ठोसेघर-सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढताना तोल जाऊन २५० फूट खोल दरीत कोसळली. ती ४० फुटावरच एका झाडीत अडकल्यामुळे सुदैवाने ती बचावली. महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने तिला सुखरूप बाहेर काढले.
सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील पाच मुले व दोन मुली ठोसेघर सज्जनगड परिसरात सहलीसाठी आले होते. सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ठोसेघरकडे जाताना सज्जनगडापासून पाचशे मीटर अंतरावर तरुणी व तरुण रस्त्यालगत दरीच्या बाजूला सेल्फी काढत असताना तरुणीचा तोल जाऊन ती खोल दरीत कोसळली. अडीचशे फूट दरीत चाळीस फूट अंतरावर झाडीत अडकल्याने ती बचावली. या घटनेची माहिती तरुणीच्या मित्रांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कळवली. पोलिसांना शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केल्यानंतर तातडीने ही टीम घटनास्थळी दाखल झाली. महाबळेश्वर रेस्क्यू टीमही घटनास्थळी पोहोचली आणि दोन्ही टीमच्या सदस्यांनी तरुणीला सुखरूप बाहेर काढले.