सिडनी : सिडनी कसोटीतील पराभवासह भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारताने ही मालिका गमावण्यात या दोघांच्या सपशेल अपयशाचा मोठा वाटा आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मात्र या मुद्द्याबाबत हात झटकले असून या दोघांच्या निवृत्तीचा निर्णय तेच घेतील, असे सांगितले. (Gautam Gambhir)
रोहितला या मालिकेमध्ये ५ डावांत ६.२०च्या सरासरीने ३१ धावा, तर विराटला ९ डावांमध्ये २३.७५च्या सरासरीने १९० धावा करता आल्या आहेत. खराब फॉर्ममुळे रोहितने सिडनी येथील अखेरच्या कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला. विराटला सातत्याने ‘आउटसाइड ऑफ’ चेंडूवर बाद होत असल्याचे लक्षात येऊनही आपल्या फलंदाजीत सुधारणा करता आली नाही. रोहित सिडनी कसोटीत न खेळल्यामुळे रोहितच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली होती. तथापि, त्याने स्वत:च आपण निवृत्ती घेतली नसून केवळ या कसोटीपुरते संघाबाहेर राहिल्याचे स्पष्टीकरण दिले. आता सिडनी कसोटीच्या दोन्ही डावांत अपयशी ठरल्यानंतर विराटच्याही निवृत्तीची चर्चा जोरात आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये गंभीर यांना या दोघांच्या निवृत्तीविषयी प्रश्न करण्यात आले. त्यावेळी गंभीर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.(Gautam Gambhir)
“कोणत्याही खेळाडूच्या भविष्याविषयी मी भाष्य करू शकत नाही. हा त्यांचा निर्णय आहे. मात्र, त्यांच्यामध्ये अद्यापही धावांची भूक आहे, हे मी सांगू शकतो. ते दोघेही कणखर आहेत. खेळाबद्दलची त्यांची आवड अजून टिकून आहे. त्यामुळे ते भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जातील, अशी आशा आहे. शेवटी, भारतीय क्रिकेटच्या सर्वोत्तम हिताची असेल, तीच योजना आमलात आणण्यात येईल,” असे गंभीर म्हणाले.
विराटच्या एकाचप्रकारे बाद होण्यावरही गंभीर यांनी आपले मत व्यक्त केले. “प्रत्येकाला आपला खेळ माहीत असतो. तुम्ही चांगली कामगिरी करण्यासाठी किती आसुसलेले आहात, हे महत्त्वाचे आहे. हा माझा किंवा तुमचा संघ नसून देशाचा संघ आहे. आमच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रामाणिक खेळाडू आहेत आणि त्यांची चांगल्या कामगिरीची भूक किती आहे, हे ते जाणतात,” असेही गंभीर यांनी नमूद केले. “सर्वांशी समप्रमाणात न्याय्य राहणे, ही माझी सर्वांत मोठी जबाबदारी आहे. मी जर दोन-तीन खेळाडूंशीच न्याय्य वागत असेन, तर मी स्वत:च्या कामाप्रती अप्रामाणिक आहे,” अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
कसोटी क्रिकेटमधील भारताच्या भविष्यातील वाटचालीच्या नियोजनाबाबत मात्र गंभीर यांनी मौन बाळगणेच पसंत केले. “आताच याविषयी बोलणे खूप घाईचे होईल. नुकतीच एक मालिका संपली आहे. पुढील कसोटी मालिकेपर्यंत आमच्याकडे अद्याप पाच महिन्यांचा अवधी आहे. खेळामध्ये कालपरत्वे खूप गोष्टी बदलू शकतात. त्यामुळे, आताच याविषयी बोलणे योग्य नाही. मात्र, जे होईल, ते भारतीय क्रिकेटच्या हिताचे असेल,” असेही गंभीर यांनी सांगितले.