कागल : जिल्ह्यातील चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी डबल हॅटट्रिक केली आहे, तर जिल्ह्यात डबल हॅटट्रिक करणारे पहिले आमदार ठरले आहेत. समरजितसिंह घाटगे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यावर त्यांनी ११ हजार ६३२ मतांनी हा विजय संपादन केला आहे. मुश्रीफ यांना एक लाख ४५ हजार २५७ मते मिळाली, तर समरजितसिंह घाटगे यांना एक लाख ३३ हजार ६२५ मते मिळाली. या निवडणुकीत पालकमंत्री मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी होऊन विजयाचा षटकार मारणार, की समरजितसिंह घाटगे हे त्यांची विकेट घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दोघांमधील लढत काट्याची टक्कर अशीच होती.
Ajit Pawar
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेतील पराभव विसरत महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीने मोठा कमबॅक केला आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी माझ्या लाडक्या बहिणींचे मनापासून अभिनंदन करतो. राज्यात महायुती सरकारने केलेल्या कामांची पोचपावती मिळाली आहे. या दणदणीत विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. राज्यातील जनतेला त्रिवार वंदन करतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. (Eknath Shinde)
एकनाथ शिंदे यांनी नेत्यांसह मिठाई वाटप करून आनंद साजरा केला. पुढे बोलताने एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे अजून ठरलेले नाही. निवडणुकीचा स्पष्ट निकाल येवू द्या. जसे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो. तसेच महायुती म्हणून एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेवू असे एकनाथ शिंदे म्हणाले.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महायुतीने राज्यातील २८८ पैकी २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी २० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान निकाल स्पष्ट होताच महायुतीने सत्ता स्थापन करण्याची तयारी केली आहे.
कोल्हापूर; प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीतील पराभव विसरुन महायुतीने विधानसभा निवडणूकीत दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेऊन सत्तास्थापनेकडे आश्वासक वाटचाल केली आहे. महाविकास आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागत असून मतदानाचा कलात त्यांचा आकडा ५० च्या आसपास स्थिर आहे. भाजपने १२५ अधिक जागांवर आघाडी घेतल्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असून केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार की, सरप्राईज चेहरा देणार हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. (Mahayuti)
आज (दि.२३) सकाळी आठ वाजल्यापासून २८८ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासून महाविकास आघाडीने पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली होती. पण सकाळी दहा वाजेपर्यंत महायुतीने जबरदस्त मुसंडी मारुन दोनशे पारचा टप्पा गाठला. महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मंत्री अदिती ठाकरे, दीपक केसरकर, भाजपचे अमल महाडिक, यांनी विजय नोंदवला असून महायुतीच्या उमेदवारांनी मोठे मताधिक्य घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.
मतमोजणीचा कल स्पष्ट होऊ लागल्यावर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी नृत्य करुन आनंद साजरा केला. लाडू पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला.
पुणे : प्रतिनिधी : महायुतीने विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची गटबाजी टाळण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सादर केला नव्हता; मात्र आता निवडणुकीचे निकाल काही तासांवर आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करणारी पोस्टर लावली आहेत. पुण्यातील पक्षाचे नेते संतोष नांगरे यांचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; मात्र यावरून वाद सुरू झाल्यावर हे पोस्टर काढण्यात आले. भाजप आणि शिवसेनेला (शिंदे) हे पोस्टर आवडले नाही. (Ajit Pawar)
पवार यांचे वर्णन काही पोस्टर्सद्वारे भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आले आहे. अशी पोस्टर्स बारामतीत लावण्यात आली आहेत. पवार बारामतीतूनच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधून अजित पवार यांच्याविरोधात आवाज उठवण्यात आला होता, हे येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे. केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघच नाही, तर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादांसोबतची युती तोडली पाहिजे, असे म्हटले होते. अनेक कामगारांनी खुल्या मंचावर ही मागणी केली होती. त्या वेळी सर्व गोंधळाकडे दुर्लक्ष करून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निवडणुकीत अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
बारामती; प्रतिनिधी : विरोधकांकडून मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला. बारामती मतदारसंघातील काही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर परिसरात दोन्ही पवार गट आमने सामने आले. त्यानंतर वाद झाला. त्यावर शर्मिला पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मतदारांना घड्याळाच्या शिक्क्यांच्या स्लिपचे वाटप करत त्यांना धमकावल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मतदारांना दिलेल्या चिठ्ठ्यांच्या मागे घड्याळाचा शिक्का असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या तक्रारीही आल्या असल्याचे त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, मतदारांकडे चिठ्ठ्या होत्या. त्यावर शिक्के मारून आत सोडले जात आहे. इतर ठिकाणी बूथवर फिरत होते. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला धमक्या आल्या. संपवतो, खल्लास करतो, अशी भाषा येथे सुरू आहे. हवे असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा अशी मागणीही त्यांनी केली.
अजित पवार यांनी आरोप फेटाळले
शर्मिला पवार यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले. मी एवढ्या निवडणुका लढल्या, पण कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशी वक्तव्य केलेली नाहीत. माझा कार्यकर्ता असे कधीही वागणार नाही. तसे काही घडलेले असेल तर तिथल्या सीसीटीव्हीमध्ये सगळे रेकॉर्ड झालेले असेल, निवडणूक अधिकारी ते तपासतील, असे अजित पवार म्हणाले.
मुंबई : विशेष प्रतिनिधी : योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्राचे सरकार चालवणार नाही. त्यामुळे ‘बटेंगे तो कटेगे,’ ही विचारसरणी आपल्याला मान्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.
विधानसभा निवडणूक प्रचारातील ‘बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है,’ या घोषणाबाबत भाजपा व महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले असताना आता उपमुख्यमंत्री पवार यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे.
नवाब मलिक यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत हे लढवय्या नेते आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.
आपल्या देशात सगळ्या जातीधर्माचे लोक राहतात, त्यामुळे एकत्र राहावे लागेल. महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्यांनाच लोक जास्त पसंत करतात, असे सांगून नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबाबत म्हणाले की,
मी त्यांना १९९० पासून त्यांना ओळखतो. त्यांच्यावर केलेल्या आरोपातील प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग नाही हे मला माहिती आहे. मलिक यांना उमेदवारी देऊ नका, असे मला सांगण्यात आले होते. पण त्यांची चूक नसताना त्यांच्यावर अन्याय होणे योग्य नव्हते. त्यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला नसताना त्यांना बाजूला ठेवणे योग्य नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या गोष्टींवर बोलताना अजित पवार म्हणाले की, पत्नी सुनेत्रा यांना बारामतीतून उभे करणे ही चूक होती. मला ते मान्य आहे. आता लोकसभेत सुप्रियाताईंना आणि विधानसभेत मला पाठिंबा देणार असल्याचा निर्धार बारामतीच्या जनतेने केला आहे. राष्ट्रवादीच्या विचारसरणीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आमचा पक्ष शरद पवार यांच्या विचारधारेवर चालतो. धर्मनिरपेक्षतेवर आमचा विश्वास असून यापुढेही त्यावरच वाटचाल सुरू राहणार आहे.
कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांचे आत्महत्येचे धनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पापाचे धनी आहेत, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केली. राज्यात फोडाफोडीचे राजकारण होऊनही कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते महिलांचा सन्मान न करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना या निवडणुकीत जागा दाखवतील, असा विश्वासही व्यक्त केला.
गांधी मैदान येथे महाविकास आघाडी आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रियांका गांधी यांच्या सभेत ते बोलत होते. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी त्रिसूत्री कारिडॉर सुरू करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस सतेज पाटील यांनी व्यक्त केला. इंडस्ट्रियल कारिडॉर, आयटी हब, चित्रनगरी आणि उद्योगनगरीला ऊर्जितावस्था, तीर्थक्षेत्राचा विकास, गडकोट किल्ल्यांचे जतन, क्रीडानगरी या विषयांवर लक्ष केंद्रित करून जिल्ह्याचा विकास केला जाईल, असे आश्वासन दिले.
लोकसभा निवडणुकीत जनतेने चांगला कौल दिल्याने भाजप सरकार थोडक्यात वाचले, पण विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीला हद्दपार करेल, असा विश्वास खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी अशी शूरवीरांची आणि महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराची असलेली कोल्हापूरची स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीला राज्यात सत्तेत आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ऑलिंपिक कास्यपदक विजेते बजरंग पुनिया म्हणाले, कुस्तीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता घालवली. सर्व जातीच्या मल्लांमध्ये समतेची भावना निर्माण करून त्यांच्यात स्वाभिमान जागवला. याच भूमीतील खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले कास्यपदक मिळवून दिले. शूटिंगमध्ये स्वप्नील कुसाळे याने पदक मिळवून दिले. पण कोल्हापुरात आतंरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती आणि शूटिंग खेळाची अकॅडमी नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
यावेळी आमदार विश्वजित कदम, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर, बेळगाव- खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार के.पी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकर, राहुल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, शिवसेना शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, सुनील मोदी, अतुल दिघे, बाबूराव कदम, शिवाजीराव परुळेकर यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आपचे संदीप देसाई, दगडू भास्कर, कॉ. दिलीप पवार, चेतन नरके, राहुल देसाई आदी उपस्थित होते.
इंदिरा गांधी, डी. वाय.पाटील यांच्या आठवणींना उजाळा
१९७६ मध्ये इंदिरा गांधी यांची सभा सायंकाळी सहा वाजता होती, पण ती रात्री एक वाजता सुरू झाली. त्याच मैदानावर प्रियांका गांधी यांची सभा होत आहे, अशी आठवण सतेज पाटील यांनी भाषणात सांगितली. काळम्मावाडी धरणाची पायाभरणी इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली होती, तर त्याच धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, अशी आठवण प्रियांका गांधी यांनी भाषणात सांगितली.
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला वेगळी ओळख म्हणून उतरावे लागेल, असे न्यायालयाने सांगितले.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, की शरद पवार यांच्याशी तुमचे वैचारिक मतभेद आहेत. विधानसभा निवडणुकीत तुम्ही त्यांच्या विरोधात आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निवडणुकीचा प्रचार करताना तुम्ही शरद पवार यांचा जुना अथवा नवा व्हिडिओ किंवा फोटो वापरू नका. याच्या अंमलबजावणनीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना परिपत्रक जारी करा. वेगळा राजकीय पक्ष म्हणून स्वतःची ओळख बनवा.
महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याआधीच्या सुनावणीत, न्यायालयाने अजित पवार गटाला चिन्हाविषयी निर्देश दिले होते. यावेळी न्यायालयाने स्पष्ट सांगितले होते, की महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ठळक जाहिराती द्या. यामध्ये घड्याळ चिन्हासह हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, याचा उल्लेख करावा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करा.
शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न, अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवाद
शरद पवार यांची बाजू मांडताना वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी पोस्टरवरील काही फोटो आणि सोशल मीडिया पोस्ट न्यायालयाच्या निर्दशनास आणून देत, ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे उमेदवार अमोल मिटकरी यांनी केवळ शरद पवार दिसत असलेला फोटो प्रसिद्ध केल्याचे दाखवून दिले आणि अजित पवारांकडून शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा त्यांनी सांगितले.
अजित पवार यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील बलबीर सिंग यांनी आरोप फेटाळून लावले. त्यांनी दावा केला की जे काही दाखवण्यात आले आहे त्यात छेडछाड करण्यात आली. त्यावर सिंघवी यांनी प्रत्युत्तरादाखल म्हटले की, सदर व्हिडिओ अमोल मिटकरी यांच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता.
मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणाचा जो चिखल झाला, त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री व्हायचे, म्हणून त्यांनी जनतेचे मतदान नाकारून काँग्रेसशी बस्तान बांधले. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, असे ते म्हणाले.
आपली विचारप्रणाली सोडून दुसऱ्याच्या विचारप्रणालीत बसायचे, त्यानेही ती गोष्ट स्वीकाराची, अशी गोष्ट कधी पाहिली नाही. माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली, तर मी त्याच दिवशी दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले; पण यांनी त्यांच्याच बाजूला दुकान मांडले. त्यांनी बाळासाहेबांच्या नावाच्या आधीचे हिंदुहृदयसम्राट काढून टाकले, अशा शब्दांत उद्धव यांच्यावर हल्ला चढवत ते म्हणाले, की उद्धव यांच्या व्यक्तिगत महत्वकक्षेतून हे झाले. मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे यासाठी भाजपशी सौदा गेला.
मोदी, अमित शाह वेगवेगळ्या सभेत आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सांगत होते, त्यावेळी का आक्षेप घेतला नाही? सुरुवातीला शरद पवार यांच्यांशी बोलायला सुरुवात केली. अजित पवार यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात टाकणार होते, त्यांच्यासोबत तुम्ही शपथविधी करता. इतक्या स्वार्थाने तुम्ही विचारप्रणालीला मागे सारले. लोकांनी मत दिले त्याला लाथाडले. याची जर महाराष्ट्राला चटक लागली तर राजकारण कुठे जाईल? उद्या या गोष्टी वाढल्या तर कोण राहील इथे, अशी टीका करून राज म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी गोष्ट केली, ती अत्यंत योग्य केली. कारण तुम्ही विचारप्रणाली, बाळासाहेब सर्वांना बाजूला काढले. काँग्रेससोबत जाऊन बसणे हे कोणालाच पटले नसेल. इतकी वर्षे ज्यांना विरोध केला, त्यांच्यासोबत सत्तेत बसणे हे कोणालाच आवडले नाही. ही गोष्ट आधीच झाली असती; पण मध्ये कोविड आला, असे ते म्हणाले.
नवी दिल्ली : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असला तरी अजित पवारांची भूमिका वेगळी आहे. ते सातत्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. युतीतील कोट्यातून पक्ष अल्पसंख्याक समाजाला दहा टक्के जागा देणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. दुसरीकडे महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या खेळपट्टीवर भाजप-शिवसेना थेट खेळत आहेत, तर पवार महायुतीपासून वेगळ्या वाटेवर निघाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सध्या भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणातील सर्वात मोठा चेहरा योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’’ असा नारा दिला होता. मोदी यांनीही दुसऱ्या शब्दांत ही घोषणा स्वीकारली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते भाजपच्या संपूर्ण फळीपर्यंत, अगदी शिवसेना शिंदे गटही मुख्यमंत्री योगींच्या या घोषणेचे उघड समर्थन करत आहे; मात्र, अजित पवार यांनी त्याला विरोध केला. योगींच्या या घोषणेबद्दल पवार म्हणाले की, ते राज्यातील जातीय सलोख्यासाठी कटिबद्ध आहेत. पवार या घोषणेपासून उघडपणे दुरावल्याने महायुतीत फूट पडण्याच्या अटकळींना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या वक्तव्याचा निषेध करत अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या महाराष्ट्राची इतर राज्यांशी तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवण सर्वसमावेशक होती आणि त्यांनी सर्व समाज आणि वर्गांना एकत्र केले. इतर राज्यातील लोक अनेकदा महाराष्ट्रात येऊन आपले विचार मांडतात; पण अशा कमेंट्स इथल्या लोकांना आवडत नाहीत आणि अस्वीकारार्ह आहेत.
मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याने त्यांना सत्ताधारी आघाडीकडे आकर्षित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विकासावर केंद्रित पक्ष म्हणून स्वतःला सादर करण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. आपल्या मित्रपक्षांनी तसेच विविध उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी केलेल्या कथित जातीयवादी टिप्पण्या वारंवार नाकारल्या आहेत. मोदी यांच्यासह भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांवर सभा घेणार नाहीत. योगी, शाह आणि मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघात सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पवार म्हणाले, की मोदी यांना बारामतीत सभा घेण्याची विनंती केली नाही. कारण तिथली लढाई ‘कुटुंबातली’ आहे. या मतदारसंघात पुतणे युगेंद्र पवार अजितदादांच्या विरोधात रिंगणात आहेत.