मुंबई : प्रतिनिधी : मुंबईत ३४ वाहनांमधून ४०० किलो आरडीएक्सचा वापर करुन मानवी बॉम्बस्फोट धमकी देणारा उत्तर प्रदेशातील संशयित ज्योतिषी आणि वास्तु अभ्यासक निघाला आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून उत्तरप्रदेशातील नोएडा येथून अटक केली आहे. अश्विनीकुमार असे त्याचे नाव आहे. (Astrologer arrested)
दोन दिवसापूर्वी मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा मेसेज आल्यानंतर पोलिस सतर्क झाले. या धमकीच्या संदेशात लष्कर ए जिहादी या दहशतवादी संघटनेचा उल्लेख होता. भारतात १४ दहशतवादी घुसल्याचा दावा देखील केला होता. या बॉम्बस्फोटात एक कोटी नागरिकांचा जीव जाईल अशी धमकी दिली होती. ऐन गणेशोत्सवात धमकीचा मेसेज आल्याने पोलिस अलर्ट झाले होते. त्यांनी तातडीने हायटेक यंत्रणेद्वारे शोध घेतला असता मेसेज पाठवणारा नोएडाच्या सेक्टर ७९ मध्ये रहात असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. अश्विनीकुमार असे त्याचे नाव आहे. बॉम्बस्फोटाच्या धमकीचा मेसज करताना त्याने फिरोज नाव वापरले होते. बॉम्बस्फोटाच्या धमकीसाठी मुस्लीम नाव वापरण्याचा त्याचा हेतूही उघड झाला. अश्विनी कुमार ज्योतिषी आणि वास्तू अभ्यासक आहे. तो पत्नीपासून विभक्त राहतो. आर्थिक गैरव्यवहारातही त्याचे नाव होते. २०२३ मध्ये आर्थिक वादातून त्याचा बिहारचा मित्र फिरोजने त्याच्याविरोधात पाटण्यातील फुलवारी शरीफ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावेळी अश्विनीकुमाराला तीन महिने तुरुंगात रहावे लागले. ज्या मित्राने तुरुंगवारी घडवली त्याला अद्दल घडवण्यासाठी अश्विनीकुमार याने फिरोजच्या नाव धमकीच्या मेसेससाठी वापरले होते, असे तपासात दिसून आले. (Astrologer arrested)