- अशोक वाजपेयी
एका सद्ग्रहस्थांशी सहज गप्पा सुरू असताना त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला. लेखक मंडळी जगाची एवढी चिंता का करतात, हेच कळत नसल्याचे ते म्हणाले. ही चिंता करणे हे लेखकांचे काम नाही, असेही त्यांनी म्हटले. त्यासाठी राजकारणी, समाजसेवक, विद्वान, अर्थतज्ज्ञ, विचारवंत अशी अनेक माणसे आहेत. जगाची चिंता करणे आणि त्यावर उपाय शोधणे हे त्यांचे काम आहे. लेखकाने मात्र स्वतःची, आपल्या अभिव्यक्तीच्या माध्यमाची, भाषेची वगैरे चिंता करावी.
ते पुढे म्हणाले की, थोडीफार जगाची चिंता असणे ठीक आहे; पण तीच लेखकाची एकमेव चिंता असता कामा नये. अशा चिंतेने सतत ग्रासलेले राहिल्याने जगाविषयी काही वेगळे किंवा अनपेक्षित हाती लागतेच असे नाही. त्यातून काही उपाय शोधण्याची प्रेरणाही मिळण्याची शक्यता कमी असते.
त्यांचा हा आक्षेप विचार करण्यासारखा आहे.
साहित्याच्या केंद्रस्थानी जग असते, हे निर्विवाद आहे. लेखक जगातील घडामोडींनी कधी आनंदित होतात, तर कधी व्यथित; पण ते जगाकडे दुर्लक्ष करीत नाहीत. लेखकांसाठी जग ही एक व्यापक, गुंतागुंतीची आणि सूक्ष्म वास्तवता असते. ती एक संकल्पनाही असते. आपापल्या स्वभावानुसार, आवडीनिवडीनुसार, दृष्टिकोनातून आणि कल्पनाशक्तीतून लेखक जगाकडे पाहतात, त्याला समजून घेतात आणि त्याचे अनुभव घेतात. मात्र, महत्त्वाचे लेखक तेच असतात, ज्यांचे साहित्य स्वतःचे एक स्वतंत्र जग निर्माण करते. समोर असलेल्या जगाच्या समांतर ते एक पर्यायी जग उभे करते. हे पर्यायी जग वर्तमान जगाचा अनिवार्यपणे विरोध करणारे असेलच असे नाही; पण ते या जगाच्या मर्यादा ओलांडणारे, त्यापलीकडे जाणारे आणि अधिक व्यापक शक्यता असलेले असते.
हेही वाचाः जेफ्री आर्चर: शास्त्रीयतेच्या संकल्पनेला आव्हान देणारा लेखक
हा विचार लक्षात घेतला, तर लेखकाने जगाची चिंता करणे ही त्याच्या अधिकाराबाहेरची गोष्ट नाही, हे लक्षात येईल. उलट, ती त्याच्या साहित्यिक माध्यमाचा अनिवार्य भाग आहे. लेखक जगात राहतो, त्यातच निर्मिती करतो, त्याचे अनुभव सहन करतो आणि त्याच्या सत्याची साक्ष देतो. अनेकदा लेखक समोर दिसणाऱ्या जगाला नव्हे, तर त्या जगात सक्रिय असलेल्या विविध व्यवस्थांना मानवता, न्याय, सौंदर्य आणि संघर्ष यांच्या कसोटीवर विरोध करतो.
जग केवळ लेखकांसाठी राखून ठेवलेले नाही, हे जितके खरे आहे, तितकेच ते केवळ राजकारण, धर्म किंवा अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रापुरतेही मर्यादित नाही. जगाची जबाबदारी फक्त याच क्षेत्रांवर सोपवता येणार नाही आणि सोपवूही नये. साहित्य हीदेखील जगाकडे पाहण्याची, ते समजून घेण्याची आणि त्यात बदल घडवण्याची एक दृष्टी आणि पद्धत आहे. जगाची चिंता केल्याशिवाय साहित्य हे काम पूर्ण करू शकत नाही.
साहित्याचे क्षेत्र प्रश्न उपस्थित करण्याचे
कदाचित आणखी ठामपणे असेही म्हणता येईल की, साहित्याच्या माध्यमातून जगाची जी समज आणि संवेदना आपल्याला मिळते, ती अन्य कोणत्याही माध्यमातून मिळत नाही. साहित्य आपल्याला जगाच्या अनेक अदृश्य पैलूंकडे घेऊन जाते. आपल्या सहानुभूतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारते. साहित्य नसलेल्या जगाची कल्पना करणे आज जवळजवळ अशक्य झाले आहे. जगाला आपल्या अफाट व्यापकतेची जाणीव करून देणाऱ्या घटकांमध्ये साहित्याचाही समावेश आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
साहित्याचे क्षेत्र प्रश्न उपस्थित करण्याचे आहे; उत्तरे किंवा उपाय देण्याचे नाही. तरीही जगात जे मूलभूत बदल घडले, ज्या क्रांती झाल्या, त्यामध्ये साहित्याची सक्रिय उपस्थिती होती आणि अनेकदा साहित्याने त्यात प्रत्यक्ष सहभागही घेतला, हे नाकारता येणार नाही.
मात्र, हेही खरे आहे की, साहित्यातील जगाची चिंता ही स्वतःची, भाषेची आणि शिल्पाची चिंता केल्याशिवाय परिणामकारक आणि अर्थपूर्ण होऊ शकत नाही. स्वतःमध्ये आणि जगामध्ये पूर्णपणे गुंतून राहिल्यानेच साहित्याला खरा आणि टिकाऊ अर्थ प्राप्त होतो.
हेही लक्षात ठेवले पाहिजे की, साहित्यात अनेकदा भविष्यातल्या घटनांचा पूर्वसंकेत मिळतो. साहित्य आपल्याला वेळीच सावध करते. एका अर्थाने ते समाजावर नैतिक पहारा ठेवते. अर्थात, समाज या सगळ्याचा किती प्रभाव घेतो, हा वेगळा प्रश्न आहे. समाज साहित्याची चिंता करो अथवा न करो, साहित्य मात्र समाजाची चिंता करते. हाच त्याचा स्वधर्म आहे.
मर्यादा आणि शक्यता
काही लोकांचे चांगले दिवस आले आहेत, हे निश्चित. अंधभक्ती त्यांना दिलासा देत आहे, आधार देत आहे. पण अशा लोकांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक लोकांना हा काळ असह्य आणि वाईट वाटत आहे. खोटेपणा, भय, फसव्या आश्वासनांचा मारा आणि द्वेषाच्या अतिरेकापासून जे दूर आहेत, त्यांना हे लक्षात येत आहे की केवळ सदिच्छा व्यक्त करून किंवा आशा बाळगून हे वाईट दिवस संपणार नाहीत. त्यासाठी नागरिकांना अधिक सक्रिय, धाडसी, निर्भय आणि संवेदनशील व्हावे लागेल.
आपले संविधान आणि त्याने दिलेली मूल्ये व अधिकार यांना बाधा पोहोचवली जात आहे. त्यांचे खंडितीकरण होत आहे. अशा वेळी असहाय्य शांतता आणि भित्रेपणा सोडून आपण आपला आवाज उठवला पाहिजे. सुदैवाने, अलीकडे तरुणांनी आणि नागरिकांनी निर्भयपणे, अहिंसक मार्गाने असा आवाज बुलंद केला आहे.
मात्र, त्याच वेळी आपण सावधही राहिले पाहिजे.
सलमान रश्दी यांनी एकदा म्हटले होते की, कविता बंदुकीची गोळी रोखू शकत नाही. कादंबरी बॉम्ब निकामी करू शकत नाही. पण म्हणून आपण पूर्णपणे असहाय्य आहोत, असे नाही.
ग्रीक पुराणातील ऑर्फियस हा संगीतकार. त्याचे शिर धडापासून वेगळे झाल्यानंतरही ते हिब्रस नदीच्या प्रवाहात वाहत असताना गात राहिले. गीत मृत्यूपेक्षाही अधिक सामर्थ्यवान असते, हे त्यातून सिद्ध झाले. या उदाहरणाचा संदर्भ देत रश्दी म्हणतात की, आपण सत्य गाऊ शकतो. खोटे बोलणाऱ्यांची नावे घेऊ शकतो. आपल्या सहकाऱ्यांशी, बांधवांशी परस्परांच्या नात्याची जाणीव व्यक्त करू शकतो. त्यांचा आवाज आणि आपला आवाज एकत्र करून तो अधिक बुलंद करू शकतो. पसरवल्या जात असलेल्या अप्रामाणिक आणि खोट्या कहाण्यांवर आपण सत्यकथा सांगून मात करू शकतो.
लेखक, कलाकार आणि बुद्धिजीवी आपल्या साहित्यिक, कलात्मक आणि बौद्धिक कृतीतून हे सर्व करू शकतात. अनेक जण तसे करतही आहेत. पण आजचे संकट इतके भीषण आहे की, एवढे करणे पुरेसे ठरणार नाही. हाच तो टप्पा आहे, जिथे समाजाची चिंता अधिक ठोस, अधिक दृश्यमान आणि अधिक बुलंद स्वरूपात व्यक्त झाली पाहिजे. हा आवाज विखुरलेला न राहता सामूहिक आणि संघटित स्वरूपात उमटला पाहिजे.
या दिशेने काही हालचाली नक्कीच सुरू आहेत. मात्र, त्यांना अद्याप स्पष्ट आणि व्यापक स्वरूप प्राप्त व्हायचे आहे.
अशा कोणत्याही अहिंसक आंदोलनात हिंदी भाषिक प्रदेशाची भूमिका विशेष महत्त्वाची ठरणार आहे. सर्वाधिक खोटेपणा आणि फसव्या आश्वासनांचा बाजार, द्वेष आणि धर्मांधता, हिंसा, जमावाकडून होणाऱ्या हत्या आणि बुलडोझरच्या कारवाया यांचे प्रमाण हिंदी भाषिक प्रदेशातच अधिक आहे. त्यामुळे या प्रवृत्तींविरोधातील प्रतिकारही याच प्रदेशात अधिक व्यापक आणि संघटित होण्याची गरज आहे.
तेथील लेखक, कलाकार, बुद्धिजीवी आणि तरुणांची पुढाकार घेण्याची तयारी आणि सक्रियता यावर बरेच काही अवलंबून असेल. लोकशाही, संविधान आणि स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांची पुनर्स्थापना करण्याच्या लढ्यात हा प्रदेश संथ किंवा निष्क्रिय राहणार नाही, अशी आशा आहे.
(लेखक हिंदीतले ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आहेत.)