फिफा विश्वचषकाच्या १९ जुलै २०२६ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा १-० असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध झालेला सामना वगळता संपूर्ण स्पर्धेत स्पेनने कोणत्याही संघाला गोल करू दिला नाही. स्पेनची बचावफळी जणू चीनच्या भिंतीसारखी अभेद्य ठरली. त्याचमुळे स्पर्धा संपल्यानंतर चर्चा रंगली आहे, ती स्पेनच्या बचावफळीची आणि ती भेदणा-या बेल्जियमच्या चार्ल्स डी केटेलेरे याची. (FIFA world cup 2026)
स्पेनची बचावफळी गोलपोस्टसमोर इतक्या भक्कमपणे उभी राहिली की जगभरातील आघाडीच्या फुटबॉलपटूंच्या गोल करण्याच्या आशा तिच्यावर आदळून चक्काचूर झाल्या. मात्र, या संपूर्ण विश्वचषकात एक असा खेळाडू होता, ज्याने अभेद्य वाटणारा स्पेनचा बचाव भेदला. त्याच्या हेडरवरून झालेला गोल हा २०२६ च्या फिफा विश्वचषकात स्पेनविरुद्ध झालेला एकमेव गोल ठरला. स्पेनचा उत्कृष्ट गोलरक्षक उनाई सिमॉनलाही तो रोखता आला नाही.
कोण होता तो खेळाडू?

स्पेनचा अभेद्य बचाव भेदणाऱ्या त्या खेळाडूचे नाव आहे चार्ल्स डी केटेलेरे. ही घटना ११ जुलै २०२६ रोजीची आहे. लॉस एंजेलिसमधील सोफी स्टेडियमवर बेल्जियम आणि स्पेन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला जात होता. सामन्याच्या पहिल्या ३० मिनिटांत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. (FIFA world cup 2026)
तिसाव्या मिनिटाच्या सुमारास स्पेनने आक्रमण सुरू केले. लामिन यामालच्या पासवर पेद्रो पोरोने पेनल्टी क्षेत्रात कटबॅक केला. चेंडू दानी ओल्मोकडे गेला. ओल्मोने चेंडू रुईजकडे सोडला आणि रुईजने क्षणाचाही विलंब न करता तो नेटमध्ये धाडत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
स्पेन एका गोलने आघाडीवर गेला होता. तोपर्यंत स्पेन हा विश्वचषकातील एकमेव संघ होता, ज्याच्याविरुद्ध एकही गोल झाला नव्हता. स्पेनचा गोलरक्षक उनाई सिमॉन याच्या नावावरही विक्रम नोंदला जात होता. सलग ६५० मिनिटे कोणत्याही खेळाडूला त्याचा बचाव भेदता आला नव्हता. (FIFA world cup 2026)
मात्र, बेल्जियमविरुद्धच्या सामन्याच्या मध्यंतरापूर्वीच हा विक्रम मोडला.
कसा झाला स्पेनविरुद्धचा एकमेव गोल?
सामन्याच्या ४१व्या मिनिटाच्या सुमारास बेल्जियमच्या लिएँड्रो ट्रोसार्डकडे चेंडू आला. त्याने तो कास्टान्येकडे पास केला. कास्टान्येने क्रॉस बॉक्समध्ये चेंडू टाकला. केविन डी ब्रुयनने तो स्वीकारून उजव्या बाजूला उभ्या असलेल्या चार्ल्स डी केटेलेरेकडे पास दिला.
केटेलेरेने अचूक हेडर मारला आणि चेंडू उनाई सिमॉनला चकवत थेट जाळ्यात जाऊन विसावला.
हा या विश्वचषकातील केटेलेरेचा तिसरा गोल होता आणि सर्वांत महत्त्वाचाही. कारण या गोलमुळे स्पेनचा अभेद्य ठरलेला बचाव प्रथमच भेदला गेला.
यानंतर स्पेनने आणखी एक गोल करत सामना २-१ असा जिंकला. मात्र, केटेलेरेचा तो एकमेव गोल संपूर्ण फिफा विश्वचषक २०२६ मध्ये विश्वविजेत्या स्पेनविरुद्ध झालेला एकमेव गोल ठरला.
कोण आहे चार्ल्स डी केटेलेरे?
चार्ल्स डी केटेलेरेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. किलियन एमबाप्पे किंवा लिओनेल मेस्सीलाही जे जमले नाही, ते त्याने करून दाखवले.
फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीतसुद्धा स्पेनने एकही गोल खाल्ला नव्हता. अर्जेंटिनाविरुद्धच्या अंतिम सामन्यात तर १२० मिनिटे चाललेल्या खेळात एकमेव गोल स्पेननेच केला. अशा अभेद्य बचावफळीविरुद्ध गोल करणाऱ्या केटेलेरेची गणना आता या विश्वचषकातील उल्लेखनीय खेळाडूंमध्ये होत आहे. त्यामुळे त्याची आतापर्यंतची कारकीर्द कशी आहे, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
चार्ल्स डी केटेलेरे हा २५ वर्षांचा असून तो इटलीतील सेरी ए स्पर्धेतील अटलांटा क्लबकडून खेळतो. तब्बल ६ फूट ४ इंच उंच असलेला केटेलेरे फॉरवर्ड तसेच अटॅकिंग मिडफिल्डर या दोन्ही भूमिकांमध्ये खेळू शकतो.
बेल्जियममधील ब्रुग्स येथे जन्मलेल्या केटेलेरेने क्लब ब्रुगच्या युवा अकादमीत प्रशिक्षण घेतले. २०२० मध्ये त्याने बेल्जियमच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघात पदार्पण केले आणि हळूहळू तो संघातील महत्त्वाचा खेळाडू बनला. (FIFA world cup 2026)
२०२२ च्या फिफा विश्वचषकातही तो बेल्जियमकडून खेळला होता. मात्र, तेव्हा मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात ७५व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला आणि त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्या स्पर्धेत त्याच्या नावावर एकही गोल नव्हता. (FIFA world cup 2026)
मात्र, यंदाचा विश्वचषक त्याच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरला. त्याने स्पर्धेत पाच सामने खेळले आणि जवळपास सर्वच सामन्यांमध्ये सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळाली. या पाच सामन्यांत त्याने एकूण तीन गोल केले. त्यापैकी एक गोल स्पेनविरुद्ध होता, तर उर्वरित दोन गोल ‘राउंड ऑफ १६’मध्ये अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात केले.
फिफा विश्वचषक स्पेनच्या नावावर; फेरान टोरेस ठरला हिरो

फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. १९ जुलै रोजी न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेतील १०६व्या मिनिटाला फेरान टोरेसने केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. २०१० नंतर स्पेनने पुन्हा एकदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पेनने चेंडूवरील नियंत्रण राखत अर्जेंटिनावर वर्चस्व गाजवले. गतविजेत्या अर्जेंटिनाला स्पेनने इतके प्रभावीपणे रोखून धरले की सामन्याच्या ११७व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिनाला स्पेनच्या गोलपोस्टवर एकही ऑन-टार्गेट शॉट मारता आला नाही.
तरीही नियोजित ९० मिनिटांपर्यंत अर्जेंटिनाने स्पेनला गोल करण्यापासून रोखून धरले होते. मात्र, अतिरिक्त वेळ सुरू होण्यापूर्वीच ९०+३ मिनिटाला अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. परिणामी अर्जेंटिनाला उर्वरित सामना दहा खेळाडूंनी खेळावा लागला. (FIFA world cup 2026)
अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांची रणनीती सामना पेनल्टी शूटआउटपर्यंत नेण्याची होती. मात्र, अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या सत्रात स्पेनने अर्जेंटिनाचा बचाव भेदला.
निको विल्यम्सने गोलपोस्टसमोर अचूक हेडरद्वारे चेंडू फेरान टोरेसकडे पोहोचवला. टोरेसने डाव्या पायाने जोरदार फटका मारत चेंडू थेट जाळ्यात धाडला आणि स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यापूर्वी अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ भक्कम भिंतीप्रमाणे उभा राहिला होता. त्याने स्पेनचे तब्बल ११ ऑन-टार्गेट प्रयत्न हाणून पाडले होते.
या पराभवासह लिओनेल मेस्सीचा अखेरचा विश्वचषक निराशाजनक ठरला. अर्जेंटिनाला विजेतेपद मिळाले नाहीच, शिवाय मेस्सीला कोणताही वैयक्तिक पुरस्कारही मिळाला नाही.
सर्वोत्कृष्ट खेळाडू कोणकोण?
स्पेनचा मिडफिल्डर रोड्री याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गोल्डन बॉल पुरस्कार मिळाला. स्पेनच्याच पाओ कुबार्सीला यंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरविण्यात आले. फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पेने सर्वाधिक गोल करत गोल्डन बूट जिंकला, तर स्पेनचा गोलरक्षक उनाई सिमॉन याने स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षकाचा गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार पटकावला.