कोल्हापूर : प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारची ओढाताण चालली असून सामाजिक न्याय विभागाकडील ४०० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थखात्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सरसावले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार हे काय आभाळातून पैसे आणणार आहेत का? असा सवाल मंत्री शिरसाट यांना केला आहे. (Mushrif)
कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, “लाडकी बहीण ही लोकप्रिय योजना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला पैसे देताना अर्थ विभागाची ओढाताण होते. त्याचा कमी अधिक परिणाम सर्वच विभागावर झाला आहे. हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी समजून घेतले पाहिजे. नाहीतर लाडक्या बहिणींसाठी उप मुख्यमंत्री अजित पवार हे काय आभाळातून पैसे आणणार आहेत का? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे. (Mushrif)
संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत. ते नव्यानेच मंत्री झाल्याने त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेणे अपेक्षित आहे. माहिती न घेता ज्येष्ठ नेत्यांवर बोलणे चुकीचे आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. (Mushrif)