नवी दिल्ली : भारताच्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांना गोळी घालणार होतो, असा खुलासा योगराज सिंग यांनी केला आहे. पिस्तूल घेऊन कपिल यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या आईकडे पाहून विचार बदलल्याचे योगराज यांनी एका मुलाखतीत सांगितले. (Yograj Singh)
योगराज हे भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील आहेत. ते स्वत:ही भारताचे माजी क्रिकेटपटू असून १९८०-८१ मध्ये त्यांनी भारतातर्फे १ कसोटी व ६ वन-डे सामने खेळले आहेत. योगराज यांनी ‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ या यू-ट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव यांच्याविषयीचा खुलासा केला. (Yograj Singh)
“कपिल जेव्हा भारत, उत्तर विभाग आणि हरियाणा या संघांचा कर्णधार होता, तेव्हा त्याने कोणत्याही कारणाशिवाय मला संघातून वगळले. मी कपिलला याविषयी विचारावे, असे माझ्या पत्नीला वाटत होते. मात्र, मी त्याला धडा शिकवेन, असे मी तिला सांगितले. मी माझी पिस्तूल काढली आणि सेक्टर-९ मध्ये असलेल्या कपिलच्या घरी पोहोचलो. तो आईसोबत बाहेर आला. मी त्याला खूप शिव्या दिल्या. तुझ्यामुळे मी एक मित्र गमावला आणि तू जे केले आहेस, त्याची किंमत तुला मोजावी लागेल, असे मी त्याला सांगितले. मला तुझ्या डोक्यात गोळी मारायची होती. मात्र, तुझी आई इथे उभी असल्याने मी तसे करणार नाही, असेही मी म्हणालो. त्यानंतर, मी माझ्या पत्नीसोबत तिथून निघालो,” अशी आठवण योगराज यांनी सांगितली. ‘त्याक्षणी मी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. माझा मुलगा क्रिकेट खेळेल, असेही मी ठरवले,” असेही योगराज म्हणाले. (Yograj Singh)
या मुलाखतीदरम्यान योगराज यांनी भारताचे मजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांच्यावरही टीका केली. “मी बिशनसिंग बेदींना कधीही माफ करणार नाही. त्यांनी माझ्याविरुद्ध कारस्थान केले होते. मला संघातून वगळल्यानंतर मी निवड समितीमधील रवींद्र चढ्ढा यांना भेटलो. त्यांनी मला सांगितले की बेदी यांचा माझ्या निवडीस विरोध होता. माझे सुनील गावसकर यांच्याशी चांगले संबंध होते. मी मुंबईकडून खेळायचो. त्यामुळे, मी गावसकर यांचा माणूस आहे, अशी समजूत झाल्याने बेदी यांनी मला विरोध केला,” असे योगराज म्हणाले. (Yograj Singh)
“युवराजने २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर मी कपिलला वृत्तपत्राचे कात्रण पाठवले होते. माझ्या मुलाने वर्ल्ड कपमध्ये तुझ्यापेक्षा चांगली कामगिरी केली,” असा संदेशही मी सोबत पाठवला होता. त्यानंतर कपिलने माझी क्षमा मागितली. त्याने भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. परंतु, मला त्या गोष्टी अद्याप वेदना देतात,” असेही योगराज यांनी सांगितले.