माउंट मांगानुई : न्यूझीलंडने तिसऱ्या वन-डे सामन्यामध्ये पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. या सामन्यात न्यूझीलंडने ८ बाद २६४ धावा करून पाकिस्तानचा डाव २२१ धावांत संपवला. (Series Win)
मैदानावर ओल असल्याने हा सामना दोन तास उशीरा सुरू झाला. त्यामुळे प्रत्येकी ४२ षटकांचा सामना खेळवण्यात आला. पाकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर ऱ्हायस मारियू आणि कर्णधार मायकेल ब्रेसवेलच्या अर्धशतकांच्या जोरावर ८ बाद २६४ धावांपर्यंत मजल मारली. मारियूने ६१ चेंडूंमध्ये ६ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. ब्रेसवेलने ४० चेंडूंमध्ये १ चौकार व ६ षटकार लगावताना ५९ धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलने ४३ धावा करून वन-डे कारकिर्दीतील २,००० धावांचा टप्पा ओलांडला. तो न्यूझीलंडकडून सर्वांत वेगवान २,००० धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ४७ डावांत हा टप्पा ओलांडून ५२ डावांत २,००० धावा करणाऱ्या अँड्य्रू जोन्स यांना मागे टाकले. पाककडून अकिफ जावेदने ६२ धावांत ४ विकेट घेऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. (Series Win)
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकचा कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. अब्दुल्ला शफीक (३३), महंमद रिझवान (३७), तय्यब ताहीर (३३) हे चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पाककडून बाबर आझमने ५८ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ५० धावा केल्या. न्यूझीलंडचा मध्यमगती गोलंदाज बेन सिअर्सने सलग दुसऱ्या सामन्यात ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला. त्याने ३४ धावांत ५ विकेट घेतल्या. ब्रेसवेल सामनावीर ठरला, तर मालिकेत १० विकेट घेणाऱ्या सिअर्सला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला. (Series Win)
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड – ४२ षटकांत ८ बाद २६४ (मायकेल ब्रेसवेल ५९, ऱ्हायस मारियू ५८, डॅरेल मिचेल ४३, अकिफ जावेद ४-६२, नसीम शाह २-५४) विजयी विरुद्ध पाकिस्तान ४० षटकांत सर्वबाद २२१ (बाबर आझम ५०, महंमद रिझवान ३७, तय्यब ताहीर ३३, बेन सिअर्स ५-३४, जेकब डफी २-४०).
हेही वाचा :
सूर्यकुमारच्या आठ हजार धावा पूर्ण