यांचा पाठलाग करत, पण ते तेथे पोहोचेपर्यंत मराठे तेथून पसार झालेले असत.
ताराबाईंसमोर औरंगजेब हतबल
अशाप्रकारे मराठ्यांनी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली गुजरात, माळवा, तेलंगण आणि कर्नाटक अशा अनेक मोगली मुलखांत मोहिमांची धूम उठविली. औरंगजेबाची मोठमोठी शहरे लुटली. त्याच्या नामांकित सरदारांना कैद केले. त्यामुळे आता या मराठ्यांच्या आक्रमणांपासून आपल्या मुलखाचे रक्षण करणे, औरंगजेबाला अशक्य होऊ लागले. पण अशा परिस्थितीतही मराठ्यांशी लढण्याचा त्याचा इरादा यत्किंचितही कमी झाला नव्हता. कारण औरंगजेबही काही लेचापेचा सत्ताधीश नव्हता. एकेक शाही एकेक वर्षात गिळंकृत केलेला, रजपूतांसारख्या अत्यंत कडव्या व स्वाभिमानी लोकांना नमवणारा आणि आखिल हिंदूस्थानावर मोगल साम्राज्यांची घट्ट पकड ठेवलेला असा तो अत्यंत जिद्दी, चिवट व कट्टर साम्राज्यवादी असा सत्ताधीश होता. मराठ्यांच्या राणीने त्याचा डाव त्याच्यावरच उलटवल्यावरही तो डगमगला नव्हता. वयाच्या ८९ वर्षीही शरीराने थकला असला, तरी मराठ्यांशी लढा चालू ठेवून मराठेशाही संपविण्याची उमेद शेवटपर्यंत बाळगून होता. अशा इतिहासातील एका हट्टी आक्रमक सम्राटाशी आमची मराठ्यांची तरूण राणी तडफेने लढत होती.
शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या, इथल्या भूमीपुत्रांच्या स्वराज्याला समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेऊन दक्षिणेत उतरलेल्या मोगल बादशहाला त्याच्या म्हातारपणी एका शूर मराठा स्त्रीकडून हार पत्करावी लागली आणि जी भूमी घेण्यासाठी तो दिल्लीहून येथे आला त्याच भूमीत त्याला स्वत:ला दफन व्हावे लागले. अत्यंत पश्चातापदग्ध व निराश अवस्थेत दिल्लीपती औरंगजेब बादशहाने २० फेब्रुवारी १७०७ रोजी आपला देह मराठ्यांच्याच भूमीवर ठेवून जगाचा निरोप घेतला! त्याला शेवटपर्यंत दिल्लीचे तख्त पुन्हा पाहता आले नाही.
भारताच्या इतिहासात जुलमी साम्राज्यशाही विरूद्ध लढणाऱ्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या. त्यात अहमदनगरची चांदबीबी, गोंडवणची राणी दुर्गावती, झांशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूर स्त्रिया आहेत. पण ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वेगळेपण असे आहे की, ताराबाईंनी दिव्यावर पतंग उडी मारतो त्याप्रमाणे आत्मयज्ञ केला नाही. औरंगजेबाशी एकच निर्णायक लढा न देता, त्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी झुंज दिली आणि शेवटी त्याला अगतिक करून टाकले. ज्या महाराष्ट्रास गुलाम करण्यासाठी औरंगजेब सर्व शक्तीनिशी धावून आला होता, त्याच महाराष्ट्राच्या मातीत त्याला त्यांनी गाडून टाकले!
(रेखाचित्रः संजय शेलार यांचे. विजय चोरमारे संपादित कर्तृत्ववान मराठा स्त्रिया या पुस्तकातून साभार)