श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. या दहशतवाद्यांच्या कारवाया आणि भरती करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होताना दिसत आहेत. सीमेवर घुसखोरी करण्याऐवजी अंतर्गत भागात दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा डाव आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे, की दहशतवाद्यांना स्थानिक पाठिंबा कमी मिळत आहे आणि त्यांच्याविरुद्ध अचूक कारवायाही केल्या जात आहेत. राज्यात ११९ दहशतवादी सक्रिय असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यापैकी ७९ पीर पंजालमध्ये आहेत. यामध्ये १८ स्थानिक, तर ६१ पाकिस्तानी आहेत. पीर पंजालच्या दक्षिणेस ४० सक्रिय दहशतवादी आहेत. त्यापैकी ३४ पाकिस्तानी नागरिक आहेत, तर केवळ ६ स्थानिक दहशतवादी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षात आतापर्यंत २५ दहशतवादी घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये २४ जवानांचे बलिदान झाले असून गेल्या वर्षी २७ जवानांचे बलिदान झाले होते. या वर्षी ६१ दहशतवादी मारले गेले. त्यापैकी ४५ अंतर्गत भागात आणि १६ नियंत्रण रेषेवर मारले गेले. यापैकी २१ पाकिस्तानी होते. उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी ‘व्हाइट नाइट कॉर्प्स’ जम्मूला भेट दिली. त्यांनी येथे लष्करी ऑपरेशनला तयारीचा आढावा घेतला. नॉर्दर्न कमांडच्या प्रमुखांनी सुरक्षा दलांना दहशवाद्यांविरोधात सावधगिरीने कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले.
गेल्या पाच दिवसांपासून दहशतवादी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या काळात किश्तवाडमधील दोन घटनांमध्ये एक जेसीओ शहीद झाला, तर दोन गाव संरक्षण रक्षक दहशतवाद्यांनी मारले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कर विशेष मोहीम राबवत आहे. लष्कराने ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून माहिती दिली, की नॉर्दर्न कमांडच्या प्रमुखांनी लष्कराला दहशतवादविरोधी कारवायांमध्ये व्यावसायिकता आणि सतर्कतेचे सर्वोच्च मापदंड राखण्यास सांगितले आहे. धोके दूर करण्यासाठी आणि प्रदेशात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी जागरूक राहण्यासाठी त्यांनी सर्व संबंधितांमध्ये समन्वयावर भर दिला.