– सुषमा शितोळे
आपण सर्वात जास्त घाबरतो कोणाला? किंवा तो येऊ नये म्हणून नेहमी कोणाविषयी काळजी घेतो, तर मृत्यूचीच. पण संदेशनं मृत्यूची कधीच काळजी केली नाही. हे खरं की मृत्यू केव्हाही येऊ शकतो. म्हातारपणी यावा अशी अपेक्षा असते पण तसंच होईल असंही नाही. संदेशला तरुणपणीच आला. त्याला बरंच काही करायचं होतं व म्हतारपणापर्यंत ते तो सगळं निवांत करणार होता, पण आता रस्ताच संपला होता. मृत्युनं त़्याला ती संधी दिलीच नाही.
आज सकाळीच संदेशचा मृत्यू झाला. आपण असे अचानकपणे मेलो ह्यावर त्याचा कितीतरी वेळ विश्वासच बसत नव्हता. कुटुंबियांचा शोक अनावर झालेला. त्याचं आयुष्य छान चाललं होतं. नुकतंच प्रमोशन झालेलं. पगार वाढलेला. केवढा खुश होता तो. मनासारखी बायको. पाच वर्षांची गोड मुलगी. इतक्या तरूण वयात मरण ही कल्पना त्यानं कधीच केली नव्हती.
मात्र मरण काय आपल्या हाती असतं?
पण नाही, हे मरण मीच ओढवून घेतलं असं आता त्याला वाटत होतं. मुलीचा व बायकोचा रडूनरडून सुजलेला लालबुंद चेहरा बघवत नव्हता. बघणा-यांचं काळीज चिरून टाकणारा तो आकांत त्याला स्पष्ट ऐकू येत होता.
कितीतरी वेळा त्यानं बुलेटवर असताना ट्रॅफिक सिग्नल मोडला होता. त्यातून मिळणारा स्वैर आनंद त्याला आठवला. रात्रीअपरात्री थंडी पावसाचा, धुक्यांचा विचार न करता बेभानपणे नशेत केलेली ड्रायव्हिंग आठवली. तारुण्याची एक झिंग होती. सगळं कसं फास्ट हवं. आत्ताही तेच झालं होतं. आपल्याच मस्तीत तो होता. स्वत: वर अतिविश्वास आणि समोर ट्रक होता. पेशन्सच नव्हता. धीम्या गतीनं जाणा-या ट्रकचा त्याला राग आला. त्याच भरधाव वेगानं त्यानं सरळ ट्रकला ओव्हरटेक करत कार पुढं नेण्याचा प्रयत्न केला, पण अचानक काय झालं ते कळलंच नाही, समोरून येणा-या रिक्षाला चुकवताना कार ट्रकवर आदळली, स्टीअरिंगवरचा ताबा सुटला. ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर चुकून पाय दाबला गेला. कारचा हायेस्ट स्पीड. कार रिक्षाला घासून एका मोठ्या झाडावर आदळली. ट्रक सावरली. संदेश जागीच मेला. रिक्षातील ड्रायव्हरसह दोन माणसं जखमी झाले. बिचा-यांचा काहीच दोष नव्हता……
बेताल ड्रायव्हिंग… धोक्याची सूचना
हं..काय बोलायचं आता? संदेशच्या या बेताल ड्रायव्हिंगबद्दल घरातले सगळे जण त्याला सतत बोलत. धोक्याची सूचना करत. शपथा घालत, पण त्यानं ते कधीच मनावर घेतलं नाही. अन् त्याची मोठी शिक्षा त्याच्या माघारी आता त्याच्या मुलीला नि बायकोला भोगावी लागणार होती. त्याच्या कुटुंबाला त्याची गरज होती. रिक्षातील माणसांचे जीवनही धोक्यात होते. अन् आता त्याला पश्चाताप, दु: खही करता येणं शक्य नव्हतं. त्याचा काही उपयोग नव्हता कारण तो जिवंत नव्हता…
तो जिवंत होता तेव्हा केवळ बेफिक्र वागलेला
आपण सर्वात जास्त घाबरतो कोणाला? किंवा तो येऊ नये म्हणून नेहमी कोणाविषयी काळजी घेतो, तर मृत्यूचीच. पण सतिशनं मृत्यूची कधीच काळजी केली नाही. हे खरं की मृत्यू केव्हाही येऊ शकतो. म्हातारपणी यावा अशी अपेक्षा असते पण तसंच होईल असंही नाही. संदेशला तरुणपणीच आला. त्याला बरंच काही करायचं होतं व म्हतारपणापर्यंत ते तो सगळं निवांत करणार होता, पण आता रस्ताच संपला होता. मृत्युनं त़्याला ती संधी दिलीच नाही. ‘टाईम अप’ म्हणत त्याच्या बेजबाबदारपणाची एकदाच पुरती नशा उतरवून टाकली. जर माणसाला आपल्या मृत्यूची तारीख आधीच समजली असती तर? त्याच्या मनात पुन्हा विचार आला, मग मी म्हातारपणापर्यंत माझी कामं, स्वप्नं लांबवली नसती. ती पूर्ण करूनच एक्झिट घेतली असती. मृत्यूपुर्वी खूप आनंदानं जगून घेतलं असतं. मी मेल्यानंतर इतरांच्या मनात माझ्याविषयी चांगल़्या भावना राहाव्यात म्हणून काही वेगळे खास सत्कृत्ये केली असती. बायकोवर त्याचं प्रेम होतंच, पण ऑफिसमधील एका लेडीसोबतही टाईमपास अफेअर चालू होतं. तो मनातनं म्हणाला, ते मग मी टाळलंच असतं. घरी वेळेवर येऊन कुटुंबाला वेळ दिला असता. आई वडिलांना गावाकडून आग्रहानं घरी स्वत:च्या नव्या फ्लॅट मध्ये रहायला आणलं असतं. लग्नानंतर मित्रांकडं जरा दुर्लक्षच झालं होतं, तसं मग झालं नसतं. त्याला ट्रायथलॉनमध्ये भाग घ्यायचा होता, पण हे असं होईल हे माहीत असतं तर ते स्वप्न त्यानं मरण्याआधी नक्कीच पूर्ण केलं असतं. कारण तशी क्षमता त्याच्यात नक्कीच होती. आणि बरंच काही आणखीही करायचं होतं. त़्याने ती सारी बकेट लिस्ट त्याच्या डायरीत लिहून पण ठेवली होती. मुख्य म्हणजे स्वत:त पण त्याला बरेच बदल करायचे होते. उदा. सकाळी लवकर उठून फिरायला जाणे. आठवड्यातून एक दिवस आश्रमशाळेतील मुलांसाठी वेळ काढणे. स्वत:चा हायपर स्वभाव जरा सॉफ्ट करणे इइ. पण आता असं आठवत बसलं किंवा विचारच करत बसलं तर करायच्या राहून गेलेल्या गोष्टींना अंत नव्हता. मृत्यूचा स्वीकार करणं गरजेचं होतं. ऑप्शनच नव्हता नं काही. त्याला किंचितसं असंही वाटून गेलं, की आता आपलं भूत होणार की काय….म्हणजे आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्यात म्हणून! पण त्यानं स्वत:ला सावरलं. नकोच ते आता सगळं. नको पुन्हा संसाराच्या मायाचक्रात अडकायला. सारंच क्षणभंगुर!
मृत्यूमुळं भीतीपासून मुक्ती
तो स्वत:शीच पुटपुटला, मरण आलं ते बरंच झालं. त्याला वाटलं, खरं तर तो मुक्तच झाला कायमचा. आता कशाचंही भय उरलं नाही. म्हणजे मरणाचं भय त्याला इतरांप्रमाणं फारसं कधीच वाटलं नव्हतं. तो त्याला त्याचा प्लस पॉइंट वाटा़यचा, आणि याक्षणी मात्र निगेटिव्ह पॉइंट वाटत होता. पण मरणाचं नसलं तरी इतर गोष्टींबद्दल भीती मात्र त्याच्या आत कायम होती. वरूनवरून तो बिनधास्त दिसायचा. पण आतून कायम धास्तावलेला. अगदी या जगात त्यानं पहिलं पाऊल ठेवल्यापासून. कधी कळत, कधी नकळतपणे भीती कायम त्याच्यावर राज्य करत राहीली. तिच्यापासून मुक्त होण्यासाठी तो कायम झगडत राहिला. पण त्याच्या आतलं भय कधी संपलंच नाही. पण आता तीच गोष्ट अचानकपणे प्रथमच घडली होती. मृत्यूमुळं भीतीपासून त्याला कायमची मुक्ती मिळाली होती. त्याला आता कुठलंच भय जाणवत नव्हतं. एकदम हलकं हलकं वाटत होतं. मनावरचं खूप मोठं ओझं निघून गेल्यासारखं. त्याचं ह्रद्य तो जीवंत असताना ते खूप वेळा भीतीनं धडधडत असे. घट्ट आवळल्यासारखं वाटे. लहानपणी भुताची भीती, वडिलधा-यांच्या रागावण्याची भीती, चोराची भीती, कमी मार्कांची भीती. मोठेपणी तर कायम अपयशाची भीती. कारण यशाची सवय झाली होती. कोण काय म्हणेल याची सतत भीती. प्रतिमा तुटण्याची भीती. अपमानाची भीती. कायम फोकसमध्ये राहिलं पाहिजे. स्टेटस जाता कामा नये ही भीती. विचार करता करता त्याच्या लक्षात आलं, की या सर्व भीतींमुळं मनासारखं कधी जगताच आलं नाही. भीतीचं स्वरुप बदलत गेलं, पण भीती काही संपली नाही…पण च्यायला ती भीती म्हणजे नुसता भ्रम होता. पोकळ अगदी. का गुरफटत गेलो त्यात? एवढं भिऊन काय मिळवलं शेवटी! खरखुरं जगलोच नाही कधी. सतत कोणाच्या तरी नजरेतून स्वत: ला पहात होतो यार…
संदेशला स्वत: चा राग आला. पण आता तो भावनांच्या पलिकडं गेला होता. कारण राग वाटूनही त्याला त्रास झाला नाही. मनाची कोणतीच भावना टिकत नाही. ती येतेय व लगेच जातेय, आपण त्यात अडकत नाहीहोत हे त्याच्या लक्षात यायला लागलं..आयला हे झकास आहे की! शरीर असतानाच असं मनाचं झालं असतं तर! वा…लय भारी झालं असतं. मग मी किती खुलून जगलो असतो! कुठलंही व कोणाचंही प्रेशर न घेता. संदेश ती अवस्था एन्जॉय करू लागला. तटस्थतेनं गतजीवनाकडं तो पहातोय व त्या सर्व अवस्थेत मन कमालीचं शांत आहे ही मनोवस्था त्याच्यासाठी भन्नाटच होती. तेवढ्यात त्यानं आणखी एक गोष्ट पाहिली. जी पाहून तो जिवंत असता तर आनंदानं नाचलाच असता. त्याच्या पत्नीचा त्याला अतिशय अभिमान वाटला असता. अवयवदान या विषयावर दोघांनीही पूर्वी खूप वेळा चर्चा केली होती. मेल्यानंतर आपले शरीर एखाद्या आरोग्यसंस्थेल दान केले जावे अशा इच्छा दोघांनीही एकमेकांजवळ बोलून दाखवल्या होत्या आणि त्यानुसार त्याच्या पत्नीनं त्या अतीव दु:खाच्या प्रसंगातही स्वत:ला सावरत संदेशच्या अवयवदानाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्याचे मृतशरीर आता शववाहिकेतून एका हॉस्पिटलकडे निघालेले होते. पत्नीनं त्याच्या इच्छेचा सन्मान केला होता.
अवयवांचं महत्त्व
तो अनंत चतुर्थदशीचा दिवस होता. त्याचा चेहरा जबर ठोकर बसल्यानं छोन्नविछिन्नच झाला होता. ओळखायलाही येत नव्हता. मानेचा वरचा भाग काही उपयोगाला येणार नाही बहुदा. त्याच्या मनात आलं, शंकराकडं मृत बालगणेशाला जिवंत करण्याची विद्या होती, पण मग तेच शीर त्याने त्याला का बसवले नसेल? हत्तीच्या पिल्लाचेच का? शंकराकडं जरा जास्त विद्या असती तर बरं झालं असतं. म्हणजे बालगणेशाचा मूळ चेहरा तोच राहिला असता. आताच्या काळात मला असं जीवदान मिळणं शक्य नाही, पण ज्यांचे ज्यांचे जीव अपंगावस्थेमुळं मरणाप्राय अवस्थेत आहेत त्यांना तर माझ्या या अवयवदानामुळं नक्कीच संपूर्ण जीव प्राप्त होईल. हा आजच्या विज्ञानाचा खरोखरच केवढा मोठा शोध आहे! प्रत्येक अवयवानुसार एकेका जिवात प्राण फुंकण्यासारखंच. म्हणजे पार्वतीला पुन्हा गणेशा मिळाल्यासारखं. मी इतक्या सा-या शरीरांत असेल! आता माझ्या शरीरात मी नाहीये पण मला त्या शरीराचं महत्व आत्ता कळतंय. गंमतच आहे! शरीरात मी जेव्हा होतो तेव्हा फारसं सत्कार्य करता आलं नाही, हे करायचं, ते करायचं बोलत राहिलो फक्त. प्रत्यक्ष कृती सुचलीच नाही. अवयव फुकट मिळाले होते ना! त्याऐवजी मी माझ्याकडं जे नाही व इतरांकडे आहे अशा भौतिक गोष्टींसाठी स्वत: ला टोचत राहिलो, पण आता माझा तो प्रत्येक अवयव किती किमतीचा होता हे समजतंय. अर्थातच पत्नीनं अवयवदानाचा हा निर्णय घेतला म्हणूनच हे पुन्हा लक्षात येतंय, तेव्हा याचे सारे श्रेय तिलाच. एखाद्याला डोळे मिळणं, ह्रदय मिळणं,हाडे, त्वचा, यकृत, किडणी, यकृत मिळणं म्हणजे त्या माणसाचा जणू पुनर्जन्मच! त्यांना मिळालेल्या या नवीन अवयवांचा त्यांना किती आदर असेल! आज खरं तर जगभरात लाखो लोक अवयवांसाठी प्रतिक्षेत उभे आहेत. भारतात दरवर्षी पाच लाख लोकांचा अवयव न मिळाल्यानं मृत्यू होतो. पण आपल्याकडे या विषयावर अजूनही अंधश्रद्धा आहे. आपल्याला रुढीपरंपराच्या पलिकडं जाऊन विचार करावासा वाटत नाही. अवयवदानामुळं शरीराचे हाल होतात, शवाला जाळून, पुरूनच मोक्ष मिळतो म्हणे. संदेशला एकदम हसू आले. त्याच्या मनात आले, मग् आयुष्यभर काहीही वागलं तर चालतं का..? कसंही वागलं व शास्त्रानुसार शरीराला जाळलं, पुरलं की मोक्ष मिळतो का? वा…व्हॉट अँन लॉजिक..हाहा…जाऊदे इतरांचं काही असो. मला शरीर असताना फारसं सत्कार्य करता आलं नाही, कारण जीवनाविषयी तेवढं गांभीर्य नव्हतं, ट्रॅफिकचे नियम न पाळण्याच्या मी वारंवार केलेल्या गुन्ह्यांची अशी अचानकपणे भली मोठ्ठी शिक्षा मिळेल व शरीरातून बाहेर पडावे लागेल असं कधी वाटलंच नव्हतं. पण असो, आता किमान अवयवदानातून तरी हा देह सार्थकी लागतोय म्हणायचा…वॉव.
संदेशचे थंडगार पडलेले शव हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्याच्या बायकोच्या चेह-यावर एक शांत, स्थिर भाव होता.