नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जनतेने नाकारलेले काही लोक संसदेत गोंधळ घालतात आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आहे. ते संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. लोकांच्या आकांक्षा त्यांना समजत नाहीत. ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, म्हणून जनता त्यांना पुन्हा पुन्हा नाकारते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली.
हिवाळी अधिवेशनापूर्वी मोदी बोलत होते. संसदेचे हे अधिवेशन अनेक अर्थांनी विशेष असल्याचे मोदी म्हणाले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या राज्यघटनेचा ७५ व्या वर्षात प्रवेश होणे ही लोकशाहीसाठी एक उज्ज्वल संधी आहे. संसदेत निरोगी चर्चा व्हावी, अधिकाधिक लोकांनी चर्चेला हातभार लावावा, अशी आमची इच्छा आहे; परंतु काही लोकांना संसदेचे कामकाज बंद पाडण्यात रस आहे. त्यांचा स्वतःचा उद्देश सफल होत नाही. देशातील जनता त्यांचे वर्तन पाहते आणि वेळ आली की त्यांना शिक्षाही करते. नवीन संसद नवीन कल्पना आणि ऊर्जा घेऊन येते. काही लोक त्यांचे हक्क दडपतात. त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही. जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असे मोदी म्हणाले.
ते म्हणाले, की मी विरोधी पक्षांच्या सहकाऱ्यांना वारंवार विनंती करतो. काही विरोधी नेत्यांना सभागृहात चर्चा व्हावी अशी इच्छा असते; पण ज्यांना जनतेने नाकारले, त्यांच्या भावना त्यांना समजत नाहीत. सर्वच पक्षांमध्ये नवे मित्र आहेत आणि त्यांच्याकडे नवीन विचार आहेत. आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. सदनाच्या वेळेचा उपयोग आपण लोकशाही बळकट करण्यासाठी केला पाहिजे.
संविधानाची प्रतिष्ठा वाढवा
लोकशाहीप्रती जनतेचे असलेले समर्पण लक्षात घेऊन आपणा सर्वांना जनतेच्या भावनेनुसार जगावे लागेल. हा संदेश भारतीय संसदेतून द्यायला हवा. आपण वाया घालवलेल्या वेळेवर थोडा पश्चात्ताप करूया. मला आशा आहे, की हे सत्र फलदायी ठरेल. भारताची जागतिक प्रतिष्ठा मजबूत केली पाहिजे. संविधानाची प्रतिष्ठा वाढवली पाहिजे. नवीन ऊर्जा शोषण्यास सक्षम असणे आवश्यक आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.