सुनील कर्णिक यांनी फेसबुकवर दोन ओळींची एक पोस्ट टाकली. आटपाट नगरात, गावात एक गरीब ब्राम्हण रहात होता … ही भावनिक गोष्ट सांगणारे चांदोबा मासिक ब्राह्मणांनीच सुरू केले. लेखकही तेच होते. वारले बिचारे … मासिक.
या पोस्टवर मराठी साहित्यातील अनेक नामवंत व्यक्त झाले आणि खूप दिवसांनी एक साहित्यिक चर्चा रंगली. त्या चर्चेतील महत्त्वाच्या प्रतिक्रिया…
वाचनाची गोडी लागण्यासाठी पारंपरिक कथावाड्मय, अरेबियन नाईटस्, हातिमताई वगैरे प्रकारचं कथासाहित्य असलं पाहिजे. नंतर त्यापैकी मोजका वाचक गंभीर साहित्याकडं वळू शकतो. हे सर्व समाजांना लागू आहे. चांदोबात वेताळ पंचविशी, हातिमताई, रामायण-महाभारतातल्या गोष्टी, बिरबलाच्या गोष्टी आणि जगभरच्या लोककथांवर आधारित गोष्टी असत. चांदोबामध्ये फक्त ‘एका गावात एक गरीब ब्राह्मण राहात होता’ टाईप गोष्टीच होत्या असं म्हणणं फारच एकांगी आणि simplify करणं झालं. उलट इतकी वर्षं सातत्याने इतक्या वैविध्यपूर्ण कथावाड्मयाचं सचित्र खाद्य पुरवून भारतातल्या अनेक भाषांमधल्या दोनतीन पिढ्यांमधला वाचन वर्ग घडवला, हे चांदोबाचं मोठं काम आहे. त्यातली चित्रं अजूनही अनेकांच्या मनावर कोरली गेलेली आहेत. ही प्रभावक्षमता लक्षात घेऊन चांदोबामधल्या कथांच्या मर्यादा (किंवा बायसेस) याविषयी चर्चा होऊ शकते.
-नितीन रिंढे
तर मुद्दा आहे ‘चांदोबा’ या मासिकाचा. यावर/यानिमित्ताने चर्चा होणं चांगलंच आहे. यावरून मला भालचंद्र नेमाडे यांचे उद्गार आठवले. बऱ्याच जणांना ते आठवत असेल. ‘जी.ए.कुलकर्णींच्या कथा म्हणजे मोठ्यांचा चांदोबा’, अशाप्रकारचे ते उद्गार होते. त्यावेळी जीएंचे अनेक चाहते नाराज झाले होते. जी.ए.कुलकर्णी यांच्या कथांचं रुप अत्यंत देखणं, बांधेसूद असं आहे. नेमाडे जीएंच्या कथेतील आशयांसंबंधी बोलत असावेत. वाचकाची बौद्धिक वाढ झाल्यावर ते केवळ रुपावर भाळून एकाच ठिकाणी थांबणार नाहीत, असा काहीसा नेमाडेंच्या या म्हणण्याचा अर्थ लागतो. तर, होऊ द्या कथेवर चर्चा. अपवादात्मक रित्या का होईना इथे फेसबुकवर चांगल्या चर्चा झालेल्या आहेत.
-अविनाश गायकवाड
चांदोबाने मराठी वाचकांना बरेच काही दिले भारतीय लोककथा, गूढकथा, चित्रकथा आणि अद्भुताची भूक फक्त चांदोबाने शमविली. आम्ही ज्या गावात होतो तिथे चांदोबाशिवाय आणखी दुसरे साधन नव्हते.
-प्रमोद मुनघाटे
चांदोबा निघत राहिला आणि थांबला. पण सुरू होता तेव्हा आम्हीच कसे श्रेष्ठ किंवा ह्यांच्या मासिकात हे कसे नाही किंवा ते कसे ते करत नाही अशा गुर्मीत जगला नाही. आपण म्हणजे एक चळवळच असं म्हणत इतरांना कमी लेखत बसला नाही. संपल्यावरही वाचकच मठ्ठ अभिरुचीहीन वगैरे वैफल्यग्रस्त बडबड करत बसला नाही. चांदोबातील ‘जग आणि जगणं याविषयीची समज, आकलन वाढवणाऱ्या’ कथा त्या छापणाऱ्यांना नीट कळल्या होत्या हे याचे द्योतक आहे. म्हणूनच त्यावरील असुयायुक्त शेरेबाजी विरून जाते आणि चांदोबाचे अद्भूत जग आणि त्याने दिलेले भान कायम सोबत राहते.
-अभिराम भडकमकर
चांदोबा मीदेखील अनेक वर्षे वाचला. एक गोष्ट प्रकर्षाने आठवतेय ती म्हणजे राजे-रजवाडे, राण्या या चित्रातल्या मुली फार कमनीय बांध्याच्या असायच्या, डोळ्यात काजळ रेखलेल्या, सदैव तरतरीत आणि गरीब ब्राह्मण गोष्टीतल्या ब्राह्मण स्त्रिया जरा गोलमटोल, गरीब न वाटणाऱ्या असायच्या. स्त्रीवाद, जातीधर्मातली विषमता वगैरे न कळण्याच्या त्या काळात एक गोष्ट मनावर उगाच ठसून गेली की ब्राह्मणांच्या बाया म्हणजे ठेंगण्या, लठ्ठ, काटकसरी, प्रसंगी नवऱ्यालाही चार शब्द सुनावणाऱ्या, इ. इ. पुढे सगळेच भ्रम सरत गेले, ही गोष्ट वेगळी.
-योगिनी राऊळ
‘चांदोबा’ने बालवाचक व अर्थातच संभाव्य प्रौढवाचक घडविला. आज तोच प्रौढवाचक ब्राह्मण्याची चिकित्सा करायला सिद्ध झाला आहे. चांदोबा मासिकाच्या संचालकांपैकी एक बी.नागी रेड्डी (बोम्मा रेड्डी नागी रेड्डी) हे अब्राह्मण होते तर दुसरे चक्रपाणी (अलुरु वेंकट सुब्बाराव) हे ब्राह्मण होते. या दोघांची मैत्री अतूट होती. दोघांनी अनेक (जवळ जवळ ५०) चित्रपट निर्माण केले ज्यात अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम तसेच हिंदी चित्रपट आहेत.
-राहुल साखवलकर
मी वाचलंय साधारणपणे १९८५ ते १९९२ म्हणजे इयत्ता दहावी पर्यंत…. सिंहासन बत्तीशी, काशाचा किल्ला…. खूप काही होतं…. आजच्या दूषित जातीयतेच्या धुरकट चष्म्यापेक्षा माझ्या इयत्ता पाचवी ते दहावीचा तो एक चांगला मित्र होता…. आजकाल तर शोले मधील इमाम वरही वाद होतात, चांदोबा वर एखादा वार झाला तर नवल काय…
-किरण डोंगरदिवे
मला वाटतं की चर्चा चांदोबाच्या योगदानावर असेल तर पोस्टकर्त्यावर वैयक्तिक आणि जातवाचक शेरेबाजी असणाऱ्या कमेंट चर्चेत कसलीही भर घालत नाहीत आणि कमेंट करणाऱ्या व्यक्तीचा क्षुद्रपणा दर्शवतात.
-श्रद्धा कुंभोजकर
चांदोबाच्या, आणि पौराणिक कथा ऐकूनच माझ्या वाचनाला सुरूवात झाली आहे. खाऊचे पैसै जुळवून पहिलं पुस्तक तिसरीत असताना विकत घेतल ते म्हणजे पंढरीचा विठ्ठल….
-नम्रता फलके
बालकांच्या वयोगटाला साजेसा आशय. रोमांचक, कल्पनारम्य, अद्भुत. सतत वाचनरत ठेवणारा. भावी वाचकाची पायाभरणी. बाकी चर्चा बालवयात बेदखल असते. आणि असावीच. स्वानुभव.
-आल्हाद भावसार
मी सहमत आहे. मी लहानपणी चांदोबा, चंपक, बोक्या सातबंडे शिवाय बऱ्याच लोककथांची पुस्तकं वाचलीत. पण अर्थात चांदोबाने धार्मिक मूल्ये लहान मुलांच्या मनावर बिंबवली हे ही नाकारून चालणार नाही. पंचतंत्रातल्या बोधकथा या न्यूट्रल वाटतात पण नाहीयेत. आणि वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी वगैरे मुळातल्या कथा लहान मुलांसाठी आहेत का? हा पण प्रश्न आहे. त्याचं थोडं सॉफ्टनिंग करुनच त्या कथा चांदोबात आल्या आहेत. आणि त्यावर झालेले संस्कार आक्षेपार्ह आहेत. एका गावातला गरीब ब्राह्मण ही कर्णिक सरांची टीका अस्थानी नाही.
-आशिष शिंदे
चांदोबाचे संस्थापक होते बी (बोमीरेड्डी) नागी रेड्डी. हे गृहस्थ काही ब्राह्मण नव्हते. आंध्रात ज्यांना जमिनी असणारे शूद्र म्हटले जायचे तसे ते होते. ते क्षत्रिय असतात. कर्नाटकातले रेड्डी लिंगायत असतात. चांदोबाचे संपादक (खरं तर चंदामामाचे) चक्रपाणी नावाचे गृहस्थ होते त्याचं खरं नाव अलुरू वेंकट राव. राव हे नाव सर्व जातींत लावलं जातं. पण थोडे वगळता बहुधा अब्राह्मणच असतात. हे चक्रपाणी बहुभाषाविद् होते. दक्षिणेतल्या भाषा त्यांना अवगत होत्याच, पण क्षयबाधेमुळे त्यांना बंगालात जाऊन रहावं लागलं तेव्हा त्यांनी बंगाली शिकून घेतलं. आणि शरत्चंद्रांच्या बऱ्याच कादंबऱ्या तेलुगुत भाषांतरित केल्या. ते पौराणिक कथा, जुनं भारतीय साहित्य यांतून वाचनीय मजकूर किशोरवयीन मुलांना पचेल असा करून लिहित. हे मोठं काम होतं.
माझ्या लहानपणी मिळेल ते वाचायचो. रद्दीत चांदोबाचे अंक वजनावर मिळतात हे कळल्यावर मी ते आठाणे किलोवर आईकडून पैसे घेऊन आणायचो. मुळात तिला वाचायला येत नसलं तरी माझ्याकडून वाचून घ्यायला तिला आवडे. तिची कामं झाल्यावर मग मी तिला त्यातल्या गोष्टी वाचून दाखवत असे.
-गणेश विसपुते
स्वातंत्र्यानंतर नव्याने वाढत असलेल्या मध्यमवर्गाची चांदोबा ही गरज होती. हा मध्यमवर्ग वैयक्तिक स्किल्स आधारित नोकरी करणारा असल्याने अशा नोकऱ्या करत जगणाऱ्या तत्कालीन ब्राह्मण वर्गाकडे lookup करत असणे स्वाभाविक होते. त्यामुळे अर्थातच ब्राह्मण घरातील आचार, विचार, रीतिरिवाज अवगत करता येणे ही त्यांना गरज वाटली असावी. ही गरज ओळखून चांदोबाच्य मालक/संपादक मंडळी त्या अनुषंगिक लिखाण प्रसद्ध करत राहणे हे व्यवहारासाठी अनुकूल धोरणच. जर हा वर्ग व्यापारात असता तर त्या वर्गाने व्यापारी जातींमधील आचार विचार रीतिरिवाज पाळायचा प्रयत्न केला असता. विनाकारण ब्राम्हण bashing करण्यात अर्थ नाही.
-विनय गुप्ते
खोट्या गोष्टी खऱ्या वाटण्याच्या वयात चांदोबा वाचला. आता खऱ्या गोष्टी खोट्या वाटण्याचे दिवस आले आहेत.. आशा दिवसात आपल्या मतांना कोण किंमत देईल. पण खरं -खोटं लपत नाही. ते लपवून ठेवलं तरी अभिच्यक्तीच्या मर्यादा ओलांताना नजरेस पडतं. आता रील मध्ये चांदोबा डोकावतो.
-भरत दौंडकर
मासिक वारले गरीब ब्राह्मण श्रीमंत झाले..
पण गरिबी ही काही ब्राह्मणांची कथात्मक मक्तेदारी नव्हती. जे शोषित होते आणि असतात ते गरीबचं असतात. नव्हे ते दरिद्री असतात, कंगाल असतात. माझे अनेक ब्राह्मण मित्र खरेच गरीब होते आणि अनेक दलित श्रीमंत होतेच, पण पैशाचा माज दाखवणारे होते. अभ्यास, चिंतन, बांधिलकी शून्य. व्यसनी, मूर्ख आहेत. नवभांडवलशाहीने गरिबीत आणि श्रीमंतीत वर्गभेद, वर्णभेद, जातीभेद अन लिंगभेद मिटवला आहे. अनेक साम्यवादी अन समाजवादीही श्रीमंत आहेत. गरिबीची मर्यादा ठरलेली असते, ती “दरिद्री नारायण” सारख्या संकल्पनेत आढळते. पण श्रीमंतीला मर्यादा नसते, ती क्रूरतेवर आधारलेली आहे.
-श्रीनिवास हेमाडे.
ब्राह्मणांच्या गरिबीचे चलाख उदात्तीकरण असो की बिरबल शहाणा पंडित व बादशहा अकबर अगदीच मूर्ख दाखवून मुस्लिमांनी आपल्यावर इतके वर्ष राज्य केल्याने आलेल्या न्यूनगंडावर फुंकर असो. ही नेणीव घडविल्याने होणारे नुकसान ती नेणीव उलगडून दाखविल्याने भरून काढता येते.
मूर्ख दाखवायचा तर ‘शेखचिल्ली’च. आणि विनोदासाठी निर्बुद्ध पात्र निवडायचे तर ते सरदारजीचेच ! हा काही योगायोग नसतो. (हे ‘चांदोबा’ बाहेरही घडते) सांस्कृतिक सत्ता तिच्या ब्राह्मणी नेणिवेने वैदिकांविरोधी गुरू नानकांनी दिलेल्या स्वतंत्र दर्शनाची सल व्यक्त करत असतेच.
कुणाला अगदीच बिनडोक म्हणण्यासाठी तू ‘बुद्धू’ आहेस किंवा पोक्त माणसाला थेरडा संबोधने. हे सगळं योगायोगात धरता येत नाही. ही असली थेरं चालणार नाहीत … हा रोख थेरीगाथेकडे असतो.
त्यामुळे सांस्कृतिक अधिपत्य असणारे जे काही देणार त्यातूनच वाचक प्रबुद्ध झाल्यावर त्यातील अंतर्विरोध पकडणार.
-किशोर मांदळे