चेन्नई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या गळ्यात पुन्हा एकदा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाच्या कर्णधारपदाची माळ पडली आहे. चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना मुकणार असल्याने धोनी संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. (Dhoni to lead CSK)
चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी गुरुवारी याविषयी माहिती दिली. ३० मार्च रोजी चेन्नईच्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गायकवाडच्या कोपराला दुखापत झाली होती. या सामन्यात राजस्थानच्या तुषार देशपांडेचा चेंडू ऋतुराजच्या कोपरावर आदळला होता. त्यानंतरही, ऋतुराज दोन सामने खेळला. त्याला ५ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५ धावा, तर ९ एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात १ धाव करता आली होती. आता त्याच्या कोपराला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला एक्स-रेमध्ये त्याचे फ्रॅक्चर स्पष्ट झाले नव्हते. परंतु, एमआरआय स्कॅन केल्यावर फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले, असेही फ्लेमिंग यांनी सांगितले. यानंतर, संघव्यवस्थापनाने उर्वरित मोसमासाठी धोनीची कर्णधार म्हणून निवड केल्याचेही ते म्हणाले. (Dhoni to lead CSK)
आयपीएलच्या पहिल्या मोसमापासूनच धोनीकडे चेन्नई संघाचे कर्णधारपद आहे. २०२२ च्या मोसमात रवींद्र जडेजाने काही सामने चेन्नईचे नेतृत्व केल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपदाची धुरा आली. २०२३ च्या मोसमाचे विजेतेपद पटकावल्यानंतर धोनीने चेन्नईच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, २०२४ पासून ऋतुराज चेन्नईचा कर्णधार बनला. आता या मोसमात चेन्नईचा डोलारा पुन्हा सांभाळण्याची जबाबदारी धोनीवर येऊन पडली आहे. या मोसमात चेन्नईला आतापर्यंतच्या पाचपैकी केवळ एकच सामना जिंकता आला असून सलग चार पराभवांमुळे गुणतक्त्यात चेन्नईचा संघ नवव्या स्थानी आहे. चेन्नईचा पुढील सामना शुक्रवारी (१२ एप्रिल) घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. (Dhoni to lead CSK)
हेही वाचा :
सहा संघांमध्ये रंगणार ऑलिंपिक क्रिकेट
सिंधू, किरण, प्रियांशू पराभूत