मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी २६ आरोपींना मोक्का लावला आहे. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईसह तीन आरोप फरारी आहेत. बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेकडून तपास करण्यात येत असून आतापर्यंत नवी मुंबई पुणे देशभरातून एकूण २६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात संशयित मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा समावेश आहे. तर शुभम लोणकर, जिशान मोहम्मद अख्तर हे आरोपी फरारी आहेत. बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांची सलमान खानची असलेल्या सलगी मुळेच त्यांची हत्या बिश्नोई गॅंग कडून करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.
काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि माजी मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते.