नवी दिल्ली : भारताचा २१ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू अर्जुन एरिगैसी हा यावर्षी सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या बुद्धिबळ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. सध्या सुरू असणाऱ्या चॅम्पियन्स चेस टूर या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आघाडीच्या १२ बुद्धिबळपटूंमध्ये स्थान पटकावत त्याने वर्ल्ड कपप्रवेश निश्चित केला. (Arjun Erigaisi)
या वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करणारा तो भारताचा पहिलाच बुद्धिबळपटू ठरला आहे. या वर्षाच्या सुरुवातीस झालेल्या चेसेबल मास्टर्स स्पर्धेपासून त्याचा हा प्रवास सुरू झाला. या स्पर्धेमध्ये त्याने उपांत्य फेरीपर्यंत मज मारत ४० गुणांची कमाई केली. या कामगिरीमुळे त्याला चेस टूरसाठी १६ बुद्धिबळपटूंमध्ये स्थान मिळाले. चेस टूरमध्ये त्याला पहिल्या फेरीत इयान नेपॉम्नियाच्चीकडून ‘आर्मागेडॉन’ (टायब्रेकर) लढतीत पराभव पत्करावा लागला. भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेश याला या स्पर्धेमध्ये थेट प्रवेश मिळाला होता. परंतु त्याला पहिल्याच लढतीत रशियाच्या व्लादिमिर फेडोसिव्हने ३-१ असे नमवले. भारताचा रमेशबाबू प्रज्ञानंदही पहिल्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनकडून १.५-२.५ असा पराभूत झाला. (Arjun Erigaisi)
त्यानंतर, पहिल्या फेरीतील पराभूत आठ बुद्धिबळपटूंमध्ये प्ले-ऑफ लढती झाल्या. त्यामध्ये अर्जुनने गुकेशवर २-० अशी मात करून पहिल्या १२ बुद्धिबळपटूंमधील स्थान निश्चित केले. आता पुढील फेरीत त्याची लढत फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॅचिएर-लॅग्रेव्हशी होणार आहे. दरम्यान, अन्य प्ले-ऑफ लढतीत अमेरिकेच्या लिव्हॉन ॲरॉनियनने प्रज्ञानंदला २-१ असे नमवले. (Arjun Erigaisi)
हेही वाचा :
प्रणॉय, श्रीकांत, सतीश, आयुषचे विजय
आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला