कोल्हापूरच प्रतिनिधी : शारदीय नवरात्र उत्सव दशमी दिवशी श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात आली. नवरात्र झाले. घट उठले. आदिशक्ती सगळ्या सीमांचे उल्लंघन करून नव्या दिग्विजयाची प्रेरणा देण्याकरिता रथात बसून निघाली, असा भाव व्यक्त करण्यासाठी खास सजलेली ही आजची पूजा. ही पूजा माधव मुनिश्वर, मकरंद मुनिश्वर, रवी माईणकर, सोहम दिलीप मुनिश्वर यांनी बांधली. (Navratri Ustav 2024)
श्री अंबाबाई मंदिर
कोल्हापूर; प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक दररोज दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.मात्र, पावसाच्या शक्यतेने भाविकांची संख्या घटू लागली आहे. भाविकांची संख्या कमी राहिल्याने मुख्य दर्शनरांग व मुख दर्शनाच्या रांगा अपवाद वगळता रिकाम्या राहिल्या.काल दिवसभरात ७४ हजार ९५३ भाविकांची देवीचे दर्शन घेतले. (Navratri Ustav 2024)
आज आश्विन शुद्ध अष्टमी. शारदीय नवरात्र उत्सव नवव्या दिवशी महिषासुर मर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली आहे. तंत्रात ‘महारात्री म्हणून ओळखली जाणारी ही तिथी. आजच्याच दिवशी जगदंबा आदिशक्ती विराट रूप धारण करून महिषासुराचा वध करती झाली. त्रिलोकला त्रास देणारा असुर या तिथीला संपला पण त्याही पेक्षा ५१ शक्तिपीठांचा यादीत करवीरसाठी करवीरे महिष मर्दिनी असा येणारा उल्लेख सार्थ करणारी आजची ही महातिथीची पूजा. आज महिषासूर मर्दिनी पूजा श्री पूजक माधव मुनीश्वर,मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत त्र्यंबोली मंदिर परिसरात आज (दि.८) ललित पंचमीचा (कोहळा पंचमी) सोहळा उत्साहात पार पडला. (Navratri Ustav 2024)
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. त्यानंतर अंबाबाईचा पालखी सोहळा त्र्यंबोली भेटीसाठी निघाला. मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी होते. माजी खा. संभाजीराजे, मालोजीराजे, यशराजे हे करवीर घराण्यातील सदस्य या सोहळ्यासाठी उपस्थित होता. कोहळा फोडण्याचा मान सागरिका गुरव या कुमारिकेला मिळाला. तिच्या हस्ते त्रिशूळाने कोहळा फोडला. त्यानंतर त्र्यंबोली व अंबाबाईची भेट घडवण्यात आली. पंचोपचार पूजा, आरती, आहेराची देवघेव झाली. त्यानंतर सर्व पालख्या परतीच्या मार्गाला लागल्या. त्र्यंबोली देवीची सिंहासनरुढ रूपात पूजा संतोष गुरव, योगराज गुरव, शार्विल गुरव यांनी बांधली. (Navratri Ustav 2024)
काय आहे अख्यायिका?
शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमी या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी भालदार, चोपदार, सेवेकरी आणि श्रीपूजकांच्या शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते. अंबाबाईने कोल्लासुराचा नाश केल्यानंतर त्याच्या पत्नीने कामाक्ष नावाच्या पुत्राला जन्म दिला. आपल्या पित्याचा आणि दैत्यकुळाचा अंबाबाईने व देवतांनी नाश केला याचा त्याला राग होता. देवतांवर विजय मिळवण्यासाठी त्याने कपिल महामुनींकडून योगदंड मिळवला. हा योगदंड कोणावरुनवही फिरवला असता त्याचे प्राणिरुप होईल आणि जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य नष्ट होई. हा योगदंड घेऊन कामाक्ष मुक्तिमंडपात आला. येथे देवगणांसह अंबाबाई कोल्हासुर वधाचे कुष्मांडभेदन करीत होती. एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांचे कामाक्षाने शेळ्यामेंढ्यात रुपांतर केले. तेव्हा त्र्यंबोली देवीने वृद्धेचे रुप घेऊन कामाक्षाकडून योगदंड हिसकावून घेतला. त्याचा वध केला. तिचे हे देवलोकावर ऋण होते. मात्र असुरवधानंतर करण्यात आलेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले. त्यामुळे ती रुसून शहराबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसली. ते लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी गेली. तिच्या इच्छेनुसार टेकडीवर कुष्मांडभेदन (कोहळा) करून दाखवले. ही या पूजेमागील आख्यायिका आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी (ललित पंचमी) करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ अंबाबाई रुपात पूजा बांधण्यात आली.श्री त्र्यंबोली पंचमी- कोलासुर पुत्र कामाक्ष अत्यंत उग्र व पराक्रमी पुत्र होता. देवताकडून त्याचा पराभव झाल्यानंतर निराश होऊन तो दैत्यगुरु शुक्राचार्याकडे गेला व त्यांच्या आज्ञेने कपिलाश्रमात कपिलमहामुनींची सेवा करुन, त्यांच्याकडून योगदंड मिळविला. हा योगदंड कोणावरूनही फिरविला असता, तो प्राणिरूप होई. मात्र जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य तत्क्षणी नष्ट होई. (Navratri Ustav 2024)
हा योगदंड घेऊन कामाक्ष मुक्तिमंडपात आला, येथे देवगणांसहित जगदंबा कोल्हासुर वधोत्सवाचे कूष्मांडभेदन करीत होती, एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांवरुन कामाक्षाने योगदंड फिरविला, यामुळे सर्व देवांचे शेळ्या मेंढ्यात रुपांतर झाले. तेव्हा त्र्यंबोलीने वृद्धस्त्रीचे रूप घेऊन, मायेने कामानाकडून योगदंड हिसकावुन घेऊन, त्याचा वध केला. या योगदंडाच्या शक्तीने सर्वदेवांस पूर्ववत् केले. हे तिचे देवलोकांवर मोठे ऋण होते. (Navratri Ustav 2024)
कोल्लासुरवधासाठी त्र्यंबुलीने देवीस प्रचंड साहाय्य केले असूनही, विजयोत्सवात तिला बोलाविण्याचे राहून गेले, याचा त्र्यंबुलीला राग आला व ती रागाने करवीराबाहेर एका टेकडीवर जाऊन बसली. ही गोष्ट जगदंबेच्या ध्यानात येताच, तिने त्र्यंबुलीस दासीकरवी निरोप धाडला. अखेर त्र्यंबुलीच्या रागाचे परिमार्जन करण्यासाठी जगदंबा स्वतः तिच्या भेटीस गेली आणि कोल्लासुरवधाचा विजयोत्सव (कोहाळा छेदन) त्र्यंबुलीसमोरच साजरा केला, यानंतर,’ अश्विनशुद्ध पंचमीस (त्र्यंबुलीपंचमी) जे भक्त तुझ्या दर्शनास येतील, त्यांनाच करवीरवासफल लाभेल. करवीरात कोणतेही विधि, यात्रा करणाऱ्या भाविकानी आदि- मध्य व कर्मसमाप्तीवेळी तुझे दर्शन घेतले नाही, तर त्याची उपासना व तीर्थविधी सिद्धी पावणार नाही.’ असा जगदंबेने त्र्यंबुलीला वर दिला. करवीरक्षेत्रात त्र्यंबुलीचे माहात्म्य थोर आहे.ही पूजा श्रीपूजक मयुर मुकुंद मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : आज (दि.७) अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच शारदीय नवरात्रातील पाचवा दिवस. आजच्या दिवशी श्री अंबाबाईची श्री सरस्वती देवी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली आहे. श्री सरस्वती ही सत्वगुणप्रधान देवी आहे. ती ज्ञान, बुद्धी, वाचा, विद्या, कला, संगीत, शिक्षण यांची अधिष्ठात्री देवता आहे. ऋग्वेदामध्ये सरस्वती मातेस अनेक स्तोत्रे समर्पित केली आहेत. (Navratri Ustav 2024)
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
याप्रमाणे हा श्री सरस्वती देवीचे ध्यान, स्तुती तसेच प्रार्थनेचा सुप्रसिद्ध श्लोक आहे. याचा अर्थ, जी कुंदपुष्प, चंद्र आणि हिमाच्या मोत्यांच्या हाराप्रमाणे शुभ आहे, जिने शुभ्रवस्त्र परिधान केले आहे, जिच्या हातांत श्रेष्ठ अशी वीणा आहे, जी श्वेत कमलासनावर विराजमान आहे, जी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सदैव वंदनीय आहे, अशी ती संपूर्ण जडता (बुद्धिमांद्य) आणि अंजान यांचा समूळ नाश करणारी देवी सरस्वती माझे रक्षण करो.
चतुर्भुजा सरस्वतीच्या हातांमध्ये अक्षमाला, वीणा व पुस्तक शोभायमान आहेत. श्री सरस्वती देवीचे वाहन हंस आहे. परमपूज्य श्री शंकराचार्यांच्या मठांमध्ये प्रामुख्याने श्री शारदांबेचे पूजन केले जाते. शारदांबा म्हणजे देवी सरस्वतीच होय. श्री सरस्वती देवीची प्रसिद्ध मंदिरे वैष्णोदेवी (काश्मीर), शृंगेरी (कर्नाटक), बासर (तेलंगणा) येथे आहेत. (Navratri Ustav 2024)
धार्मिक पूजेच्या प्रारंभी गणेश, सरस्वती व गुरु यांना वंदन केले जाते. आपल्या प्रासादिक संत वाङ्मयांत संतांनी ग्रंथारंभी गणेश, शारदा, सद्गुरू यांचे स्मरण-वंदन केले आहे. भारतामध्ये विद्यालयांमधून बालवयात विद्यारंभी श्री सरस्वतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. श्री सरस्वती देवी सर्वांना जान व सदबुद्धी देवो, हीच तिच्या चरणी प्रार्थना !
ही पूजा विद्याधर मुनिश्वर, मयूर मुनिश्वर आणि अरुण मुनिश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सवकाळात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाचही मुख्य प्रवेशद्वाराजवळ तब्बल १२० कॅमेरे, ५ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्थ मेटल डिटेक्टर, १० बिनतारी यंत्रणा कार्यरत केली आहे. शिवाय प्रायोगिक तत्त्वावर यावर्षी आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे गर्दीतून फेस कॅप्चर करता येणार आहे. चोरीच्या घटनांचा विचार करता ‘फिश आय’ कॅमेराही बसवला आहे.
मंदिर परिसरात टीव्ही आणि एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत. त्याद्वारे पालखी सोहळा आणि इतर कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. एक्स-रे बॅगेज स्कॅनर अशा यंत्रणाही देवस्थान समितीने कार्यान्वित केल्या आहेत.
अंबाबाई मंदिरात प्लास्टिक पिशव्यांना बंदी
नवरात्र काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात प्लास्टिक पिशव्यांना बंदी असेल. उत्सवकाळात येणाऱ्या भाविकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात. परिसरातील दुकानदारांनी याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, देवस्थान समिती कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना गणवेश व ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. (Ambabai Mandir)
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दुकानदार, देवस्थान समिती कर्मचारी, सुरक्षारक्षकांची समितीने बैठक घेतली. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या. समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सहायक सचिव शीतल इंगवले, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.
दुकानातील प्रसाद साहित्य भेसळमुक्त असेल याबाबत काटेकोर काळजी घ्यावी, दुकानातील कामगारांसाठी ओळखपत्रे द्यावीत. कामगारांच्या नावाची यादी देवस्थान समितीकडे जमा करावी. अग्निरोधक यंत्रणा सुसज्ज ठेवा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, मंदिरातील स्वच्छता व इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. गरुड मंडपाची प्रतिकृती उभारणी वेगाने सुरू आहे. घाटी दरवाजा, दक्षिण दरवाजा, जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडील दर्शन मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. दर्शनरांगेत भाविकांसाठी लाईव्ह दर्शनाची सोय उपलब्ध असेल. परिसरात आपत्कालीन कक्ष, वैद्यकीय मदत आणि माहिती कक्षही भाविकांच्या सेवेत असणार आहे. (Ambabai Mandir)
हेही वाचा :