नवी दिल्ली : आपल्या पंतप्रधानांना केवळ ‘तारीफ’ ऐकायला आवडते. त्यांना अमेरिकेकडून लादणाऱ्या टेरिफची कसलीही चिंता नाही. त्यांनी आता स्वत:ची ‘तारीफ’ (स्तुती) ऐकून घेण्यापेक्षा त्यांनी आता अमेरिकेच्या संभाव्या टॅरिफवर बोलले पाहिजे. ते ५६ इंच छातीबद्दल बोलतात, मग आता ही ५६ इंच छाती कुठे गेली?, असा टोला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.(Jairam Ramesh)
शुक्रवारी (७ मार्च) काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘पीटीआ’शी बोलताना मोदींवर टीका केली. परस्पर टॅरिफबाबत अमेरिकेकडून सतत धमक्या देण्याचा प्रयत्न होत आहे. अमेरिकेचे हे करधोरण हाताळण्यात पंतप्रधान मोदी यांच्या एकूणच भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रमेश यांनी संकेत दिले की, काँग्रेस येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सहामाहीत ट्रम्प यांच्या परस्पर टॅरिफ यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर देईल. अमेरिकेच्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोनाचा पुरस्कार आमचा पक्ष करेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे आणि ४ एप्रिल रोजी संपत आहे. (Jairam Ramesh)
रमेश यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावरही टीका केली. भारतीय मंत्री म्हणून बोलण्यापेक्षा ते अमेरिकन प्रतिनिधी असल्यासारखे बोलतात, असे रमेश म्हणाले.
रमेश यांनी ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी दृष्टिकोनावरही टीका केली. ते म्हणाले की, १७० देशांशी वाटाघाटी करून स्थापित केलेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या चौकटीला धक्का देत ट्रम्प आपले धोरण रेटत आहेत. परस्पर व्यापार संबंधांची वैयक्तिक व्याख्या करून ते जागतिक व्यापार संघटनेच्या अटींकडे दुर्लक्ष करीत आहेत. ‘‘तुम्ही शुल्क आकारता, मग मीही शुल्क आकारतो’’, असा ट्रम्प यांचा अट्टहास आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार अशा पद्धतीने चालत नाही. या नियमांवर वाटाघाटी झाल्या आहेत. जागतिक व्यापार संघटना ही जागतिक ट्रम्प संघटना नाही, असेही जयराम रमेश म्हणाले. (Jairam Ramesh)
इंदिरा गांधी यांची कणखर भूमिका
रमेश यांनी अमेरिकेतून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या हद्दपारीबद्दलही चिंता व्यक्त केली. लहान राष्ट्रेही आपल्या भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत. भारतासारख्या बलाढ्य देशाचे नेतृत्व मात्र गप्प राहते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नोव्हेंबर १९७१ मध्ये राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्याविरुद्ध तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठाम भूमिका घेतली होती. राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण कसे करायचे असते ते या उदाहरणावरून दिसून येते. त्यांनी सर्वपक्षीय बैठकींबद्दल सरकारच्या दृष्टिकोनावर टीका केली. अमेरिकेतून भारतीय निर्वासितांच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला. विशेषतः पंजाब, हरियाणा आणि गुजरातमधील स्थलांतरितांना जी वागणूक देण्यात आली त्याबद्दल रमेश यांनी आक्षेप नोंदवला. (Jairam Ramesh)
ट्रम्प भारतासारख्या देशाला धमकावत आहेत. आता पंतप्रधानांनी स्पष्टपणे बोलले पाहिजे. पंतप्रधान ‘५६ इंच छाती’बद्दल बोलतात, आता त्यांची ‘५६ इंचाची छाती’ कुठे आहे? इंदिरा गांधींनी नोव्हेंबर १९७१ मध्ये तत्कालीना राष्ट्राध्यक्ष (रिचर्ड) निक्सन यांना काय सांगितले होते ते आठवते का? राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि हेन्री किसिंजर यांनी भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता, पण इंदिरा गांधी उभ्या राहिल्या आणि, ‘मी भारताच्या हिताचे काम करेन’, असे सुनावले अशी आठवणही रमेश यांनी यावेळी सांगितली.
हेही वाचा :