-सायली परांजपे
फतेहपूर सिक्री या स्थळाचं महत्त्व हे उत्तम स्थापत्य, त्यामागचा इतिहास यांहून खूप वेगळं आहे. ज्या काळात धर्म हा माणसाच्या जगण्याचा, ओळखीचा महत्त्वाचा भाग होता, त्या सोळाव्या शतकात सम्राट अकबराने स्थापन केलेल्या दिन-ए-इलाही या सेक्युलॅरिझमची भाषा बोलणाऱ्या धर्माचं फतेहपूर सिक्री हे जन्मस्थान आहे.
माझा जन्म आणि बालपण धुळ्यात गेलं. आमच्या धुळ्यातून आग्रा रोड जातो. मुंबई-आग्रा रोडवरचं धुळं हे ट्रक ट्रान्सपोर्टर्ससाठीचं महत्त्वाचं स्टेशन आहे. त्यामुळे उगाचच लहानपणापासून आग्रा म्हटलं की काहीतरी जवळिकीची भावना मनात उमटते. कारण, प्रत्यक्ष आग्रा धुळ्यापासून साडेनऊशे किलोमीटर दूर असलं तरी आग्रारोड आमच्या दैनंदिन संवादात रोज येणारा शब्द. ताजमहाल वगैरे गोष्टी नंतर कळल्या. आग्रा हा शब्द पूर्वीपासून परिचयाचा. असो.
तर आग्र्याला जाण्याचा योग अखेर आला. आग्र्याहून अर्थातच फतेहपूर सिक्रीला जायचं ठरवलं होतं. ताजमहाल शुक्रवारी बंद असतो. त्यामुळे ताजमहालाचं सौंदर्य डोळ्यांत साठवण्यापूर्वीच फतेहपूर सिक्रीला गेलो. आग्र्यापासून ३९ किलोमीटर अंतरावर असलेलं फतेहपूर सिक्री. सम्राट अकबराने वसवलेलं आणि अप्रतिम स्थापत्यांचं शहर ही या शहराची शाळेतल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाने करून दिलेली ओझरती ओळख. अर्थात या पलीकडे कितीतरी गोष्टी कळणार होत्या, प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होत्या प्रत्यक्ष या शहरात गेल्यावर.
हे शहर अकबराने जरी वसवलं असलं तरी आग्र्याजवळचा हा ओसाड भाग फुलवण्याची सुरुवात सम्राट बाबराच्या काळातच झाली होती. बाबराच्या काळात या गावाचा उल्लेख शुक्री अर्थात कृतज्ञता असा येतो. बाबर आणि हुमायूनही या भागात येत असत. राजधानीतल्या गोंधळापासून दूर काही काळ निवांत घालवण्यासाठी यमुनेच्या काठी या गावात काही उद्यानं तयार करण्यात आली होती. अकबराने त्या पुढे जाऊन हे शहर वसवलं आणि १५७१ मध्ये आपली राजधानीच इथे हलवली. स्थानिक गाइड्स सांगतात त्यानुसार अकबराला बरीच वर्षं मुलगा नव्हता. संत शेख सलीम चिश्ती यांनी सांगितल्याप्रमाणे १५६९ मध्ये जहांगीराचा जन्म सिक्री गावात झाला. त्यामुळे अकबराने या ओसाड जागी (इथे नवव्या-दहाव्या शतकात वस्ती होती आणि कदाचित जैन धर्माचं प्राबल्य होतं असं सांगणारे पुरावे उत्खननात मिळाले आहेत.) शहर वसवलं आणि राज्यकारभार इथूनच बघण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच मुघलांना गुजरातमध्ये मिळालेल्या विराट विजयाचं प्रतीक म्हणून इथला प्रसिद्ध बुलंद दरवाजा उभारण्यात आला आणि या शहराचं नावही फतेहपूर सिक्री करण्यात आलं.
फतेहपूर सिक्रीमध्ये अकबराने बांधून घेतलेल्या किल्ल्याचं अर्थात त्याच्या राजवाड्याचं स्थापत्य तर अप्रतिम आहेच. आजही डोळ्याचं पारणं फेडेल असं कोरीवकाम या राजवाड्यात आहे. सौंदर्यदृष्टी आणि कार्यात्मकता यांचा उत्तम मिलाफ यात आहे. लाल रंगाच्या दगडात बांधलेली ही वास्तू नेत्रसुखद तर आहेच, शिवाय या भागातल्या टोकाच्या हवामानापासून संरक्षण करणाऱ्या अनेक बाबी स्थापत्यात अंगभूत आहेत. हा किल्ला प्रामुख्याने मुघल स्थापत्यशास्त्राचा नमुना समजला जात असला, या वास्तूवर गुजरातमधल्या काही वास्तूंचा प्रभाव आहे असं म्हणतात.
हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही संस्कृतीतील स्थापत्याचा उपयोग या किल्ल्यामध्ये करण्यात आला आहे आणि यामागचा उद्देश केवळ दोन्ही स्थापत्यातलं उत्तम घेऊन अद्वितीय किल्ला बांधणं हा नव्हता, तर प्रजेतल्या हिंदू व मुस्लिम दोन्ही धर्मांच्या लोकांना तो आपलासा वाटावा हाही होता. यातच फतेहपूर सिक्रीच्या राजवाड्याचं वेगळेपण आहे.
फतेहपूर सिक्री या स्थळाचं महत्त्व हे उत्तम स्थापत्य, त्यामागचा इतिहास यांहून खूप वेगळं आहे. ज्या काळात धर्म हा माणसाच्या जगण्याचा, ओळखीचा महत्त्वाचा भाग होता, त्या सोळाव्या शतकात सम्राट अकबराने स्थापन केलेल्या दिन-ए-इलाही या सेक्युलॅरिझमची भाषा बोलणाऱ्या धर्माचं फतेहपूर सिक्री हे जन्मस्थान आहे. प्रजेमध्ये बहुसंख्येने असलेले हिंदू, मुस्लिम राज्यकर्ते, प्राबल्य कमी झालेले तरीही अस्तित्व टिकवून असलेले जैन-बौद्ध धर्म, पाश्चिमात्य देशांतून सुरुवातीला व्यापाराच्या निमित्ताने येऊन इथलेच झालेले ख्रिश्चनधर्मीय, इराणमधून आलेले पारशी अशा विविध धर्मांचं सार एकच आहे असा विचार मांडणारा दिन-ए-इलाही हा धर्म सम्राट अकबराने १५८२ मध्ये स्थापन केला तो याच किल्ल्यात.
वेगवेगळ्या धर्मांचं सहअस्तित्व मान्य करणारा सम्राट अकबर त्याच्या दैनंदिन आयुष्यात ते आचरणातही आणत होता. त्याच्या नवरत्नांमध्ये राजा तोडरमल, बिरबल, तानसेन, राजा मानसिंह यांसारखे हिंदूधर्मीय होते आणि जनानखान्यातल्या राजपूत राणीबद्दल तर सर्वांना माहीत आहेच पण त्यात पोर्तुगीज राणीही होती. (इतिहासात याबद्दल अनेक मतं-मतांतरं आहेत. मात्र, फतेहपूर सिक्रीची माहिती देण्यासाठी पुरातत्त्वखात्याने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत अकबराच्या ख्रिश्चन राणीचा उल्लेख आहे आणि तिचा महालही किल्ल्यामध्ये आहे). प्रजेतल्या मुस्लिमेतर नागरिकांकडून अतिरिक्त कर घेण्याची पद्धत अकबराने १५६८ सालीच बंद केली होती (पुढे औरंगजेबाने ती पुन्हा सुरू केली). अन्य धर्माच्या विचारांप्रती, लोकांप्रती सहिष्णुता हा अकबराच्या विचारांचा पाया होता. एवढंच नाही, तर तत्त्वज्ञानाच्या तसेच धार्मिक विषयांवर निकोप चर्चा, वादविवाद झाले पाहिजेत या मताचा तो होता. म्हणूनच फतेहपूर सिक्रीच्या किल्ल्यात त्याने १५७५ मध्ये ‘इबादत खाना’ स्थापन केला आणि यात विविध धार्मिक तसंच तत्त्वज्ञानविषयक मुद्द्यांवर तो विद्वानांमध्ये चर्चा घडवून आणत असे. या चर्चांमध्ये भाग घेण्याची मुभा हिंदू, मुस्लिम, रोमन कॅथलिक, जैन धर्मांतल्या लोकांनाच नव्हे, तर ईश्वराचं अस्तित्वच नाकारणाऱ्या नास्तिकांनाही होती. या सर्व धर्मांतल्या विद्वानांच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर होता. सत्य ही कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नाही, तर ते सर्व धर्मांत वसलेलं आहे या निष्कर्षापर्यंत अकबर आला तो या इबादत खान्यात झालेल्या मंथनातूनच. त्यातूनच सर्व धर्मातल्या चांगल्या शिकवणींचा संयोग साधणाऱ्या दिन-ए-इलाही या धर्माचा पाया रोवला गेला. त्या काळात दिन-ए-इलाही नव्हे, तर तवहीद-ए-इलाही अर्थात दैवी एकेश्वरवाद हे नाव या तथाकथित धर्माला देण्यात आलं होतं, असा उल्लेख अबु-अल-फझलच्या साहित्यात सापडतो.
अर्थात या धर्मामध्ये एकेश्वरवादाचा पुरस्कार असला तरी विविध संस्कृतींचं वैविध्य आणि सहअस्तित्वही संकल्पनाही दिन-ए-इलाहीसाठी महत्त्वाची होती. फतेहपूर सिक्री किल्ल्यातल्या प्रत्येक बांधकामात सर्व धर्मांच्या सहअस्तित्वाची अर्थात सेक्युलॅरिझमची प्रतिकं जाणीवपूर्वक विणलेली आहेत. यातल्या कोरीवकामात सर्व धर्मांतली शुभचिन्हं आहेत, संकल्पना आहेत. स्वस्तिक, ओम, कमळ आहे, चाँदतारा आहे आणि क्रॉसही आहे. एवढंच नाही तर इथल्या स्तंभांवर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध या सर्व धर्मांची ओळख सांगणारी शिल्पं आहेत. झोराष्ट्रियन प्रतिकंही यात आहेत. राण्यांच्या महालांमध्ये त्यांच्या वैविध्यपूर्ण संस्कृतींचं प्रतिबिंब दिसतं. अगदी पोर्तुगीज राणीच्या महालातल्या कोरीवकामात वाइन बॉटल्सही दिसतात.
फतेहपूर सिक्रीच्या किल्ल्यात अकबराची पहिली पत्नी रुकय्या बेगमचा महाल, जोधाबाईचा महाल, पोर्तुगिज राणीचा महाल, तोडरमलाचा महाल, बिरबलाचा महाल या अनेक वास्तू आपली स्वतंत्र ओळख घेऊन उभ्या आहेत. यातले स्तंभ, कोरीवकाम, शिल्पकला वेगवेगळ्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत आहेत. तरीही या वास्तू एकमेकींच्या सोबतीने उभ्या आहेत. कोणे एके काळी या वास्तूंमध्ये वेगवेगळ्या संस्कृतींचं पालन करणारी माणसं आपली ओळख जपून एकमेकांच्या सोबतीने राहत असतील.
अकबराला धर्मवेड्यांचा विरोध
अकबर सम्राट होता तरी धर्मवेड्यांचा विरोध त्यालाही सहन करावा लागलाच. दिन-ए-इलाही या धर्माची (मुळात याला धर्म म्हणायचं की नाही यावरही वाद होतेच) स्थापना करणं म्हणजे ईश्वरनिंदा अर्थात ब्लासफेमी असल्याचा आरोप अनेक कडव्या मुस्लिमांनी त्याच्यावर केला. हा तथाकथित धर्म तात्त्विक पायावर व बुद्धिवादावर आधारित असल्याने त्याच्या अनुयायांची संख्याही मोजकीच राहिली. १५८५ मध्ये पंजाबमधल्या मोहिमांमुळे अकबर फतेहपूर सिक्री सोडून तिकडे गेल्यामुळेही हा धर्म सामान्यांपर्यंत पोहोचू शकला नसेल.
ताजमहाल प्रेमाचं प्रतीक म्हणून अमर आहे. कमालीचं वैभव आणि पराकोटीची शांतता याचं दर्शन एकाचवेळी देणारा शुभ्र संगमरवर आणि त्यातून साकारलेलं अचंबित करणारं स्थापत्य अशा या ताजमहालाचं सौंदर्य अचंबित करून टाकतं. मात्र, ताजमहालापासून थोड्याच अंतरावर फतेहपूर सिक्रीमध्ये सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी आकाराला आलेलं सहअस्तित्वाचं प्रतीक मनात घर करून जातं आणि सध्याच्या काळाच्या संदर्भात काही प्रश्नही निर्माण करतं.
उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेश पर्यटन खात्याच्या ३२ पानी बुकलेटमधून ताजमहालाचं नाव पुसून टाकण्याचा उद्योग तर यापूर्वीच झालेला आहे. मुघलांची थडगी हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही, हे खरं तर हिंदू मंदिर आहे असे तारे सध्याचे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीच तोडले होते. जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाची ही कथा तर फतेहपूर सिक्रीच्या राजवाड्याबद्दल काय बोलणार.
गेल्या साडेचारशे वर्षांत कित्येक धर्मवेड्यांनी, यात खुद्द अकबराच्या चौथ्या पिढीतला सम्राट औरंगजेबाचाही समावेश होतो, विविध धर्मांचं सहअस्तित्व नष्ट करून एकाच धर्माच्या रंगात सर्व काही रंगवण्याचा प्रयत्न केला असेल, त्यात त्यांना तात्पुरतं यशही मिळालं असेल पण सहिष्णुता, सहअस्तित्व कायमचं पुसून टाकणं कोणालाही शक्य झालेलं नाही. सध्याचा कालखंडही असाच तात्पुरता ठरावा, दुसरं काय?