महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क
तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादाचा वाद एका नव्याच वळणावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने आंध्रप्रदेश सरकार व मुख्यमंत्र्यांना तीव्र शब्दांत फटकारले. देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा, असे खडे बोल सुनावले.
प्रसादाच्या लाडूसाठी वापरण्यात आलेल्या तुपात जनावरांची चरबी असल्याचा आरोप झाल्यानंतर देशभर मोठी खळबळ माजली होती. त्या संबंधात खंडपीठासमोर आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी अत्यंत तीव्र शब्दांत नाराजीची निरीक्षणे नोंदवली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपानंतर हा वाद उफाळला. आधीचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळातच तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा दावा नायडू यांनी केला होता. त्यामुळे देशभर खळबळ माजली होती.
खंडपीठाने सोमवारी नायडू यांच्यावर थेट ताशेरे ओढताना, ‘‘तुमच्या प्रशासनाने या संदर्भात चौकशीचे आदेश दिले असताना तुम्ही जाहीर वक्तव्ये करण्याची गरजच काय? असा सवाल केला. तुम्ही घटनात्मक पदावर आहात. आम्ही अशी अपेक्षा करतो की, तुम्ही देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा. भेसळयुक्त तुपाचा वापर झाला की नाही याबाबतचे तथ्य अद्याप तपासाच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत तातडीने प्रसिद्धी माध्यमांकडे धाव घेण्याची काय गरज होती? धार्मिक भावनांचा आदर करण्याची आत्यंतिक गरज आहे.’’
Tag: