क्वालालंपूर : एकोणीस वर्षांखालील मुलींच्या आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी ‘सुपर फोर’ गटातील सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४ विकेटनी पराभव केला. (India U-19)
या सामन्यात भारताच्या गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला २० षटकांत ९ बाद ९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेतर्फे कर्णधार मनुदी नानायक्काराने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. भारताची फिरकीपटू आयुषी शुक्लाने १० धावांत ४ विकेट घेतल्या. परुणिका सिसोदियाने २ विकेट घेतल्या.
भारताने १४.५ षटकांत ६ बाद १०२ धावा करून विजय साकारला. पहिल्या दोन षटकामध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या होत्या. त्यानंतर, जी. कमलिनी आणि गोंगादी त्रिशा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. कमलिनीने २८, तर त्रिशाने ३३ धावा केल्या. या दोघी बाद झाल्यानंतर कर्णधार निकी प्रसाद आणि भाविका अहिरे झटपट बाद झाल्या. मात्र, मिथिला विनोदने १२ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह नाबाद १७ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रीलंकेच्या चामोदी प्रबोध यांनी ३ विकेट घेतल्या. अंतिम सामन्यात भारतासमोर बांगलादेशचे आव्हान आहे. बांगलादेशने ‘सुपर फोर’मध्ये नेपाळवर ९ विकेटनी मात करून अंतिम फेरी गाठली. (India U-19)
हेही वाचा :