मुकेश माचकर
‘गेम्स पीपल प्ले’ या बेस्टसेलर पुस्तकात एरिक बर्न या मनोचिकित्सकाने माणसांचं सामाजिक वर्तन हे कसं परस्परांच्या सोयीच्या भूमिकांनी भरलेल्या लुटुपुटुच्या खेळासारखं, एखाद्या नाटकासारखं असतं, याचं दर्शन घडवलं आहे…
… धर्म, देश, जाती वगैरेही आपल्या निवडीविना स्वीकारलेल्या भूमिकाच आहेत… काही लोक भूमिकेत जरा जास्तच शिरतात आणि आपण अमुक आहोत, तमुक आहोत, याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, त्याच्यापेक्षा भारी आहोत किंवा अशा काही बाही कल्पना करून घेतात…
…हे म्हणजे तांब्यातल्या पाण्याने किटलीतल्या पाण्याशी तुलना करण्यासारखं असतं… पाणी म्हणजे तांब्या नव्हे, किटली नव्हे, ग्लास नव्हे; तरीही ‘फूल’-‘पात्र’ बनण्याची हौस काही फिटत नाही.
‘गेम्स पीपल प्ले’मध्येच बर्नने दिलेलं एक उदाहरण मार्मिक आहे…
तो म्हणतो की अमुक एका बाईने एका नवरेशाही गाजवणाऱ्या माणसाशी लग्न केलं होतं. तो डॉमिनेटिंग आहे, हे माहिती असताना अनेक इच्छुकांमधून तिनेच त्याला निवडलं होतं.
तिला ज्या ज्या गोष्टी करायच्या नव्हत्या, कराव्याशा वाटत नव्हत्या, ज्यांची भीती वाटायची, त्यांच्यापासून तो तिला मज्जाव करायचा. मग ती सगळ्यांना ‘हा बघा ना मला काहीच करू देत नाही, हा आहे म्हणून मला अमुकतमुक करता येत नाही’ अशा तक्रारी सांगायची.
हा दोघांनीही स्वेच्छेने निवडलेला खेळ आहे, हे तिला माहितीही नव्हतं.
कालांतराने स्वत:च्या तक्रारी तिलाही खूप खऱ्या वाटू लागल्या. बंडाचं प्रतीक म्हणून तिने त्याचा मज्जाव धुडकावून नृत्यवर्गात नाव घातलं… तिथे गेल्यानंतर तिला कळलं की तिच्यात नृत्याबद्दल अतिशय खोल भीती दडलेली आहे, ते तिला अजिबात जमणारं नाही आणि तो तिला अडवत होता, तेच तिच्या सोयीचं होतं.