जमीर काझी
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघ्या ३१ दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्षांमध्ये वाद उफाळून आला आहे. काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांमध्ये विदर्भातील जागावाटपावरून वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समवेत बैठकीत सहभागी होण्यास बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज (दि.१८) मुंबईत वाय. बी .चव्हाण सेंटर येथे होणारी महाविकास आघाडीची नेत्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी थेट काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली असून त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथला मुंबईत आले आहेत. उद्या (दि.१९) दिवसभर मुंबईत थांबून ते चर्चा करणार आहेत. (Maharashtra Election)
राज्यात २० नोव्हेंबरला २८८ विधानसभेच्या जागावर व नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप निश्चित झालेला नाही. मुंबई व कोकणात उद्धव ठाकरे गट तर पश्चिम महाराष्ट्र शरद पवार गटाला आणि विदर्भ व मराठवाडा विभागात काँग्रेसला सर्वाधिक जागा लढविण्याबाबत ठाम आहे.
लोकसभा निवडणुकीत या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या व त्यांचा एक बंडखोर खासदारही विजयी झाला होता. त्यामुळे काँग्रेसने सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाम असून विदर्भात लोकसभेत मिळालेल्या यशामुळे बहुतांशी जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहे. त्याचबरोबर गुरुवारी रात्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत खासदार संजय राऊत व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वादावादी झाली. (Maharashtra Election)
आघाडीमध्ये २८८ पैकी जवळपास २१५ जागाबाबत एकमत झाले असून उर्वरित जागांवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. ठाकरे गट विदर्भात नऊ ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहे. मात्र काँग्रेसने त्यांना जास्तीत जास्त चार जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. त्यावरून एकमत होत नसल्याने कालची बैठक अर्धवट झाली. नाना पटोले हे आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांच्या उपस्थितित जागा वाटपाबाबत चर्चा न करण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतला आहे. त्याबाबत आज संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी दर्शविली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील नेतृत्व निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहे. त्यांना वारंवार दिल्लीला यादी पाठवावी लागते. त्यामुळे आपण काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नई मुकुल वासनिक यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्याशीही बोलणार आहे. जेणेकरून जागा वाटपाचा प्रश्न लवकरात लवकर निकालात निघावा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र, ठाकरे गटाबरोबर वादा बाबत फारसे बोलण्याचे टाळले. ते म्हणाले राष्ट्रवादी गटाचे नेते अंतिम निर्णय घेण्यापूर्वी शरद पवारांशी बोलतात.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंची बोलतात त्याचप्रमाणे आम्हालाही आमच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावे लागणार आहे. त्यामुळे आम्ही तातडीने निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, महाविकास आघाडीतील काही जागेचा तिढा लवकरच संपुष्टात येईल.’ (Maharashtra Election)
निर्णय घेण्यास राज्यातील नेते असमर्थ
जागा वाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघणे महाविकास आघाडीसाठी आवश्यक आहे. मात्र, राज्यातील नेते निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहेत त्यामुळे आपण काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा करत आहोत
– खा .संजय राऊत (ठाकरे गटाचे नेते)
राऊत काय बोलले समजले नाही
आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी आपापल्या सर्वोच्च नेत्यांची चर्चा करावी लागते. आमचे सर्वोच्च नेते दिल्लीत असल्यामुळे त्यांना सांगणे अपरिहार्य आहे. त्यामुळे संजय राऊत हे काय बोलत आहेत ते समजले नाही.
– नाना पटोले (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)
हेही वाचा :