उजव्या विचारसरणीच्या छावणीतले बुद्धीमान सदस्य म्हणून अरुण शौरी यांना ओळखलं जातं. राम मंदिर आंदोलनाचा काळ आठवा. इंग्रजी माध्यमांनी भाजपला लक्ष्य केलं होतं, तेव्हा अडवाणी-वाजपेयी यांचे समर्थक म्हणून अरुण शौरी पुढे आले होते. इंडियन एक्सप्रेसचे संपादक राहिलेले शौरी हिंदुत्ववादी राजकारणाचे प्रवक्ते बनले होते. अडवाणी यांच्या रथयात्रेचाही त्यांनी पुरस्कार केला होता. त्याचे बक्षिस त्यांना मिळाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. अडवाणी-वाजपेयींचे युग संपुष्टात येऊन मोदी-शाह यांचे युग सुरू झाले. त्यानंतरही शौरी यांना मंत्रिपदाच्या अपेक्षा होत्या. परंतु मोदी यांना बुद्धीवंतांचे वावडे असल्यामुळे त्यांनी त्यांना फारशी किंमत दिली नाही. त्यानंतर शौरी मोदींच्या विरोधात गेले. (Arun Shourie on Savarkar)
सावरकरांवरील पुस्तक
अरुण शौरी यांनी काही वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील पुस्तक लिहिले होते. आणि त्यात त्यांनी बाबासाहेबांचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आंबेडकरवाद्यांच्या मोठ्या प्रमाणावरील रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. आता शौरी सावरकरवादी मंडळींच्या निशाण्यावर आल्यावाचून राहणार नाहीत. कारण त्यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तकः ‘द न्यू आयकन: सावरकर अँड द फॅक्ट्स` (Arun Shourie on Savarkar)
एकेकाळी हिंदुत्ववादी राजकारणाचे पुरस्कर्ते असलेले अरुण शौरी यांना आज मात्र सावरकरांचे हिंदुत्व, हिंदुत्ववादाचे राजकारण देशाच्या मुळावर येईल, अशी भीती वाटते.
अरुण शौरी यांनी सावरकरांवर पुस्तक लिहून भूतकाळातील चुकांचे प्राय़श्चित्त असल्याचे काही अभ्यासकांना वाटते.(Arun Shourie on Savarkar)
शौरी यांच्या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्देः
सावरकर हे संपूर्णपणे ब्रिटिशांचे समर्थक होते. ते भारतात हिटलरसारखी फॅसिस्ट व्यवस्था आणू इच्छित होते. त्यांनी हिटलरच्या समर्थनार्थ अनेक लेख लिहिले आणि मुंबईतील एका जर्मन एजंटमार्फत हिटलरपर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याची कृपा प्राप्त होऊ शकेल.
सावरकरांनी गांधीजींसोबतच्या मैत्रीच्या आणि लंडनमध्ये एकत्र राहिल्याच्या खोट्या कथा रचल्या आणि प्रचारित केल्या. प्रत्यक्षात, गांधीजी आणि सावरकर इंग्लंडमध्ये कधीही एकत्र राहिले नाहीत. उलट, सावरकरांनी भारतात असताना नेहमीच गांधीजींविषयी अपशब्द वापरले.
सावरकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे चुकीचे चित्र निर्माण केले की त्यांनी गांधीजींच्या सांगण्यावरून ब्रिटिशांची माफी मागितली. प्रत्यक्षात, त्यांनी आपल्या स्वार्थासाठीच वारंवार माफीची मागणी केली होती.(Arun Shourie on Savarkar)
सावरकर हे एक व्यक्ती म्हणून विश्वासार्ह नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायमच त्यांच्यापासून अंतर ठेवले. आरएसएसचे तत्कालीन प्रमुख गोळवलकर गुरूजींनी सावरकरांना कधीही जवळ येऊ दिले नाही, असे शौरींनी म्हटले आहे.
भाजपकडे खरे नायक नाहीत, म्हणून ते कधी सुभाषचंद्र बोस यांना आपले म्हणण्याचा प्रयत्न करतात, तर कधी सावरकरांना महत्त्व देतात. सावरकरांना एक नवा नायक म्हणून पुढे आणण्यामागे गांधीजींचे चारित्र्यहनन करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सावरकरांचे हिंदुत्व द्वेषावर आधारलेले असल्याचेही शौरी यांनी नमूद केले आहे.
सावरकरांची ऐतिहासिक उडी म्हणून जिचा गौरव केला जातो, ती घटनाही अतिशयोक्तिपूर्ण असल्याचे अरुण शौरी सांगतात.
सावरकरांच्या ऐतिहासिक उडीचे वास्तव
आठ जुलै १९१० रोजी फ्रान्सच्या मार्सेलिस या बंदरावरील ही घटना आहे. डिसेंबर १९०९ मध्ये अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे तत्कालिन ब्रिटिश जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घालून मारले. ज्या पिस्तुलातून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ते इंग्लंडमधून भारतात पाठवण्यात आलं होतं. या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरुन तेव्हा लंडनमध्ये असलेल्या सावरकरांना पकडण्यात आलं. (Arun Shourie on Savarkar)
सावरकरांना अटक करुन भारतात आणलं जाणारं जहाज जेव्हा फ्रान्सच्या मार्सेलिस या बंदरात उभं होतं. तेव्हा त्यावरुन सावरकरांनी उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न जरी अयशस्वी ठरला, तरीही त्यांची ही उडी गाजली. आणि आजअखेर त्यांचे चाहते ती गाजवताना दिसतात. अरुण शौरी यांनी या पुस्तकात त्यांच्या उडीवर सविस्तर लिहिले आहे.
प्रयत्न धाडसी, पण…
सावरकरांनी उडी मारली आणि सुटण्याचा तो एक धाडसी प्रयत्न होता असं म्हणतात. मात्र त्याबद्दल सांगितली जाणारी स्टोरी अतिरंजित असल्याचं शौरी लिहितात. समुद्रात उडी मारून अनेक मैल पोहण्याची कथा अतिशयोक्तिपूर्ण आहे. सावरकरांनी जहाजाच्या खिडकीतून उडी मारली. मात्र, त्यावेळी जहाज बंदरात उभे होते. जमिनीपासून त्याचे अंतर केवळ आठ-दहा फूट होते.
सावरकरांनी जेवढा पल्ला पोहून गाठला असं सांगितलं तो तेवढा नव्हता, असं शौरी लिहितात. ते म्हणतात उपलब्ध कागदपत्रांवरुन असं दिसतं, की सावरकरांना नेणारं जहाज कोळसा भरण्यासाठी मार्सेलिस बंदरात थांबलं होतं. जिथं ते थांबलं होतं तिथून किनारा केवळ दहा ते बारा फूट होता. (Arun Shourie on Savarkar)
सावरकरांच्या ऐतिहासिक उडीवर वस्तुनिष्ठ प्रकाश टाकला असला तरी त्यांचे भक्त यापुढे त्याचे महिमामंडन करणार नाहीत, असे नाही. कारण खोट्या गोष्टी रेटून पुढे चालवण्यात त्यांचा हातखंडा आहे.