रांची; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीबांचा आदर करतो, असे सांगतात; पण ते कृषी कर्ज माफ करत नाहीत. मुंबईतील धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला. आम्ही मोदी यांना घाबरत नाही. ते अब्जाधीशांच्या हातचे बाहुले असल्यासारखे काम करत आहेत. ठराविक ‘मित्रां’च्या हितासाठी त्यांचे काम आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
झारखंडमधील ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत राहुल यांनी मोदी यांच्यावर हल्ला चढवला. गोड्डा येथील मेहरामा येथील निवडणूक रॅलीत मोदी यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, “मोदी हे अब्जाधीशांच्या हातचे बाहुले झाले आहेत. जे अब्जाधीश म्हणतात तेच मोदी करतात. गरिबांचा पैसा हिसकावून मोदी यांनी अब्जाधीशांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले आहेत. धारावीत एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानींना दिली. हे सत्य आहे, की महाराष्ट्रातील सरकार केवळ जमीन हडपण्यासाठी पाडण्यात आले आहे.
राहुल गांधी म्हणाले, “मोदी यांनी संविधान वाचले असते तर त्यांनी द्वेष पसरवला नसता. समाजात असंतोष निर्माण झाला नसता. भाजप राज्यघटना कचऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत, अशी टीका करून ते म्हणाले, ” “आमचे ‘प्रेमाची दुकान’ आहे, त्यांचा ‘द्वेषाचा बाजार’ आहे. आम्ही भाजपचा ‘द्वेष आणि हिंसाचार’ प्रेमाने संपवू शकतो.’’ प्रदीर्घ काळापासून जातीनिहाय जनगणनेचा पुरस्कार करणाऱ्या राहुल यांनी जातनिहाय जनगणनेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “जातीवर आधारित जनगणनेमुळे भारताचे चित्र बदलेल. यामध्ये आदिवासी, दलित आणि ओबीसींचे संस्थांमधील स्थान अधोरेखित केले जाईल.
या वर्षाच्या सुरुवातीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचा संदर्भ देत राहुल म्हणाले, की राज्यातील जनतेने निवडून दिलेल्या आदिवासी मुख्यमंत्र्यांना भाजपने तुरुंगात टाकले. आमच्यासमोर विचारधारांची लढाई आहे. काँग्रेस पक्ष आणि ‘इंडिया’ आघाडीचे लोक संविधान वाचवण्यासाठी काम करत आहेत, तर भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यघटनेच्या पुढच्या पानांचा रंग लाल आहे, की अन्य कोणता हे महत्त्वाचा नाही. मोदी यांनी ते वाचले असते, तर सर्वांमध्ये द्वेष पसरवला नसता. आमच्या संविधानात देशाचा आत्मा आहे, त्यात दलितांचा आदर आहे, मागासलेल्यांचा सहभाग आहे. शेतकऱ्यांची आणि मजुरांची स्वप्ने आहेत. भाजप आणि संघाच्या लोकांना ती मिटवायची आहेत; पण जगातील कोणतीही शक्ती राज्यघटना आणि ही स्वप्ने पुसून टाकू शकत नाही.
हेलिकॉप्टर रखडवले
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले. मंजुरी न मिळाल्यामुळे राहुल यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी देण्यात आली नव्हती. महागमामध्ये राहुल यांचे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले आहे. राहुल यांचे हेलिकॉप्टर सुमारे पाऊण तास थांबवले असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधान मोदी आज प्रचारासाठी झारखंडमध्ये होते. त्यांच्या चक्कीमध्ये जाहीर असल्याने राहुल यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी देण्यात आली नाही.