महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅट्ट्रिक साधली. ९० जागा असलेल्या विधानसभेत भाजपने ४८ जागांसह निर्विवाद बहुमत मिळवले. भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला ३६ जागांवर विजय मिळाला असून, त्यांचा एक उमेदवार आघाडीवर आहे. (Election)
दुसरीकडे बहुचर्चित जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत जम्मू काश्मिर नॅशनल कॉन्फरन्सची सरशी झाली. या पक्षाला ४२ जागा मिळाल्या असून त्यांचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसने या पक्षासोबत आघाडी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपद ओमर अब्दुल्ला यांच्याकडे सोपवले जाईल, असे या पक्षाचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी आज सायंकाळी जाहीर केले. येथे काँग्रेसला सहा तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपला २९ जागांवर विजय मिळाला. तर पीडीपीला केवळ तीन जागा मिळवता आल्या.
हरियाणा आणि जम्मू-काश्मिरच्या विधानसभेच्या प्रत्येकी ९० जागांसाठी मतदान झाले होते. केंद्रातील भाजप सरकारने दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मिरला स्वायत्तता देणारे ३७० कलम हटवले होते. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने निकालाबाबत उत्सुकता होती.
मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. येथील ३० वर जागांवर सुरूवातीपासूनच नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी घेतली. ती सतत वाढत गेली. या पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम आणि गंदेरबाल या दोन्ही मतदारसंघातून विजय संपादन केला. नॅशनल कॉन्फरन्ससोबत या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी केली होती. काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला. (Election)
हरियाणा विधानसभेच्या निकालादरम्यान सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र नंतर भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य फेरीगणिक वाढतच गेले. ९० जागांपैकी ४५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले तर त्यांचे सहा उमेदवार आघाडीवर आहेत. ३५ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असून, त्यांचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत.
विनेश फोगाटने मारले मैदान
नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात अंतिम सामान्यात अपात्र ठरलेल्या कुस्तिगीर विनेश फोगाटने झुलाना मतदारसंघातून ६०१५ एवढ्या मताधिक्य मिळवत मैदान मारले. निवडणुकीआधी तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिची उमेदवारीही जाहीर करण्यात आली होती. भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेशकुमार यांच्याशी तिने कडवी झुंज दिली.
हेही वाचा :